नाशिकमध्ये उभारले जाणार ’मराठी भाषा विकास केंद्र’

मराठी भाषामंत्री उदय सामंत यांची विधानसभेत घोषणा

मुंबई : प्रतिनिधी
राज्यात मराठी भाषेचा प्रसार आणि संवर्धन करण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून, नाशिकसह राज्यातील आठ शहरांमध्ये अत्याधुनिक ‘मराठी भाषा विकास केंद्रे’ उभारण्याची घोषणा मराठी भाषामंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत केली. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त हा महत्त्वाकांक्षी निर्णय घेण्यात आला आहे. आगामी वर्षभरात नाशिकमध्ये हे सुसज्ज केंद्र कार्यान्वित केले जाणार आहे. पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानसभेत उपस्थित झालेल्या चर्चेला उत्तर देताना सामंत यांनी ही माहिती दिली.
नाशिकमधील या प्रस्तावित केंद्रासोबतच पुणे, रत्नागिरी, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर, चंद्रपूर आणि कोल्हापूर येथेही अशी केंद्रे उभारली जाणार आहेत. राज्य शासन केवळ केंद्रावर अवलंबून न राहता स्वतःच्या स्तरावरही मराठीच्या जागतिक प्रसारासाठी काम करत आहे. याअंतर्गत लंडनमधील ऐतिहासिक महाराष्ट्र मंडळाच्या इमारतीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने ‘मराठी भाषा वैश्विक केंद्र’ सुरू करण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त, इतर भारतीय भाषांमधील उत्कृष्ट साहित्य मराठीत आणण्यासाठी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल साहित्यिकांना मदत करण्यासाठी यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने ’अनुवाद समिती’ स्थापन केली जाणार आहे.
मराठी भाषेच्या संवर्धनासाठी प्रशासकीय पातळीवरही मोठे बदल करण्यात येत आहेत. प्रत्येक जिल्ह्यात आता स्वतंत्र ‘मराठी भाषा अधिकारी’ नियुक्त करून त्यांना स्वतंत्र कार्यालय दिले जाणार आहे. तसेच 1956 च्या परिपत्रकानुसार शासकीय अधिकार्‍यांसाठी सक्तीची असलेली हिंदी भाषा परीक्षा आता रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला आहे. मराठीच्या प्रसारासाठी सर्वपक्षीय आमदारांची समिती पुढील 15 दिवसांत स्थापन करण्यात येणार असून, नवशिक्यांना मराठी शिकवणारे मोबाईल प आणि मुंबईत आशियातील सर्वोत्तम ‘मराठी भाषा भवन’ साकारण्याचे कामही वेगाने सुरू असल्याचे मंत्री डॉ. सामंत यांनी स्पष्ट केले

‘Marathi Language Development Centre’ to be set up in Nashik.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *