तीस शाळांपर्यंत विस्तार केला जाणार
नाशिक : प्रतिनिधी
नाशिक : प्रतिनिधी
शहरातील शाळा परिसर अधिक सुरक्षित, शिस्तबद्ध आणि विद्यार्थ्यांसाठी नाशिक महापालिकेने अनुकूल करण्याच्या दिशेने शहरातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले आहे. महापालिकेने आयटीडीपी अर्थात वाहतूक आणि विकास धोरण संस्थेच्या तांत्रिक सहकार्याने या अभिनव उपक्रमाची सुरुवात केली आहे.
या उपक्रमाची सुरवात किलबिल सेंट जोसेफ हायस्कूल आणि डॉन बॉस्को येथे करण्यात आली आहे. भविष्यात शहरातील सुमारे 30 शाळांपर्यंत टप्प्याटप्प्याने विस्तार केला जाणार आहे. शाळा प्रशासन, पालक, विद्यार्थी, शालेय वाहनचालक, महानगरपालिका अधिकारी व वाहतूक पोलीस यांच्याशी चर्चा करून स्थानिक गरजा समजून घेत या उपक्रमाचा आराखडा तयार करण्यात आला. शहरातील विविध शाळांजवळील अपघातप्रवण क्षेत्रांचा भौगोलिक माहिती प्रणाली (जीआयएस)च्या माध्यमातून अभ्यास करण्यात आला. त्यानंतर प्रत्यक्ष क्षेत्रीय पाहणी, वाहतुकीची घनता, स्थानिक परिस्थिती व महापालिकेचा ट्रॅफिक सेल आणि वाहतूक पोलिसांशी समन्वय साधून डॉन बॉस्को शाळा मार्गाची निवड निश्चित करण्यात आली. या मार्गावर डॉन बॉस्को हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तसेच किलबिल सेंट जोसेफ हायस्कूल या प्रमुख शैक्षणिक संस्था असून, सुमारे तीन हजारांहून अधिक विद्यार्थी दररोज या परिसरात ये-जा करतात. याशिवाय अवघ्या चारशे मीटर परिसरात विविध क्रीडा सुविधा उपलब्ध असल्याने या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते.
विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित आणि सुसंस्कृत सार्वजनिक परिसर निर्माण करणे, ही शहर विकासाची महत्त्वाची जबाबदारी आहे. हा उपक्रम भविष्यात नाशिकसाठी आदर्श ठरणारा उपक्रम असेल.
– हिमगौरी आहेर-आडके, महापौरशाळा परिसर अधिक सुरक्षित आणि शिस्तबद्ध करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाची भूमिका बजावेल. विद्यार्थ्यांच्या दैनंदिन प्रवासात सुरक्षितता सुनिश्चित करणे ही महापालिकेची प्राथमिकता आहे.
– मनीषा खत्री, आयुक्त, नाशिक महापालिका