मराठा कुणबी जात प्रमाणपत्र रद्द

जरांगे आक्रमक; शिंदे, बावनकुळेंवर थेट आरोप

छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी
मराठवाड्यातील बीड, परभणी आणि छत्रपती संभाजीनगर येथील चार मराठा महिला लोकप्रतिनिधींचे कुणबी जातीचे प्रमाणपत्र जात पडताळणी समितीने रद्द केल्यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा तापला आहे. या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. प्रमाणपत्रे देण्याचा आणि ती रद्द करण्याचा हा कट सरकारकडूनच रचला जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला असून, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सांगण्यावरूनच ही प्रमाणपत्रे रद्द केली जात असल्याचे सांगत त्यांनी बावनकुळे यांच्या नार्को टेस्टची मागणी केली आहे.
याच प्रकरणावरून जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही थेट लक्ष्य केले आहे. शिंदेसाहेब, तुम्ही डबल गेम खेळताय का? असा सवाल करत त्यांनी फडणवीसांवर मराठा समाजाला अंगावर घेतल्याचा आरोप केला. तसेच, मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने याआधी पुढाकार घेणारे भाजप नेते प्रसाद लाड आणि मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील आता प्रमाणपत्रे रद्द होण्याच्या या घडामोडींवरगप्प का आहेत, असा संतप्त सवाल जरांगे यांनी उपस्थित केला.
मनोज जरांगे पाटील यांच्या या आरोपांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ स्पष्टीकरण दिले आहे. जात पडताळणी समितीचे कामकाज हे सर्वोच्च न्यायालयाने आखून दिलेल्या नियमांनुसार चालते आणि त्या प्रक्रियेत राज्य सरकारचा कोणताही हस्तक्षेप नसतो, असे फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. यासोबतच, चंद्रशेखर बावनकुळे यांनीही जरांगे यांच्या आरोपांवर आपली भूमिका स्पष्ट करत आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत.
जरांगे यांच्या या प्रश्नांना आणि आरोपांना उत्तर देताना राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. मराठा जात प्रमाणपत्र रद्द होण्याच्या प्रकरणावर राज्य सरकार पूर्णपणे अलर्ट असून, या प्रक्रियेत जर कुठे जाणीवपूर्वक गैरप्रकार झाल्याचे आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही विखे-पाटील यांनी दिली. तसेच, मंत्री उदय सामंत यांनीही आपण संबंधित समितीवर कार्यरत असल्याचे स्पष्ट करत, मनोज जरांगे पाटील यांच्या मनात निर्माण झालेला हा गैरसमज आपण लवकरच दूर करू, असा विश्वास व्यक्त केला आहे.

Cancellation of Maratha-Kunbi caste certificate

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *