मनपा आयुक्तांचा मोर्चा शहरातील डीपी रस्त्यांकडे

नाशिक : प्रतिनिधी
महापालिका आयुक्त तथा प्रशासक रमेश पवार यांनी ज्या दिवसापासून नाशिक महानगरपालिका आयुक्तपदाची जबाबदारी स्वीकारली, तेव्हापासून त्यांनी विविध प्रश्‍न हाताळत ते तडीस नेत आहेत. गंगाघाट, वाहतूक बेटे सुशोभीकरण, अनावश्यक कामांना कात्री, कामकाजात सुसूत्रता आणण्यासाठी अधिकारी-कर्मचार्‍यांना ठरवून दिलेली वेळ आदींसह इतर विषय त्यांनी यशस्वी हाताळले. दरम्यान, आयुक्तांनी नाशिकरोड, पूर्व, पंचवटी, पश्‍चिम, सिडको व सातपूर या सहा विभागांतील डीपी रस्त्यांकडे मोर्चा वळविला आहे. प्रत्येक विभागातून किमान दोन डीपी रस्त्यांवरील अतिक्रमण काढण्याच्या सूचनाच आयुक्तांनी विभागीय अधिकार्‍यांसह झोनल अधिकार्‍यांना दिल्याचे समजते आहे. असे झाल्यास कित्येक वर्षांपासून डीपी रस्ते मोकळे श्‍वास घेतील.
नाशिक शहरात असलेल्या अतिक्रमणावर गेल्या काही दिवसांत कारवाई करत पक्क्या बांधकामासह इतर अनधिकृत बांधकामे पाडण्यात आली. आता शहरातील डीपी रस्ते अतिक्रमणमुक्त केली जाणार आहेत. या रस्त्यांचा सध्या श्‍वास कोंडला आहे. वाहतुकीला अडसर होऊन वाहतूक कोंडी होण्याचे प्रकार या ठिकाणी होताना दिसतात. टपर्‍या टाकून रहदारीला अडथळे येत आहेत. काही ठिकाणी रस्त्यापर्यंत काहींचे अनधिकृत बांधकाम झालेले आहेत. यावर कारवाई करण्यात येणार आहे. नाशिकरोड परिसरातील मुक्तिधामसह शहरातील डीपी रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यात येणार आहे. शहरातील अनेक ठिकाणी राजकीय पदाधिकार्‍यांच्या आशीर्वादाने महत्त्वाच्या रस्त्यावर हातगाडे, टपर्‍या थाटल्या आहेत. शासकीय व अशासकीय ठरावाच्या माध्यमातून अनेकदा अतिक्रमणाविरोधात कारवाई करण्यासाठी गेलेल्या अधिकारी-कर्मचार्‍यांना माघारी फिरावे लागते. मात्र, आता होणार्‍या अतिक्रमण मोहिमेत प्रशासन कोणतेही ठराव न पाहता थेट कारवाई करणार आहे. शहरातील पंचवटी, सातपूर, नाशिकरोड भागात यापूर्वी अतिक्रमण मोहीम राबवून कारवाई करण्यात आली आहे. आयुक्तांच्या पाहणीत शहरातील जे डीपी रस्ते आहेत, त्यातील बहुतेकांवर अतिक्रमण होऊन हे रस्ते अरुंद झाले आहेत. यावर उपाय म्हणून सहाही विभागातील अधिकार्‍यांना त्यांच्या एका विभागातून दोन डीपी रस्ते घेऊन ते अतिक्रमणमुक्त करण्याच्या सूचना दिल्या आहेत. एक -दोन दिवसात यावर तात्काळ कार्यवाही होऊ शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *