नाशिक : प्रतिनिधी
मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचा माजी विद्यार्थी व निफाड तालुक्यातील देवगाव येथील रहिवासी सर्वेश कुशारे याने कॉमनवेल्थ पाठोपाठ जपानमध्ये सुरू असलेल्या एशियन गेम्स स्पर्धेतही रविवारी (दि. 27) उंच उडीमध्ये रौप्यपदक पटकावत पुन्हा एकदा विक्रम केला आहे.
सर्वेश कुशारे याने 27 जुलै 2026 रोजी स्कॉटलंडमधील ग्लासगो येथे झालेल्या राष्ट्रकुल (कॉमनवेल्थ) क्रीडा स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी केली होती. पुरुषांच्या उंच उडीत राष्ट्रकुल स्पर्धेचे रौप्यपदक जिंकणारा सर्वेश कुशारे हा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. सर्वेशने उंच उडीमध्ये वेगवेगळे विक्रम करून भारतासह मविप्र संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. सर्वेशला मविप्र संस्थेतील निवृत्त क्रीडाशिक्षक रावसाहेब जाधव यांचे मार्गदर्शन लाभत आहे. रौप्यपदक मिळविल्यानंतर सर्वेशने प्रशिक्षक रावसाहेब जाधव यांना व्हिडिओ कॉल करून ही माहिती दिली आणि तुमच्या आशीर्वादामुळेच मी हे यश मिळवू शकलो, असे तो म्हणाला.
या यशस्वी कामगिरीबद्दल मविप्रचे सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले, उपाध्यक्ष विश्वास मोरे, उपसभापती देवराम मोगल, चिटणीस दिलीप दळवी व संचालक मंडळाने अभिनंदन केले आहे.
MVIPR’s Sarvesh Kushare wins silver medal again at Asian Games