नाशिक : प्रतिनिधी
नाशिक महापालिकेच्या विविध विषय समिती सदस्यांची नियुक्ती महापौर हिमगौरी आहेर-आडके यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (दि.20) पार पडली. यावेळी गटनेत्यांनी सोपवलेल्या नावानुसार महापौरांनी नावाची घोषणा केली. दरम्यान, स्थायी समितीप्रमाणेच विषय समितीवर भाजपचा वरचष्मा दिसून आला. नऊपैकी पाच सदस्य भाजपच्या वाट्याला आले. तर दोन जागा शिंदेसेना, ठाकरे सेना व राष्ट्रवादीला प्रत्येकी एक जागेवर संधी मिळाली.
महासभा सुरू होताच महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी महिला व बालकल्याण, शहर सुधारणा, वैद्यकीय सहाय्य व आरोग्य, विधी आणि शिक्षण या पाच समित्यांवर प्रत्येकी नऊ सदस्यांची नियुक्ती करण्यात आली. नियुक्तीनंतर सर्व नवनियुक्त सदस्यांचा महासभेत सत्कार करण्यात आला. महापालिका निवडणुका होऊन सात महिन्यांचा अवधी उलटूनदेखील विषय समिती सदस्यांची नियुक्ती रखडली होती. अखेर सदर सदस्यांची नियुक्ती गुरुवारी करण्यात आली. यावेळी भाजपच्या काही नगरसेवकांची अनपेक्षित नियुक्ती केल्याने संबंधितांना आश्चर्याचा धक्का बसला. महापौरांनी नियुक्तीची घोषणा करताच सभागृहातील सदस्यानी बाके वाजवत अभिनंदन केले. समित्यांच्या माध्यमातून महत्त्वाचे विषय मार्गी लागणार आहेत. महानगरपालिकेच्या कामकाजात समित्यांना महत्त्वाची भूमिका असते. महिला व बालकल्याण, शहर सुधारणा, आरोग्य, विधी आणि शिक्षण या पाच क्षेत्रांशी संबंधित विषयांवर नवनियुक्त सदस्यांच्या माध्यमातून प्रभावीपणे कामकाज होणे अपेक्षित आहे. 45 सदस्यांच्या नियुक्तीनंतर या समित्यांच्या कामकाजाला आता गती मिळणार आहे.
समितीनुसार सदस्यांची नियुक्ती
महिला व बालकल्याण समिती :
ज्योती जोंधळे, इंदुबाई नागरे, प्रमिला मैंद, चित्रा तांदळे, भारती धिवरे, स्वाती भामरे, कोमल मेहरोलिया, रूपाली निकुळे आणि सीमा ठाकरे
शहर सुधारणा समिती :
रूपाली नन्नावरे, उषा बेंडकोळी, श्वेता भंडारी, जयंत जाचक, संध्या कुलकर्णी, प्रवीण रमेश जाधव, प्रमोद पालवे, योगेश भोर, जागृती गांगुर्डे
वैद्यकीय सहाय्य व आरोग्य समिती :
वाळू काकड, सविता काळे, राहुल शेलार, साधना मटाले, सतीश निकम, पूनम महाले, नितीन दातीर, वैशाली दळवी, डॉ. हेमलता पाटील
विधी समिती :
जुई शिंदे, अंकिता शिंदे, विश्वास नागरे, राजेंद्र आहेर, भूषण राणे, कविता नाईक, आशा तडवी, संजीवनी हंडोरे, मुकेश शहाणे
शिक्षण समिती :
कैलास मुदलियार, नयना जाधव, किरण राजवाडे, सीमा पवार, छाया देवांग, सोनाली भंदुरे, सचिन मराठे, शरद मोरे (सर), शरद फडोळ
BJP Dominates Subject Committees