विधानसभेतून लोकसभेत जाण्याच्या तयारीत नरहरी झिरवाळ

 

महाराष्ट्रात महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुका एकत्रित लढल्या, तर भाजपाला मोठा फटका बसू शकतो, असा एक अंदाज निवडणूकपूर्व सर्वेक्षणातून समोर आलेला आहे. प्रश्न इतकाच आहे की, तिन्ही पक्षांत जागावाटप कसे होणार? आघाडीतील पक्षांनी एकमेकांच्या जागांवरच दावे करण्यास सुरुवात केली आहे. दोन वेळा निवडणूक लढवूनही जागा जिंकता येत नसेल, तर ती आम्हाला द्या, असे दावे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात येत आहेत. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी लोकसभा मतदारसंघातही तेच दिसत आहे. ही जागा आपल्याकडे घ्यावी, असे काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना सुचविले आहे. काँग्रेसने या जागेवर दावा ठोकला असला, तरी राष्ट्रवादी काँग्रेस ही जागा सोडणार नाही. दिंडोरीत भाजपाच्या डॉ. भारती पवार केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री आहेत. त्यांना सक्षम पर्याय नसल्याने त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. त्यांचा सामना करण्यासाठी तितकाच शक्तीशाली उमेदवार देण्याच्या प्रयत्नात राष्ट्रवादी काँग्रेस आहे. 

पवार परिवाराऐवजी… 

डॉ. भारती पवार यांच्या विरोधात त्यांच्या जाऊबाई जयश्री पवार, कळवण-सुरगाण्याचे आमदार नितीन पवार आणि विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांची नावे चर्चेत आहेत. सन २०१४ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपाची उमेदवारी करुन विजयी झालेले हरिश्चंद्र चव्हाण यांना २०१९ च्या निवडणुकीत भाजपाने उमेदवारी नाकारुन राष्ट्रवादी काँग्रेसकडून आलेल्या डॉ. भारती पवार यांना उमेदवारी देऊन निवडून आणले. देशभरात निम्म्या खासदारांना उमेदवारी नाकारण्याचे भाजपाचे धोरण असते. त्या धोरणानुसार हरिश्चंद्र चव्हाण यांना उमेदवारी नाकारण्यात आली होती. चव्हाण यांचे नाव चर्चेत नाही. डॉ. भारती पवार यांचा समर्थपणे मुकाबला करण्यासाठी पवार परिवारातील उमेदवार देण्याऐवजी नरहरी झिरवाळ यांच्या नावाचा विचार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू आहे. 

अजित पवारांचे भाष्य 

नाशिक लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस अ‍ॅड. नितीन ठाकरे यांचे नाव अग्रस्थानी असताना दिंडोरीसाठी झिरवाळ यांना फेव्हरिट मानले जात आहे. झिरवाळ हे दिंडोरी विधानसभा मतदारसंघातील विद्यमान लोकप्रतिनिधी आहेत. विधानसभेचे उपाध्यक्षपद ही त्यांच्या जमेची बाजू असली, तरी लोकांमध्ये सहज मिसळून जाणारा लोकप्रतिनिधी अशी त्यांची प्रतिमा त्यांनी स्वत:च निर्माण केली आहे. याच आधारावर निवडून येण्याची क्षमता त्यांच्यात असल्याचे पक्षात दिसून येत आहे. सुरगाणा तालुक्यातील हतगडमध्ये नुकताच शेतकरी कृतज्ञता मेळावा विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडला. या मेळाव्यात अजित पवार मुख्यमंत्री झाले पाहिजे, असे मत झिरवाळ आणि सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी व्यक्त केले होते. यावर भाषण करुन मुख्यमंत्री होत नाही. त्यासाठी १४५ आमदारांचे संख्याबळ पाहिजे, असे उत्तर अजित पवारांनी देऊन महाविकास आघाडीतील ज्या पक्षाची जिथे ताकद आहे ती जागा लढवणार असल्याचे  स्पष्ट केले. लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद असल्याने झिरवाळांना विधानसभेतून लोकसभेत जाण्याची संधी असल्याचे संकेतही अजित पवार यांनी दिले. 

जिवा पांडू गावितांना टोला 

दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील सुरगाणा आणि पेठ तालुक्यांत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची ताकद आहे. याच बळावर पक्षाच्या अस्तित्वासाठी माजी आमदार जिवा पांडू गावित पुन्हा उमेदवारी करण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीत सुरगाणा-कळवण मतदारसंघात त्यांचा नितीन पवार यांनी पराभव केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसला मार्क्सवादी कम्युनिस्टचा फटका बसण्याची शक्यता लक्षात घेऊन अजित पवार यांनी जिवा पांडू गावित यांनाही टोला लगावला. 

तालुक्यात मोर्चे, आंदोलन वर्षानुवर्षे सुरु आहे. नुसताच मोर्चा काढून प्रश्न सुटत नसतात. मोर्चात पायी चालणाऱ्यांच्या पदरात काहीच पडत नाही. काही जण मोर्चे काढून सरकारला वेठीस धरतात आणि आपले स्वत:चे प्रश्न मार्गी लावत असतात. आदिवासी बांधवांनी हेच हुशारीने ओळखले पाहिजे, असा सल्लाही अजित पवारांनी दिला. शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे राज्य सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई  दिली गेली नाही. याकडेही त्यांनी लक्ष वेधून निवडणूक तयारीचे संकेत दिले. 

नावाभोवती वलय 

शिवसेनेतील फूट, भाजपा व शिवसेना शिंदे गटाने सरकार स्थापन केल्यानंतरच्या परिस्थितीत शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेचा प्रश्न लोंबकळत पडला. त्यावेळी विधानसभेचे अध्यक्षपद रिक्त असल्याने उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना महत्व प्राप्त झाले आणि ते चर्चेत आले. त्यांनी १६ आमदारांना बजावलेल्या नोटिसा, त्यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेला अविश्वास प्रस्ताव, सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी आणि १६ आमदारांचा प्रश्न आता विधानसभा अध्यक्ष यांच्यासमोर आलेला असतानाही झिरवाळ चर्चेत आहेत. त्यांच्या नावाची चर्चा केवळ महाराष्ट्रात झाली नाही, तर देशभर झाली. त्यामुळे त्यांच्या नावाला एक वलय प्राप्त झाले आहे. विधानसभा उपाध्यक्षांच्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा निवडून येत नाही, अशी एक चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर त्यांना लोकसभेचा मार्ग प्रशस्त वाटत असेल, तर नवल नाही. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांच्याच नावाची चर्चा अग्रस्थानी आहे. 

 

Ashvini Pande

Recent Posts

मनमाडला बंदी असलेल्या नायलॉन मांजाने सिलेंडर वाटप करणारा तरुण जखमी

मनमाडला बंदी असलेल्या नायलॉन मांजाने सिलेंडर वाटप करणारा तरुण जखमी मनमाड : प्रतिनिधी संपूर्ण राज्यात…

1 day ago

नायलॉन मांजाने घेतला युवकाचा बळी

इंदिरानगर :  वार्ताहर पाथर्डीफाटा येथील चौफुली नजीक दुचाकीहून जाणाऱ्या बावीस वर्षीय युवकाचा गाळ्यात मांजा अडकून…

1 day ago

सिडकोत नायलॉन मांजा ने घेतला युवकाचा बळी

सिडकोत नायलॉन मांजा ने घेतला युवकाचा बळी नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरात नायलॉन…

1 day ago

लासलगावी कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा आक्रमक ; कांद्याचे लिलाव पाडले बंद

लासलगावी कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा आक्रमक ; कांद्याचे लिलाव पाडले बंद लासलगाव:-समीर पठाण केंद्र सरकारने…

2 days ago

नाशिक मविप्र मॅरेथॉन-२०२५’चा विजेता ठरला मुंबईचा डॉ. कार्तिक करकेरा

नाशिक मविप्र मॅरेथॉन-२०२५'चा विजेता ठरला मुंबईचा डॉ. कार्तिक करकेरा मागीलवर्षीच्या स्पर्धेतील विक्रम मोडीत, फूल मॅरेथॉनचे…

4 days ago

ऐकावे ते नवलच! 36 वर्षाच्या विवाहितेचा पंधरा वर्षाच्या मुलाला घेऊन पोबारा

ऐकावे ते नवलच! 36 वर्षाच्या विवाहितेचा पंधरा वर्षाच्या मुलाला घेऊन पोबारा सिडको :  विशेष प्रतिनिधी असे…

6 days ago