34 गावांतील जमिनी संपादनाच्या प्रक्रियेत, सिन्नरमधील 23 गावांचा समावेश
सिन्नर : प्रतिनिधी
नाशिकरोड ते साईनगर शिर्डी या प्रस्तावित दुहेरी रेल्वेमार्ग प्रकल्पाच्या भूसंपादन प्रक्रियेला वेग आला असून, जिल्हा प्रशासनाने त्यासाठी सक्षम प्राधिकार्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. नाशिक जिल्ह्यातील 34 गावांमधील जमीन संपादित करण्यात येणार असून, त्यात सिन्नर तालुक्यातील 23 गावांचा समावेश आहे. संबंधित गटांची यादी सोमवारनंतर जाहीर होणार असून, त्यानंतर प्रत्यक्ष भूसंपादन प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.
मध्य रेल्वेकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावाच्या आधारे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या भूसंपादन शाखेने कार्यवाही सुरू केली आहे. रेल्वे अधिनियम 1989 (सुधारित 2008) आणि केंद्र शासनाच्या अधिसूचनेनुसार ही प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. सिन्नर तालुक्यातील गावांसाठी निफाडचे उपविभागीय अधिकारी, तर नाशिक तालुक्यातील गावांसाठी उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) यांची सक्षम प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
उपविभागीय अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांनी सांगितले की, 2013 च्या भूसंपादन कायद्यानुसार रेडीरेकनर दराच्या आधारे शेतकर्यांना मोबदला दिला जाईल. रेल्वे अधिनियमांतर्गत ही प्रक्रिया कमी कालावधीत पूर्ण करण्याचे नियोजन असून, गट क्रमांकांची यादी जाहीर होताच पुढील कार्यवाही सुरू होईल. दरम्यान, प्रस्तावित रेल्वेमार्गाची अंतिम लांबी, स्थानकांची संख्या किंवा त्यांची ठिकाणे अद्याप निश्चित करण्यात आलेली नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. रेल्वे मंत्रालयाच्या यंत्रणेमार्फत मार्गाचे प्राथमिक आरेखन पूर्ण झाले असून, काही ठिकाणी फेरसर्वेक्षणानंतर किरकोळ बदल होण्याची शक्यता आहे.
या गावांतून धावणार रेल्वे
प्रस्तावित रेल्वेमार्गासाठी सिन्नर तालुक्यातील कुंदेवाडी, वडझिरे, दातली, पाथरे खुर्द, दुसंगवाडी, खोपडी खुर्द, पांगरी खुर्द, मलढोण, खंबाळे, कुंदेवाडी, मांजरे, सिन्नर, फुलेनगर, ब्राह्मणवाडे, मुसळगाव, देशवंडी, जायगाव, पांगरी बु., वावी, सायाळे, पाटपिंप्री, बारागावपिंप्री, भोकणी आणि सुंदरपूर या गावांचा समावेश आहे. तर नाशिक तालुक्यातील विहितगाव, बेलतगव्हाण, चांदगिरी, जाखोरी, देवळाली, चेहेडी बु., संसरी, मोहगाव, बाभळेश्वर, पंचक आणि चाडेगाव ही गावेही प्रकल्पाच्या हद्दीत येणार आहेत.
Momentum for Nashik-Shirdi double railway line