मास्टरमाइंड प्रशांत वाडीलेला 17 जुलैपर्यंत पोलीस कोठडी

नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी
बहुचर्चित 160 कोटी रुपयांच्या ‘शालार्थ आयडी’ महाघोटाळ्यातील मुख्य सूत्रधार प्रशांत वाडीले याला नाशिकरोड न्यायालयाने 17 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती बागल यांच्या न्यायालयात वाडीलेला हजर करण्यात आले होते.
सरकारी तिजोरीला कोट्यवधींचा चुना लावणार्‍या या प्रकरणातील आरोपी वाडीलेला नाशिक पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) शनिवारी पहाटे धुळ्यातून अटक केली. या प्रकरणात अटक झालेला तो चौथा आरोपी आहे.
शालार्थ घोटाळ्याचा तपास सुरू झाल्यानंतर वाडीले पोलिसांना चकवा देत होता. मात्र, शनिवारी पहाटे चार वाजता एसआयटीच्या पथकाने त्याच्या धुळे येथील निवासस्थानी छापा टाकून त्याला झोपेतूनच ताब्यात घेतले.
तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. शाळांना मान्यता नसतानाही जुन्या सरकारी आदेशांचा गैरवापर करून शिक्षण विभागाच्या संकेतस्थळात
फेरफार करण्यात आल्याचा आरोप आहे. नाशिक विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयांतर्गत येणार्‍या नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांतील 841 शिक्षक व कर्मचार्‍यांच्या नियुक्त्या नियमबाह्य पद्धतीने दाखवण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. बनावट शालार्थ आदेश तयार करून प्रणालीमध्ये नोंदी करण्यात आल्या आणि शासनाकडून सुमारे 160 कोटी रुपयांचे वेतन व थकबाकी लाटल्याचा आरोप आहे.
तपासात वाडीलेच्या नावावर 54 शिक्षण संस्था आढळल्या असून, तो 65 आश्रमशाळांचा कारभार पाहत असल्याचे समोर आले आहे. साक्री आणि शिंदखेडा येथे त्याच्या दोन विनाअनुदानित शाळा आहेत. बनावट कागदपत्रांच्या आधारे शाळा व संस्थांचे जाळे उभे करून शेकडो शिक्षकांना बनावट नियुक्तीपत्रे देण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या महाघोटाळ्याप्रकरणी पोलिसांनी यापूर्वीच न्यायालयात तब्बल 11 हजार पानांचे दोषारोपपत्र दाखल केले आहे. 12 मार्च 2026 रोजी नाशिकरोड पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता मुख्य सूत्रधार वाडीले पोलिसांच्या ताब्यात आल्याने शिक्षण विभागातील आणखी काही अधिकारी व संबंधित व्यक्तींची चौकशी होण्याची शक्यता आहे. या तपासातून घोटाळ्याची आणखी मोठी व्याप्ती समोर येण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे.

Mastermind Prashant Vadile remanded to police custody until July 17.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *