उपलब्धतेचा तातडीने आढावा
नाशिक : प्रतिनिधी
नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणार्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विविध विकासकामांना वेग आला असतानाच, या कामांसाठी आवश्यक असलेल्या गौण खनिजाच्या तुटवड्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुरूम, खडी, गिट्टी, दगड आणि वाळू यांचा पुरवठा वेळेत होत नसल्याने काही कामांच्या गतीवर परिणाम होत असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त झाल्या आहेत. निर्धारित मुदतीत सिंहस्थाची कामे पूर्ण करण्यासाठी गौण खनिजाचा पुरवठा सुरळीत करणे आवश्यक असल्याने जिल्हा प्रशासनाने तातडीने पावले उचलली आहेत. याच पार्श्वभूमीवर खाणपट्टेधारक आणि सिंहस्थाच्या कामांशी संबंधित ठेकेदारांची बैठक आज सायंकाळी 5 वा. अल्पबचत भवन येथे आयोजित केली आहे.
सिंहस्थासाठी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरात रस्ते, पूल, वाहतूक व्यवस्था, पाणीपुरवठा, मलनिस्सारण, साधुग्राम तसेच आवश्यक विविध पायाभूत सुविधांची कामे सुरू आहेत. यामध्ये रस्ते विकासाच्या कामांचा मोठा वाटा असून, रस्त्यांच्या भरावापासून ते सबग्रेड, सब-बेस आणि बेस तयार करण्यापर्यंत मुरूम व खडीची मोठ्या प्रमाणावर आवश्यकता असते. तसेच काँक्रीट आणि डांबरीकरणासाठीही विविध प्रकारच्या गौण खनिजाची गरज भासते. त्यामुळे गौण खनिजाचा पुरवठा खंडित झाल्यास पायाभूत सुविधांच्या कामांवर थेट परिणाम होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी साहित्य उपलब्धतेच्या अडचणींमुळे कामांचा वेग मंदावल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे प्रशासनाने उपलब्ध साठा, मागणी आणि पुरवठा यांचा एकत्रित आढावा घेण्याचा निर्णय घेतला आहे.
कोणत्या ठेकेदाराला किती खनिज?
बैठकीत सिंहस्थाच्या विविध कामांसाठी कोणत्या ठेकेदाराला कोणत्या प्रकारचे गौण खनिज, किती प्रमाणात आणि कोणत्या कालावधीत आवश्यक आहे, याची माहिती संकलित केली जाणार आहे. त्यानुसार अधिकृत खाणपट्टेधारकांकडील उपलब्ध साठा आणि पुरवठ्याची क्षमता तपासली जाणार असून, मागणीच्या तुलनेत उपलब्धतेतील तफावत दूर करण्यासाठी नियोजन केले जाणार आहे.
रस्त्यांच्या कामांना सर्वाधिक गरज
सिंहस्थासाठी सुरू असलेल्या विविध रस्ते प्रकल्पांना गौण खनिजाची सर्वाधिक आवश्यकता आहे. रस्त्यांचा भराव, मजबुतीकरण, सब-बेस, बेस तसेच काँक्रीटच्या कामांमध्ये मुरूम आणि खडीचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. त्यामुळे या साहित्याचा नियमित पुरवठा न झाल्यास रस्त्यांच्या कामांचा वेग मंदावण्याची शक्यता आहे. दरम्यान, गौण खनिजाच्या उपलब्धतेचा प्रश्न बैठकीतून मार्गी लागल्यास सिंहस्थाच्या कामांसाठी आवश्यक साहित्याचा पुरवठा सुरळीत होऊन रखडलेल्या किंवा संथ झालेल्या कामांना पुन्हा गती मिळण्याची अपेक्षा आहे. सिंहस्थाच्या कामांसाठी अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर होत असलेली ही बैठक त्यामुळे प्रशासन आणि ठेकेदारांसाठी निर्णायक ठरण्याची
शक्यता आहे.
Mining lease holders-contractors meeting today