सुटकेसमध्ये फेकून दिलेल्या महिलेच्या हत्येचा तपास लावण्यात आडगाव पोलिसांना यश
पंचवटी : प्रतिनिधी
एका महिलेची निर्घृण हत्या करून तिचा मृतदेह सुटकेसमध्ये कोंबून तपोवनातील केवडीबन भागातील गो सेवा ट्रस्टजवळ फेकून दिल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली होती. या मृत महिलेची ओळख पटवण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. मात्र, आडगाव आणि उपनगर पोलिसांनी संयुक्तरीत्या कौशल्याने तपास करत अवघ्या 72 तासांत या थरारक हत्याकांडाचा छडा लावला आहे. चारित्र्याच्या संशयावरून हा खून झाल्याचे स्पष्ट झाले असून, पोलिसांनी संशयित आरोपीला थेट कर्नाटकच्या मंगळूरमधून ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत महिलेचे नाव सुनेत्रा विश्वकर्मा (वय 30) असे असून, संशयित आरोपी गोपी गोसावी (वय 35) याच्यासोबत तिचे प्रेमसंबंध होते. दोघेही उपनगर परिसरामध्ये भाड्याने खोली घेऊन एकत्र राहत होते. शनिवार, 13 जून रोजी रात्री गोपी हा दारूच्या नशेत घरी आला. यावेळी दोघांमध्ये चारित्र्याच्या संशयावरून जोरदार वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, गोपीने रागाच्या भरात कपड्याने तोंड दाबून सुनेत्राची निर्घृण हत्या केली. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याने मृतदेह सुटकेसमध्ये कोंबला आणि तपोवनातील निर्जन स्थळी फेकून दिला.
महिलेची ओळख पटवणे हे पोलिसांसाठी सर्वात मोठे आव्हान होते. तपासादरम्यान सुनेत्राच्या बहिणीने मृतदेहाची ओळख पटवली. विश्वकर्मा कुटुंब हे मूळचे उत्तर प्रदेशचे असून, गेल्या 20 वर्षांपासून रोजगारासाठी नाशिकमध्ये स्थायिक झाले आहे.
गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी आडगाव पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयित गोपीच्या भावाचा माग काढला. गोपीच्या भ्रमणध्वनीचा माग घेतला असता, तो मुंबईमार्गे रेल्वेने कर्नाटकला पळाल्याची माहिती मिळाली.
त्रिकोणी प्रेम अन् संशयाचा खेळ
संशयित आरोपी गोपी गोसावी हा व्यवसायाने प्लंबर आहे. पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट झाल्यानंतर त्याने मंगळूर येथील दुसर्या महिलेशी विवाह केला होता. त्याची दुसरी पत्नी सध्या गर्भवती आहे. याच दरम्यान त्याचे घटस्फोटीत असलेल्या सुनेत्रासोबत प्रेमसंबंध जुळले होते. मात्र, संशयाच्या भूतामुळे या प्रेमसंबंधांचा थरारक शेवट झाला.
Murder case solved in just 72 hours.