मक्तेदारीमुळे नोकर्‍या नाहीत, महागाई वाढतेय!

फिक्कीतील भाषणावरून राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

नवी दिल्ली : प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी (दि. 19) फिक्कीच्या शताब्दी अधिवेशनात उद्योजकांना टोमणा मारत ‘टॅक्स कमी केला तरी तुम्ही पगार वाढवला नाही आणि नोकर्‍या दिल्या नाहीत. तुमची भूक इतकी आहे की, पोटच भरत नाही,’ असे म्हटले होते. यावर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी (दि. 20) जोरदार पलटवार केला. ‘मोदीजी, हा त्यांच्यावर आरोप नाही, ही तुमचीच कबुली आहे. भूक कोणाची आहे, हे संपूर्ण देशाला माहीत आहे.”

विमानतळ, बंदरे, खाणी, जंगले, वीज, कोळसा, रस्ते सगळे ज्यांच्या नावे करून दिले, त्यांनी किती नोकर्‍या निर्माण केल्या? असा सवाल त्यांनी केला. 2014 मध्ये 30% असलेला कॉर्पोरेट कर 22% पर्यंत कमी करूनही आणि बारा लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर प्राप्तिकर माफ करूनही रोजगार का वाढला नाही, या मोदींच्या प्रश्नाला राहुल गांधी यांनी सरकारच्या धोरणांचीच अपयशाची कबुली म्हटले आहे.
राहुल म्हणाले की, नोकर्‍या देणारे छोटे व्यापारी आणि सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग (एमएसएमई) यांना नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने उद्ध्वस्त केले, तर इमानदारीने स्पर्धा करणार्‍या मोठ्या कंपन्यांसाठी मैदानच संपवून टाकले. मक्तेदारी नोकर्‍या देत नाही, महागाई वाढवते आणि स्पर्धा संपवते. तुम्ही करा, आम्ही बघून घेऊ? मोदीजी, लूट तुम्ही आणि तुमच्या मित्रांनी केली- देशाने पाहिले आणि पाहत आहे, असा थेट आरोप त्यांनी केला. भाषणावर टाळ्या न वाजल्याने मोदी नाराज झाल्याचा टोला लगावत गांधी म्हणाले की, सरकारच्या धोरणांनी उद्योजक, छोटे व्यापारी, महागाईने त्रस्त गरीब-मध्यमवर्ग आणि बेरोजगार तरुण – कोणालाच टाळ्या वाजवण्यासारखे ठेवले नाही, त्यामुळे “टाळ्या आणि थाळ्या आता उरलेल्या भक्तांकडूनच वाजवून घ्या.” याच मुद्द्यावर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनीही मोदींनी 12 वर्षांनंतर जाग आल्यासारखे विरोधी पक्षनेत्यासारखे बोलल्याची टीका केली असून सरचिटणीस जयराम रमेश यांनी मोदींना लवकरच ‘माजी पंतप्रधान’ होण्याची जाणीव झाल्याचे म्हटले आहे.

Monopoly leads to a lack of jobs and rising inflation!

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *