♠ देशातील हॉटेल क्षेत्रात 567 दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक, तब्बल 67 टक्के वाढ
♠ महानगरांसोबतच टियर-2 शहरांकडे गुंतवणूकदारांचा वाढता कल
नाशिक : विक्रांत पाटील
भारतातील हॉटेल क्षेत्रातील गुंतवणुकीबाबत ’जेएलएल’ या जागतिक संस्थेने नुकताच हॉटेल इन्व्हेस्टमेंट ट्रेंड्स इन इंडिया हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार, देशातील हॉटेल गुंतवणुकीत मोठी वाढ झाली असून, याते नाशिक शहर गुंतवणूकदारांच्या पसंतीचे प्रमुख केंद्र म्हणून वेगाने उदयास येत आहे.
भारतातील हॉस्पिटॅलिटी व हॉटेल क्षेत्रात 2025 मध्ये लक्षणीय वाढ नोंदवली गेली आहे. या क्षेत्रातील एकूण गुंतवणूक 67 टक्क्यांनी वाढून 567 दशलक्ष डॉलर्सवर पोहोचली आहे. विशेष म्हणजे, या वाढत्या गुंतवणुकीत आता केवळ महानगरेच नव्हे, तर ’नाशिक’सारखी टियर-2 शहरे गुंतवणूकदारांच्या पसंतीची प्रमुख केंद्रे म्हणून उदयास येत आहेत.
गुंतवणूकदारांचा कल आता मेट्रो शहरांकडून वेगाने टियर-2 आणि टियर-3 शहरांकडे वळत आहे. या नवीन प्रवाहात नाशिक शहराने मोठी आघाडी घेतली आहे. अहवालानुसार, देशातील एकूण हॉटेल गुंतवणुकीपैकी जवळपास 40 टक्के गुंतवणूक टियर-2 आणि टियर-3 शहरांमध्ये झाली आहे.
उदयपूरसह इतर शहरांचेही लक्षणीय योगदान
नाशिकच्या बरोबरीनेच राजस्थानमधील उदयपूर, तसेच लुधियाना, वडोदरा, लोणावळा, ऋषिकेश आणि गोवा यांसारख्या शहरांमध्येही हॉटेल क्षेत्रात मोठी गुंतवणूक झाली आहे. उदयपूरमध्ये प्रामुख्याने हेरिटेज आणि लक्झरी रिसॉर्ट्समध्ये गुंतवणूकदारांनी पसंती दर्शवली आहे. उदयपूर, ऋषिकेश आणि गोवा यांसारखी शहरे लक्झरी पर्यटनासाठी (रिसॉटर्र्) सर्वाधिक पसंतीची ठरत आहेत, तर नाशिक आणि वडोदरा ही व्यवसाय आणि पर्यटन अशा दोन्ही आघाड्यांवर विस्तारत आहेत.
प्रकल्पांचे स्वरूप : गुंतवणूकदारांनी प्रामुख्याने अगोदरच चालू असलेल्या व उत्पन्न देणार्या (ऑपरेशनल) हॉटेल्समध्ये गुंतवणूक करण्यास सर्वाधिक प्राधान्य दिले (69 टक्के).
लक्झरी आणि अपस्केल हॉटेल्सचा दबदबा : एकूण गुंतवणुकीपैकी 42% गुंतवणूक लक्झरी सेगमेंटमध्ये, तर 41% अपस्केल हॉटेल्समध्ये झाली.
ब्रँडेड हॉटेल्सचा विस्तार : नव्याने हॉटेल सुरू करण्यासाठी (ब्रँडेड हॉटेल साईनिंग) तब्बल 51,647 खोल्यांचे करार झाले आहेत, ज्यापैकी 71% विस्तार हा टियर-2 आणि टियर-3 शहरांमध्ये झाला आहे.
एकूणच पायाभूत सुविधांचा विकास आणि देशांतर्गत पर्यटनाला आलेले चांगले दिवस यामुळे भारतातील हॉटेल क्षेत्राने गती पकडली आहे. या संपूर्ण प्रवासात नाशिकने स्वतःची एक स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. भविष्यातील मोठ्या हॉस्पिटॅलिटी गुंतवणुकीसाठी नाशिक हे एक अत्यंत महत्त्वाचे केंद्र ठरणार असल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होते.
ब्रँडेड हॉटेल्सचे विस्तारासाठी नाशिककडे लक्ष
मुंबई आणि पुण्याच्या जवळ असलेले नाशिक हे सध्या एक प्रमुख पर्यटन, वाइन आणि औद्योगिक केंद्र बनले आहे. देशांतर्गत पर्यटनात झालेली वाढ, उत्तम रस्तेजोडणी आणि वाढते वीकेंड पर्यटन यामुळे नाशिकमधील अपस्केल आणि मिडस्केल हॉटेल प्रकल्पांमध्ये संस्थात्मक गुंतवणूकदारांनी मोठा रस दाखवला आहे. मोठ्या ब्रँडेड हॉटेल्सच्या विस्तारासाठी नाशिक आता एक परिपक्व (इन्व्हेस्टमेंट-ग्रेड) बाजारपेठ मानली जात आहे.
2026 ची सकारात्मक सुरुवात
गुंतवणुकीचा हा जोरदार ओघ 2026 मध्येही कायम राहिला आहे. 2026 च्या पहिल्या तिमाहीतच हॉटेल क्षेत्रात 185 दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक नोंदवली गेली आहे, जी मागील वर्षाच्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत 58 टक्क्यांनी अधिक आहे.
Nashik is becoming a major hub for investors in the hospitality sector.