14 मेपासून स्टार प्रवाहवर मी होणार सुपरस्टार

स्टार प्रवाहच्या मी होणार सुपरस्टार छोटे उस्तादचा महाअंतिम सोहळा नुकताच पार पडला. या पर्वाला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला. छोट्या उस्तादांनी आपल्या सुरेल गाण्यांनी या पर्वाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं. छोट्या उस्तादांच्या या धमाकेदार पर्वानंतर श्रीगणेशा होतोय नव्या पर्वाचा. मी होणार सुपरस्टार…आवाज कुणाचा महाराष्ट्राचा’ या नव्या शोमध्ये छोट्यांपासून ते मोठ्यांपर्यंत म्हणजेच 4 ते 70 या वयोगटातील स्पर्धकांना आपलं टॅलेण्ट दाखवण्याची संधी मिळणार आहे. सलील कुलकर्णी, बेला शेंडे, आदर्श शिंदे परिक्षणाची धुरा सांभाळणार असून अभिनेता पुष्कर श्रोत्री सूत्रसंचालनाची भूमिका पार पाडणार आहे. या कार्यक्रमाची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निवड चाचणी घेण्यात आली. या निवडचाचणीला भरघोस प्रतिसाद मिळाला असून महाराष्ट्राभरातून 71 स्पर्धकांची निवड करण्यात आली. या 71 जणांमधून 26 स्पर्धक मेगा ऑडिशनसाठी निवडण्यात आले आहेत. या कार्यक्रमांचे वेगळेपण सांगताना आदर्श शिंदे म्हणाला, मला सगळ्यात जास्त कौतुकाचे हे वाटते की महाराष्ट्रात वेगवेगळ्या पद्धतीचं म्युझिक ऐकायला मिळते. महाराष्ट्रातले संगीतप्रेमी या सगळ्या संगीताचे फ्युजन करुन काहीतरी हटके करण्याचा प्रयत्न करत असतात. अशाच हटके प्रयत्नांना स्टार प्रवाह वाहिनी या कार्यक्रमातून हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करुन देत आहे. काळाप्रमाणे संगीत ही समृद्ध होत जातंय. मी होणार सुपरस्टार आवाज कुणाचा महाराष्ट्राचा’च्या मंचावरचं टॅलेण्ट थक्क करणारे आहे. 4 ते 70 वयोगटातील स्पर्धक आणि सोबतीला मनाला भावणारीं गाणी लाईव्ह ऐकायला मिळणं ही माझ्यासाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. महाराष्ट्राचं लोकसंगीत, बीटबॉक्सर्स, रॅपर्स, बॅकिंग व्होकल्स, ग्रुप सिंगिंग, सोलो, ड्युएट, हार्मनिज हे सगळं एका मंचावर ऐकायला मिळणं ही प्रेक्षकांसाठी पर्वणी असेल. आजवर माझ्या गुरुजनांकडून मी जे शिकलो ते सारंकाही या स्पर्धकांसोबत शेअर करणार आहे.’
हे पर्व स्पर्धकांपेक्षा परिक्षकांसाठी अवघड जाणार आहे अशी भावना बेला शेंडे यांनी व्यक्त केली. 4 ते 70 हा वयोगट आहे त्यामुळे प्रेक्षकांना याचं नक्की आश्चर्य वाटेल की यातला बेस्ट स्पर्धक कसा निवडणार. मला वाटतं वयाचं बंधन कश्यालाचा नसतं. हवं असतं ते पॅशन. त्यामुळे गाणं मग ते कोणत्याही वयोगटातील स्पर्धकाने गायलं तरी ते तुम्हाला निखळ आनंद देतं. मी होणार सुपरस्टार आवाज महाराष्ट्राचा हा कार्यक्रम म्हणजे नुसती स्पर्धा नसून संगीतमय आनंद देणारा सोहळाच आहे असे मत बेला शेंडे यांनी व्यक्त केले.
स्टार प्रवाह वाहिनीचे आभार की त्यांनी अत्यंत आगळं वेगळं पर्व मला जज करण्याची संधी दिली. महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून आलेल्या स्पर्धकांना हा मंच स्वत:ला सिद्ध करण्याची संधी देत आहे. गाण्याचे वेगवगळे प्रकार या मंचावर सादर होणार आहेत आणि हेच या कार्यक्रमाचं वेगळेपण आहे अशी भावना सलील कुलकर्णी यांनी व्यक्त केली.’
मी होणार सुपरस्टारच्या मंचावर आजवर फक्त आणि फक्त मराठी गाणी सादर करण्यात आली आहेत. यासोबतच या कार्यक्रमात सादर होणारी जुगलबंदी प्रेक्षकांच्या पसंतीला उतरली आहे. त्यामुळे या पर्वातही दर्जेदार मराठी गाण्यांचा आस्वाद प्रेक्षकांना घेता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *