सरसंघचालक : मुंबईत ‘जेन-झी’सोबत विशेष संवाद कार्यक्रमात विचार
मुंबई : प्रतिनिधी
लोकशाही व्यवस्थेमध्ये संवाद अत्यंत महत्त्वाचा असून, जनआंदोलन किंवा विरोध प्रदर्शन करणे हेदेखील संवादाचेच एक प्रभावी माध्यम आहे, असे सरसंघचालक मोहन भागवत यांनी युवा परिषदेत म्हटले आहे. लोकशाही आणि संवादाबाबत त्यांचे हे विधान अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. मुंबईत जेन-झी म्हणजेच 15 ते 19 वयोगटातील तरुणांसोबत झालेल्या एका विशेष संवाद कार्यक्रमात त्यांनी आपले विचार मांडले.
तरुणांशी सुसंवाद साधताना भागवत यांनी आजच्या पिढीच्या मानसिकतेवर भाष्य केले. ते म्हणाले की, आजची नवी पिढी केवळ आज्ञापालन करत नाही, तर ती प्रत्येक गोष्टीवर तर्कशुद्ध प्रश्न विचारते. त्यामुळे त्यांना केवळ आदेश देण्यापेक्षा त्यांच्याशी संवाद साधून प्रत्येक गोष्टीमागील तर्क समजावून सांगणे आवश्यक आहे. लोकशाहीत कोणत्याही प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी किंवा सर्वसहमती घडवून आणण्यासाठी आंदोलन करणे गैर नाही. किंबहुना, आंदोलन योग्य नव्हते असे मी म्हणणार नाही, असे स्पष्ट करत त्यांनी तरुणांच्या प्रश्नांना संवादाच्या माध्यमातून सोडवण्यावर
भर दिला.
Mass movements and protest demonstrations are effective mediums of dialogue.