– आनंदा जाधव
एरवी दीपावलीत पंधरा दिवस अगोदर गजबणार्या बाजारपेठेत यावर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे वसुबारसपासून गर्दीचा माहोल दिसू लागला. त्यातच वाढती महागाई विचारात घेता गरिबांनी दिवाळी कशी साजरी करावी, असा प्रश्न सामान्य नागरिकांना सतावत आहे. मात्र, दीपावली हा आनंदाचा, स्नेहाचा सण असल्यामुळे गरीब-श्रीमंत, उच्च-नीच असा भेदभाव न करता सर्वांना या उत्सवात सहभागी करून घेतले पाहिजे. आपल्या शेजारी राहणारे गरीब कुटुंब, शेतमजूर यांना दिवाळीचा फराळ देण्याबरोबरच शक्य असल्यास चांगले कपडे देऊन आपुलकीचे नाते निर्माण करून त्यांचीही दिवाळी गोड कशी होईल, त्यांनाही या सणाचा आनंद लुटता यावा यासाठी आपण स्वतःहून पुढाकार घेतला, तर खर्या अर्थाने दीपावली साजरी केल्याचे समाधान सर्वांच्या चेहर्यावर पाहावयास मिळेल.
दीपावली हा भारतीय परंपरेतील सर्वांत मोठा उत्सव. साहजिकच या उत्सवाची/सणाची महिनाभर आधीच लगबग सुरू होते. घराची स्वच्छता. सजावट, मुलांचे कपडे, गोड पदार्थ बनविण्यासाठी लागणारे साहित्य, आकाशकंदील, रंगीबेरंगी रांगोळ्या, बच्चेकंपनीसाठी फटाके, ओट्यावर, अंगणात, देवघरात तसेच पूजेसाठी लागणार्या विविध आकारांतील, रंगातील पणत्या या सगळ्या वस्तूंची तयारी अगोदरच करून ठेवली जाते. मांगल्याचा, प्रकाशाचा हा उत्सव साजरा करण्यासाठी आबालवृद्ध सारेच तत्पर असतात; परंतु यावर्षी कोरड्या दुष्काळात दीपावली आली आहे. त्यातच हातात आलेली पिके पाण्याअभावी वाया गेली. रात्रीचा दिवस करीत जी पिके हातात आली, त्यांना बाजारभावाने दणका दिला. परिणामी घरकुटुंबच दीपावली सण कसा करावा, या विवंचनेत असतानाच, ज्या शेतकर्याकडे कायमस्वरूपी शेतमजूर आहेत त्यांना या सणासाठी कशी आणि कोठून रक्कम द्यावी आणि घरात दीपावलीचा उत्सव कसा साजरा करावा अशा विवंचनेत बळीराजा सापडला आहे. बळीराजाची अशी व्यथा असतानाच जे मजूर दररोज मजुरी करून उदरनिर्वाह करतात त्यांनी या सणाची स्वप्ने कशी बघावीत? त्यांची दिवाळी म्हणजे शेतकर्याच्या शेतात.
निफाडच्या गोदाकाठ भागात शेजारील जिल्ह्यातील मजूर ऊसतोडणीसाठी डेरेदाखल झाले आहेत. या मजुरांच्या मुलांना ना शिक्षणाचा गंध ना नोकरीची अपेक्षा. दिवस उजाडण्यापूर्वीच उसाच्या फडात दाखल व्हायचे. दुपारपर्यंत ऊस तोडून त्याच्या मोळ्या बांधायच्या आणि दुपारनंतर ट्रक लोड करून कारखान्यावर पाठवावयाचा. त्यानंतर ऊसतोडणीतून मिळालेली बांडी विकून घरखर्च भागवायचा, हा या कुटुंबाचा नित्याचा दिनक्रम. त्यामुळे या कामगारांची दिवाळी उसाच्या फडातच. आपल्या आसपास अशी कितीतरी कुटुंबे आहेत की, ते कुणाच्या तरी आधाराची वाट शोधत असतात. परिणामी अशा कुटुंबाला आपण आधार देऊन त्यांनाही आपल्या या उत्साहात सहभागी करून घेतले तर आपल्यासाठी तो आनंद वेगळाच उत्साह वाढविणारा ठरणार आहे. यावर्षी कोरडा दुष्काळ, शेतीमालाचे पडलेले बाजारभाव आणि वाढती महागाई अशा वातावरणात हा उत्सव आला आहे. शेतकरी अडचणीत असल्याने बाजारपेठेतील आर्थिक उलाढालदेखील मंदावलेली पाहावयास मिळत असल्याने सर्वत्र शुकशुकाट असतानाच गेल्या दोन दिवसांपासून बाजारपेठेत गर्दीचा माहोल दिसू लागल्याने व्यावसायिकांना थोडाफार दिलासा मिळाला आहे. मात्र, नैसर्गिक आपत्ती, बाजारपेठेतील चढउतार हे सारे हेरूनच गेल्या काही वर्षांपासून एक करंजी मोलाची हा उपक्रम प्रत्येक शहरात राबविला जात आहे. त्याचे अनुकरण आता खेड्यातील सेवाभावी संस्थादेखील करू लागल्या आहेत. अनेक ठिकाणी तर वृद्धाश्रम, अनाथाश्रम, आश्रमशाळा, गरीब मुलांची वसतिगृहे, आदिवासी वाड्या -वस्त्या, पाडे याठिकाणी करंजी, लाडू, शंकरपाळे, चकल्या आदी मिष्टान्न पदार्थांचे वाटप करण्याबरोबरच रवा, गूळ, तेल, तूप, साखर, पीठ आदी किराणा साहित्याचे मोफत वाटप होऊ लागल्याने गरीब आदिवासी, निराधार यांनादेखील दीपावली सणाचा आनंद लुटता येऊ लागला. पण हे प्रत्येक वेळी होईलच याची खात्री नाही. त्यामुळे शहर, गावपातळीवर याची आधीपासूनच तयारी करून प्रत्येकाने यात खारीचा वाटा उचलावा.
लासलगाव येथे तर गेल्या काही दशकांपासून दत्ताजी पाटील प्रतिष्ठानकडून ना नफा ना तोटा या तत्त्वावर तयार मिठाई विक्री केली जाते. त्यास शेतमजुरांचा चांगला प्रतिसाद मिळतो. परिणामी या मिठाईला वाढता पाठिंबा बघता अनेक व्यावसायिक आता यात उतरले आहेत. शहरापासून ते खेड्यापर्यंत अशी तयार मिठाईची दुकाने दिसू लागली आहेत. दररोज मजुरी करणार्या कुटुंबीयांना दिवाळीचा फराळ बनविण्यास वेळ मिळत नाही. त्यांच्यासाठी हा तयार फराळ म्हणजे वेळेवर या उत्सवाचाआनंद लुटता यावा यासाठी एक प्रकारे केलेली तजवीज ठरावी. परिणामी असंख्य शेतमजूर दीपावलीच्या दिवशी असा तयार फराळ खरेदी करून या उत्सवाचा आनंद लुटतात. मात्र, ज्यांना हा फराळ खरेदी करण्यासाठीदेखील पैसा नाही अशा अनाथ नागरिकांसमवेत दीपावलीचा वेळ घालवावा, त्यांच्या आनंदात आपणही सहभागी व्हावे म्हणजेच गरीब-श्रीमंत, उच्च-नीच हा भेदभाव कमी होऊन खर्या अर्थाने माणुसकीचे दर्शन घडेल अन्यथा दरवर्षीच येते दिवाळी याप्रमाणे हे चक्र सुरूच राहील.
यावर्षीपासून आपण नवीन काही सुरुवात करीत आहोत आणि यावर्षीपासून हाती घेत असलेला वसा पुढेही कायम चालू ठेवू असा आशावाद करून त्याची अंमलबजावणी नियमित सुरू ठेवली तर त्यातून सकारात्मक ऊर्जा मिळेल.सेवाभावी कामात हातभार लावला म्हणून त्याचेही समाधान मिळेल. गरिबांची, अनाथांची दिवाळी गोड व्हावी यासाठी चाकरमानी, लोकप्रतिनिधी, अधिकारी, सधन कुटुंब यांनी यात पुढाकार घेऊन असा उपक्रम राबविणे सुरू केल्यास खर्या अर्थाने दीपावली साजरी केल्यासारखे होईल.
दीपावली हा सण काही मानवापुरताच मर्यादित नाही, तर या सणात प्रथम वसुबारस. म्हणजेच गायवासराची पूजा केली जाते. त्यासाठी दीपावलीची सुरुवात या दिवसापासून होते. त्यानंतर घरातील लक्ष्मीचे पूजन. धन, द्रव्याचे पूजन म्हणजेच लक्ष्मीपूजन. त्यानंतर बलिप्रतिपदा आणि भाऊ-बहीण यांच्या अतूट नात्यांचा म्हणजे भाऊबीज हा दिवस होय. परमेश्वराने या सणाची रचनाच मजेशीर केली आहे. मात्र, अलीकडे मोबाइल आणि सोशल मीडियाच्या काळात माणसामाणसांतील संवाद हरवत चालला आहे. माणूस यंत्राच्या गतीने धावत आहे. ऑनलाइनच्या जमान्यात सर्वकाही वस्तू घरपोच येत आहेत. त्यामुळे या कोलाहलात माणूस माणसाचे माणूसपण हरवत चालला आहे.त्यामुळे कुटुंबात, नातेसंबंधात दुरावा वाढताना दिसत आहे. पूर्वी एकत्र कुटुंबात साजरे होणारे हे सण आता पती-पत्नी आणि मुलगा-मुलगी यांच्यापुरतेच मर्यादित राहिले आहे. त्यामुळे अशा सणांचा गोडवा काहीसा कमी झाला आहे. गेल्या काही दशकांपूर्वी सण-उत्सव म्हटले की, गावातील, गल्लीतील, शेजारी एकत्र येत. त्यातून विचारांची देवाणघेवाण होत असे. एकमेकांच्या सुखदुःखाची आपुलकीने विचारपूस केली जात असे. घरापुढे रांगोळ्या काढण्याची आणि घर सजावटीची जणू स्पर्धाच पाहावयास मिळत असे.
या काळात पाहुणे कंपनी आपल्या घरी यावी. घर माणसांनी भरावे. बच्चेकंपनीची धमाल पाहावी, घराच्या आसपास असणार्या कुटुंबीयांना फराळाची देवाणघेवाण व्हायची. परिणामी अशा या दिवाळी सणासाठी सारेच उत्सुक असायचे. अशा वातावरणात येणार्या दिवाळीचा आनंददेखील काही औरच असायचा. बरे असो. काळाच्या ओघात बरेच काही बदल झाले आहेत. त्यामुळे ते आपल्याला स्वीकारावेच लागेल. वाढत्या महागाईच्या जमान्यात घरात बनविले जाणारे पदार्थ आता दुकानात विकत मिळू लागले आहेत. कापड घेऊन ड्रेस शिवण्यापेक्षा रेडिमेड कपड्यांना पसंती मिळू लागली आहे. धावपळीच्या जगात सण-उत्सवांचे महत्त्व कमी होत गेले. मात्र, दिवाळी सण त्यात खर्या अर्थाने वेगळा ठरत आहे. माणुसकी, स्नेहभाव आणि एकमेकांप्रति आदरभाव आजही या सणाला जोपासला जातो. म्हणूनच तर अनेक ठिकाणी गरीब कुटुंबांसोबत तसेच अनाथ मुलांसोबत, तर कुठे अनाथ आश्रमात दिवाळी साजरी करण्याची प्रथा रूढ होत आहे. यावर्षी दुष्काळी परिस्थिती विचारात घेऊन राज्य सरकारने प्रत्येक आमदार, मंत्री यांना शेतकर्यांसमवेत दीपावली साजरी करण्याचे निर्देश दिले आहेत. परिणामी यातूनच शेतकर्यांप्रति आदरभाव, स्नेह वाढण्यास मदत होईल.साहजिकच दीपावलीचा आनंद वृद्धिंगत होण्यास त्यातून मदतच होईल.
May the joy of Diwali be doubled!