आदिवासी जमीन बळकावल्याचा आरोप
नाशिक : प्रतिनिधी
आदिवासींच्या हक्काच्या जमिनी बेकायदेशीररीत्या बळकावल्याचा आरोप करत एका महिलेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील दुर्घटना टळली.
चांदवड तालुक्यातील कुंडाणे गावातील आणि नाशिक परिसरातील आदिवासींच्या हक्काच्या जमिनी बळकावण्याचा प्रयत्न केला जात असल्याने, तसेच अन्य प्रलंबित मागण्यांसाठी कुंडाणे गावातील महिलांचे मागील पंधरा दिवसांपासून गोल्फ क्लब मैदानावर आंदोलन सुरू होते. मात्र, प्रशासकीय पातळीवर या आंदोलनाची दखल घेण्यात न आल्याने महिलांनी सोमवारी (दि. 12) थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठून प्रवेशद्वारावर निदर्शने सुरू केली.
यावेळी जोरदार घोषणाबाजी सुरू असतानाच आंदोलनकर्त्या संगीत कडाळे यांनी अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली. यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या महिला पोलीस कर्मचार्यांनी हस्तक्षेप करीत महिलेचे समजूत काढली. त्यामुळे पुढील दुर्घटना टळली.
या आहेत मागण्या
कुंडाणेे येथील गट नं. 193/1, 194 व 195 जमिनीची चौकशी करण्यासाठी विशेष समिती स्थापन करावी, बेकायदेशीर ताबा हस्तांतरण आढळल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करावा, आदिवासी समाजाची बाजू निष्पक्षपणे ऐकून घ्यावी, बोगस आदिवासी जात प्रमाणपत्रांची चौकशी करावी आदी.
अधिकार्यांना हाताशी धरून नाशिक शहरालगतच्या आदिवासींच्या जमिनी बेकायदेशीररीत्या बळकावण्याचे काम सुरू आहे. यातील काही अधिकार्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. सध्या हे अधिकारी फरार असून, त्यांना शोधून तत्काळ अटक करावी. – सर्जेराव भारमल, सदस्य, बिरसा मुंडा संघटना
Woman attempts self-immolation outside the District Collector’s office.