स्वयंपाकघरातील बजेट कोलमडले
नाशिक : प्रतिनिधी
केंद्र सरकारने घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात तीन महिन्यांत दुसर्यांदा वाढ करत यावेळी 29 रुपयांनी वाढ केली आहे. त्यामुळे नाशिक जिल्हा ग्राहक पंचायतीने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
गेल्या 7 मार्च रोजी 60 रुपयांची वाढ झाल्यानंतर आता पुन्हा 29 रुपयांची वाढ करण्यात आल्याने तीन महिन्यांत एकूण 89 रुपयांची वाढ झाली आहे. यामुळे गृहिणींचे मासिक बजेट कोलमडले आहे.स्वयंपाकाच्या गॅससह दूध, भाजीपाला, पेट्रोल, किराणा माल, तेल आदींच्या दरात वाढ झाल्याने जगायचे कसे, असा प्रश्न पडला आहे.
कमीत कमी संसाधनांचा वापर केला तरी मुलांचा शाळेचा खर्च, प्रवास, रोजचे जेवण आदी गोष्टी न टाळता येण्यासारख्या असल्याने घरखर्च सांभाळताना गृहिणींची तारेवरची कसरत होत आहे.
सरकार तेल कंपन्यांच्या तोट्याचा बोजा ग्राहकांवर टाकत असल्याचा आरोप नाशिक जिल्हा ग्राहक पंचायतीचे उपाध्यक्ष सुरेश पाटील यांनी केला. पश्चिम आशियातील संघर्षाचे कारण देत वारंवार दरवाढ करणे अन्यायकारक असून, दरवाढ तत्काळ मागे घेण्याची मागणी त्यांनी केली.
नाशिकमध्ये 14.2 किलो घरगुती गॅस सिलिंडरचा दर 942 रुपयांच्या घरात पोहोचला आहे. पाच किलो सिलिंडरचा दर 339 रुपये झाला आहे. व्यावसायिक सिलिंडरही 1 जूनपासून 42 रुपयांनी महाग झाल्याने हॉटेल व्यवसायावर परिणाम होऊन महागाईची झळ सर्वसामान्यांना बसणार असल्याचे पंचायतीने म्हटले आहे.
सरकारने सिलिंडरचे दर 800 रुपयांच्या खाली आणावेत, अशी मागणी उपाध्यक्ष सुरेश पाटील, सचिव विलास देवळे, अनिल नांदोडे, अॅड. मयूर देशपांडे, सुभाष तिडके व कृष्णा गडकरी यांनी पत्रकाद्वारे केली आहे.
तीन महिन्यांत जवळपास 90 रुपयांची वाढ गॅस सिलिंडरमध्ये झाली आहे. तसेच दूध, भाजीपाला, पेट्रोल यांसह प्रत्येक गोष्टीत दरवाढ झाल्याने सर्व बजेट कोलमडले आहे.आता शाळा सुरू होतील. मुलांच्या प्रवासभाड्यातही वाढ केली आहे. आता जगायचे कसे, असा प्रश्न पडला आहे.
– वर्षा थोरात, गृहिणीमहागाईने आधीच त्रस्त असलेल्या सर्वसामान्य ग्राहकांना पुन्हा वेठीस धरण्याचा हा प्रकार आहे.
– सुरेश पाटील, उपाध्यक्ष, नाशिक जिल्हा ग्राहक पंचायत
Nashik District Consumer Panchayat expresses displeasure against gas price hike