नाशिक शहराचे सौंदर्य अबाधित ठेवून विकास साधावा :पालकमंत्री छगन भुजबळ

 

नाशिक : प्रतिनिधी
नाशिक महानगरपालिकेने शहराचा सर्वांगीण विकास करतांना शहराचे सौंदर्य अबाधित ठेवून विकास करावा. महापालिकेचे दायित्व दुपटीवर गेल्यामुळे आवश्यकता असलेलीच कामे करावी,शहरातील उड्डाणपुल व इतर विकास कामे आवश्यकतेनुसार करावी, जेणेकरुन नाशिकची स्काय लाईन खराब होता कामा नये. तसेच महापालिकेतील मंजूर असलेली अत्यावश्यक पदांची भरती प्रक्रिया तात्काळ राबवावी अशा सूचना राज्याचे अन्न,नागरी पुरवठा तथा ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. राजीव गांधी भवन येथे आयोजित महानगरपालिकेच्या आढावा बैठकीत पालकमंत्री छगन भुजबळ बोलत होते. यावेळी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक रमेश पवार, अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे,करुणा डहाळे, उपायुक्त (प्रशासन) मनोज घोडे पाटील, अधीक्षक अभियंता संदीप नलावडे, शहर अभियंता शिवकुमार वंजारी, स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे, गोदावरी संवर्धनचे उपायुक्त विजयकुमार मुंडे, उपायुक्त (कर) अर्चना तांबे, डॉ. दिलीप मेनकर,मुख्य लेखापरीक्षक किरण सोनकांबळी, वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे व इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, महानगरपालिकेच्या अत्यावश्यक 695 पदांना मंजूरी आली आहे. सदरची पदे वैद्यकीय, पाणीपुरवठा व अग्नीशमन विभागाची असून मंजूरी   मिळालेल्या पदांची लवकरात लवकर भरती प्रक्रीया राबविण्यात यावी. त्यांनी महानगरपालिकेच्या आर्थिक स्थितीचा सविस्तर आढावा घेतला. महानगरपालिकेवर 2800
कोटींचे दायित्व असल्याने आवश्यकतेनुसार कामे करण्यात यावी, असे पालकमंत्री भुजबळ यांनी सांगितले. नाशिक शहरात विविध महत्वाकांक्षी प्रकल्प राबवितांना ते सुटसुटीत असावे. मुंबईतील शिवाजी मैदान जेवढे महत्वाचे तेवढेच अनंत कान्हेरे मैदान (गोल्फ क्लब) आहे. त्या
मैदानाला ऐतिहासिक महत्त्व आहे. त्यामुळे मोठे समारंभ घेण्यासाठी मैदान मोकळे राहण्यासाठी अनावश्यक बांधकाम टाळावे. तसेच नाशिक शहरात सर्वाधिक जॉगिंग ट्रॅक आहे. मात्र खेळासाठी व मोठ्या सोहळ्यासाठी शहरात जागा सापडत नाही. त्यादृष्टीने मैदान विकसित करण्यात यावे. महानगरपालिकेकडून दिव्यांगासाठी इटीसी सेंटर सुरु केले जाणार आहे. या सेंटरच्या माध्यमातून शिक्षण, प्रशिक्षण व सेवा आणि इतर आवश्यक सेवा उपलब्ध करुन द्याव्यात. तसेच शहरातील रस्त्यांची कामे दर्जात्मक करावी.रस्त्यांच्या कामाच्या दर्जाबाबत तक्रार
आल्यास गुणवत्ता विभागाकडून तपासणी करावी, निकृष्ट कामे करणारांची गय करू नये. महानगरपालिकेच्या मोकळ्या जागांवर अतिक्रमण होणार नाही याची काळजी घ्यावी अशा
सूचना यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत.
कुंभममेळाकाळात नाशिक शहरात व शहराबाहेर रिंग रोडची कामे करण्यात आलेली आहे. त्यामुळे नव्याने प्रस्तावित केलेल्या बाह्य रिंगरोडचा अभ्यास करून मगच विकसित करण्यात यावे.फक्त भूसंपादन डोळ्यासमोर ठेवून प्रकल्प करू नये. शहरातील वाहतूक बेटांचा आकर्षक नाविन्यपूर्ण पद्धतीने सीएसआरच्या माध्यमातून विकसित करण्यास प्राधान्य देवून शहरात जाहिरातीसाठी आवश्यक स्पॉट विकसित करण्यात यावेत. म्हणजे महापालिकेला उत्पन्न सुध्दा मिळेल. नमामि गोदा प्रकल्प अंतर्गत गोदावरी, चार उपनद्या व 67 नाले प्रदूषण मुक्त करण्याबरोबर
गोदावरी व इतर नद्यांचे सोंदर्यीकरण करावे. गोदावरी व नंदिनी नदीला पुर्नवैभव प्राप्त करून देण्यास प्राधान्य देण्यात यावे. तसेच शहराच्या पाणी पुरवठा व सांडपाण्याचे सूक्ष्म नियोजन करावे, जेणेकरुन दूषित पाणी नदीत जाणार याची काळजी घ्यावी, असेही पालकमंत्री भुजबळ यांनी सांगितले. तसेच अमृत २ योजनेअंतर्गत वाढीव पाणी पुरवठा
योजनेचा प्रस्ताव तयार करण्यात यावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *