जुने साहित्य जळून खाक, सुदैवाने जीवितहानी टळली
सिडको : प्रतिनिधी
इंदिरानगर-साईनाथनगर परिसरातील साई अक्षदा मंगल कार्यालयाच्या मागील बाजूस असलेल्या एका रो-बंगल्याला बुधवारी (दि. 28) सकाळच्या सुमारास भीषण आग लागली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आगीच्या धुराचे लोट पसरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित बंगल्यात ठेवलेल्या जुन्या बॅटर्या आणि मंडपाच्या साहित्याने अचानक पेट घेतला. काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले. त्यामुळे परिसरात धुराचे मोठे लोट पसरले होते.
या घटनेची माहिती मिळताच सिडको आणि शिंगाडा तलाव येथील अग्निशमन दलाचे दोन बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन जवानांनी पाण्याचा मारा करून आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, या आगीत बंगल्यातील साहित्य जळून खाक झाले. मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.
या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. इंदिरानगर पोलीस आणि अग्निशमन विभागाकडून घटनेचा तपास सुरू आहे.
Major fire at a row bungalow in Indiranagar