नाशिक

नाट्यदिग्दर्शक सचिन शिंदे यांना मानसरंग नाट्यशिष्यवृत्ती जाहीर

 

नाशिक – प्रायोगिक रंगभूमीवरील प्रयोगशील दिग्दर्शक सचिन शिंदे सातारा येथील परिवर्तन संस्थेच्या “मानसरंग नाट्य शिष्यवृत्तीचे” पहिले मानकरी ठरले आहेत.
‘मानसरंग’ संकल्पक आणि ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक अतुल पेठे , मनोविकार तज्ञ डॉ हमीद दाभोलकर आणि आरोग्य संवादक राजू इनामदार यांनी पुणे येथे काल पत्रकार परिषदेमध्ये ही घोषणा केली.
नाट्यदिग्दर्शक सचिन शिंदे ( नाशिक) यांच्या सोबतच अभिजीत  झुंजारराव (कल्याण आणि क्षितीज दाते (पुणे) यांना ही शिष्यवृत्ती जाहीर झाली आहे.
पत्रकार परिषदे मध्ये बोलताना  अतुल पेठे म्हणाले कि, ‘परिवर्तन’ संस्थेमार्फत गेली पाच वर्षे मानसिक आरोग्याच्या प्रश्नांवर कला अभिव्यक्तीच्या माध्यमातून उपचार आणि प्रबोधन करण्यासाठी ‘मानसरंग’ नावाचा मंच चालवला जातो. ह्या ‘मानसरंग’ मंचाचा एक कार्यक्रम म्हणून या वर्षी पासून मानसिक आरोग्याच्या प्रश्नावर नाटकाच्या माध्यमातून भाष्य आणि जनजागृती करण्यासाठी ‘मानसरंग नाट्य-शिष्यवृत्ती’ जाहीर करण्यात येत आहे. पहिल्या नाट्य-शिष्यवृत्तीसाठी निवडलेले तीनही दिग्दर्शक आजच्या रंगभूमीवर कार्यरत असून ह्या नाट्य शिष्यवृत्तीच्या माध्यमातून ते मानसिक आरोग्याच्या विषयी भाष्य करणारे नाटक बसवणार आहेत. त्याकरता त्यांना प्रत्येकी ₹५०,०००/- (पन्नास हजार रुपये) शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. शिष्यवृत्ती अंतर्गत बसवण्यात आलेल्या तीनही नाटकांचा ‘मानसरंग’ नाट्य-महोत्सव हा पाच नोव्हेंबर मराठी रंगभूमी दिवशी पुणे येथील ‘द बॉक्स’ ह्या रंगमंचावर केला जाणार आहे. या उपक्रमात प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ.मोहन आगाशे, नाटककार आणि समीक्षक डॉ.राजीव नाईक, लेखिका डॉ.अंजली जोशी आणि नाटककार डॉ.चंद्रशेखर फणसळकर मार्गदर्शक म्हणून सहभागी असणार आहेत.
सचिन शिंदे हे नाशिक येथे गेली दीड दशके ‘सोशल नेटवर्किंग फोरम’ ह्या त्यांच्या नाट्य संस्थेमार्फत कार्यरत आहेत. नाशिकमध्ये बालनाट्यांच्या माध्यमातून सुरू झालेली कारकीर्द १९९० नंतर अतुल पेठे यांच्या प्रयोग परिवारपर्यंत सचिन शिंदेंना घेऊन गेली आणि प्रायोगिक, वैचारिक, वैश्विक नाट्यचळवळीचं एक नवं दालन सचिनला मिळालं. सुरूवातीला अभिनेता म्हणून सचिननं यकृत, हृदय, ऐसपैस सोयीने बैस, शीतयुद्ध सदानंद यासारख्या अनेक नाटकातून अभिनय केला. प्रेमाची गोष्ट? या नाटकाच्या तंत्रज्ञ टीममध्येही अनेक कामं त्यानं सांभाळली. पुढे दिग्दर्शक म्हणून अनेक नाटकं व एकांकिका त्यानं बसवल्या. प्रामुख्याने हंडाभर चांदण्या, गढीवरच्या पोरी, मून विदाऊट स्काय, विसर्जन, हा वास कोठून येतोय, लिअर, नेब्युला यासह अनेक महत्वाची नाटकं त्याने दिग्दर्शित केली. आजचे आघाडीचे लेखक दत्ता पाटील आणि प्राजक्त देशमुख यांची अनेक नाटकं सचिन शिंदे यांनी दिग्दर्शित केली आहेत. त्याच्या नाटकांना झी गौरव, मटा सन्मान, नाट्यपरिषद पुरस्कार, राज्यनाट्य स्पर्धेत अनेक पुरस्कार मिळाले असून हंडाभर चांदण्या हे नाटक दिल्लीच्या भारंगम महोत्सवासह अनेक महोत्सवांचा मानकरी ठरलं आहे. सध्या सचिन शिंदे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातील नाट्यशास्त्र विभाग सांभाळत असून नाशिकमधील प्रायोगिक नाट्यचळवळ गेल्या दीड दशकात खोलवर रूजवण्यात सचिन शिंदे यांचा सिंहाचा वाटा आहे.
पत्रकार परिषदे मध्ये पुढे बोलताना डॉ. हमीद दाभोलकर यांनी असे सांगितले कि, मानसिक आरोग्याचा प्रश्न हा सध्याच्या कालखंडात एक महत्वाचा प्रश्न म्हणून समोर येत आहे. करोना नंतरच्या कालखंडात त्याचे गांभीर्य अधिक वाढले आहे. अजूनदेखील आपल्या समाजात मानसिक आजारांच्या विषयी पुरेशी माहिती नाही. मानसिक आजारांकडे कलंकाच्या नजरेतून बघितले जाते. पालकत्व, पती-पत्नी मधील ताण-तणाव, कामाच्या ठिकाणचे ताण,  मोबाईलचा वाढता वापर असा एक मोठा मानसिक आरोग्य आणि आजार यांचा पट आपल्या समोर आहे. या प्रश्नांना नाटकाच्या माध्यमातून भिडण्याचा ‘मानसरंग नाट्य-शिष्यवृत्ती’ आणि नाट्य-महोत्सव हा प्रयत्न आहे. बजाज ऑटो ह्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून याला आर्थिक मदत  मिळाली असल्याचे देखील त्यांनी नमूद केले. ‘मानसरंग’चे समन्वयक राजू इनामदार आणि रेश्मा कचरे ह्या वेळी उपस्थित होते

नाट्यक्षेत्रात विशेषतः प्रायोगिक रंगभूमीवर केलेल्या कामाचं समाधान वाटतं, यामुळे आणखी १० वर्षे नाट्यक्षेत्रात काम करण्याची ऊर्जा मिळेल अशी खात्री आहे. हा केवळ माझा बहुमान नसून नाशिक मधील सर्व रंगकर्मींचा सन्मान आहे. नाशिककर नाट्यकर्मी व रसिक यांच्या साथीने नाशिकच नाव जगभर पोहचविण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे.त्याचीच ही पावती.
– सचिन शिंदे

Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

14 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

14 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

14 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

14 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

14 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

14 hours ago