मनिला : वृत्तसंस्था
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मंगळवारी (दि. 17) फिलिपिन्सची राजधानी मनिला येथे भेट झाली. ‘क्वाड’ शिखर परिषदेच्या निमित्ताने दोन्ही नेते एकत्र आले. भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया या चार देशांच्या नेत्यांनी हिंद-प्रशांत क्षेत्रातील सुरक्षा, व्यापार, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि आर्थिक सहकार्यावर चर्चा केली. भारत-अमेरिका संबंधांमध्ये व्यापार आणि आयातशुल्कावरून मतभेद असतानाच झालेल्या या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
‘क्वाड’च्या बैठकीपूर्वी मोदी आणि ट्रम्प यांनी एकत्र छायाचित्रासाठी उपस्थिती लावली. यावेळी ट्रम्प यांनी मोदींचे कौतुक करत त्यांचा उल्लेख आपले मित्र आणि उत्तम नेते असा केला. हलक्याफुलक्या वातावरणात बोलताना ट्रम्प म्हणाले, ‘मोदी अत्यंत कणखर व्यक्ती आहेत. जपानच्या पंतप्रधान सनाए ताकाइची कदाचित त्यांच्यापेक्षाही कणखर असतील. अल्बानीज आणि मी मात्र ठीक आहोत.’ त्यांच्या या विधानामुळे उपस्थितांमध्ये हास्याची लकेर उमटली. पंतप्रधान मोदी यांनी ‘क्वाड’ ही भारतासाठी रचनात्मक आणि विश्वासार्ह भागीदारी असल्याचे स्पष्ट केले. सागरी सुरक्षा, सुरक्षित पुरवठा साखळी, नवीन तंत्रज्ञान आणि आपत्ती व्यवस्थापन या क्षेत्रांत चारही देशांनी एकत्रितपणे ठोस उपाययोजना करण्यावर त्यांनी भर दिला. या बैठकीतून पुढील टप्प्यातील सहकार्याची निश्चित उद्दिष्टे ठरतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
विशेष म्हणजे, 2007 मध्ये याच मनिला शहरात चार देशांच्या अधिकार्यांची पहिली बैठक झाली होती. त्यानंतर 2017 मध्ये याच ठिकाणी ‘क्वाड’ संवादाला पुन्हा चालना मिळाली होती. त्यामुळे मनिलातील यंदाची शिखर परिषद ऐतिहासिकदृष्ट्याही महत्त्वाची असल्याचे मोदी यांनी नमूद केले.
या बैठकीत हिंद-प्रशांत क्षेत्रातील मुक्त सागरी वाहतूक, प्रादेशिक स्थैर्य, महत्त्वाच्या खनिजांचा पुरवठा, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि पायाभूत सुविधांमधील सहकार्याला प्राधान्य देण्यात आले. बळाचा वापर किंवा दबावाच्या माध्यमातून प्रादेशिक परिस्थिती बदलण्याच्या प्रयत्नांना चारही देशांनी विरोध दर्शविला. पुरवठा साखळी मजबूत करण्याबरोबरच आर्थिक दबावाच्या उपाययोजनांबाबतही चिंता व्यक्त करण्यात आली.
दरम्यान, भारत आणि अमेरिकेदरम्यान आयातशुल्क, बाजारपेठेतील प्रवेश आणि व्यापार करारावरून चर्चा सुरू आहेत. अमेरिकेचे पाकिस्तानशी वाढते संबंध हाही दोन्ही देशांतील चर्चेचा संवेदनशील मुद्दा राहिला आहे. अशा पार्श्वभूमीवर मोदी-ट्रम्प यांची प्रत्यक्ष भेट महत्त्वाची मानली जात आहे. मात्र, या भेटीत स्वतंत्र द्विपक्षीय चर्चा झाली किंवा व्यापारविषयक मतभेदांवर कोणताही अंतिम निर्णय झाला, याची अधिकृत पुष्टी उपलब्ध झालेली नाही.
2024 नंतर प्रथमच ‘क्वाड’च्या चारही देशांचे प्रमुख शिखर परिषदेसाठी एकत्र आले. ट्रम्प यांच्या दुसर्या अध्यक्षीय कार्यकाळातील ही पहिलीच ‘क्वाड’ नेत्यांची परिषद ठरली. त्यामुळे व्यापारातील मतभेद कायम असले, तरी प्रादेशिक सुरक्षा आणि सामरिक सहकार्याच्या मुद्द्यांवर चारही देशांनी एकत्र काम करण्याचा निर्धार या बैठकीत व्यक्त केला.
Modi-Trump meeting in Manila; a new direction for ‘Quad’ cooperation!
कोरोना काळातील फोनवरून आरोप-प्रत्यारोप मुंबई : प्रतिनिधी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुण्यातील पुतळा अनावरण…
सिडको : प्रतिनिधी सातपूर औद्योगिक वसाहतीत मंगळवारी (दि. 17) दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक होऊन…
नाशिक वगळता सर्व तालुक्यांचा समावेश, मंत्रिमंडळ उपसमितीचा निर्णय मुंबई : प्रतिनिधी नाशिक जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या…
मुंबई : विशेष प्रतिनिधी ब्रिटनचे भावी राजे, त्यांच्या मागे बसलेल्या राजकन्या आणि दिमतीला चक्क भारतीय…
♦ लाड यांचे शरद पवारांना पत्र ♦ सुप्रिया सुळे यांची संयमी भूमिका ♦ शहा, फडणवीसांवर…
- डॉ. किशोर पवार उकळत्या पाण्यात केवळ तीन मिनिटे ठेवलेल्या चहाच्या पिशवीतून (टी बॅग) सुमारे…