मुंबईत दोनशे कोटी ग्रीन बॉण्डचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सूचीकरण
नाशिक : प्रतिनिधी
नाशिक महापालिकेच्या ग्रीन बॉण्ड्सचे यशस्वी सूचीकरण हे शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांची आर्थिक स्वायत्तता अधिक सक्षम करण्याच्या दिशेने उचललेले महत्त्वपूर्ण पाऊल आहे. या माध्यमातून महाराष्ट्र राज्याची नवोन्मेषी आणि शाश्वत वित्तपुरवठा उपाययोजनांप्रति असलेली बांधिलकी अधोरेखित होते. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा उभारण्यास या उपक्रमातून मोठी चालना मिळेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी केले.
शहरी पायाभूत सुविधा वित्तपुरवठा क्षेत्रात महत्त्वपूर्ण टप्पा गाठत नाशिक महानगरपालिकेने 200 कोटींच्या ग्रीन म्युनिसिपल बाँड्सचे नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया सोमवारी (दि.9) यशस्वीरीत्या सूचीकरण (लिस्टिंग) मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आलेे. महाराष्ट्रातील कोणत्याही शहरी स्थानिक स्वराज्य संस्थेकडून जारी करण्यात आलेला हा पहिलाच सार्वजनिक ग्रीन म्युनिसिपल बाँड इश्यू असून नाशिक शहराच्या शाश्वत विकासाच्या दिशेने हे एक ऐतिहासिक पाऊल मानले जात आहे.
या कार्यक्रमास कुंभमेळामंत्री गिरीश महाजन, आमदार सीमा हिरे, अप्पर मुख्य सचिव (नगरविकास) असीम गुप्ता, मित्रा संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी, मुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव परदेशी, कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह, नाशिक महानगर विकास प्राधिकरण आयुक्त जलज शर्मा, तसेच विविध वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. सोहळ्यास नाशिक महानगरपालिकेच्या महापौर हिमगौरी आहेर-आडके, उपमहापौर विलास शिंदे, स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप, आयुक्त मनीषा खत्री, अतिरिक्त आयुक्त करिष्मा नायर तसेच नाशिक महानगरपालिकेचे अधिकारी व नगरसेवक पस्थित होते. उपस्थित मान्यवरांचा सन्मान नाशिक महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री व अतिरिक्त आयुक्त करिष्मा नायर यांच्या हस्ते करण्यात आला. म्युनिसिपल बाँडच्या सार्वजनिक इश्यूला गुंतवणूकदारांकडून
उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, हा इश्यू पाच पटांहून अधिक ओव्हर सब्स्क्राइब झाला आहे. यामुळे नाशिक महानगरपालिकेच्या वित्तीय व्यवस्थापनावर तसेच शहराच्या दीर्घकालीन विकास क्षमतेवर गुंतवणूकदारांचा वाढता विश्वास अधोरेखित झाला आहे. ग्रीन बाँड इश्यूमधून उभारण्यात आलेला निधी प्रामुख्याने आगामी सिंहस्थ कुंभमेळा लक्षात घेऊन शहरातील जल पायाभूत सुविधा अधिक मजबूत करण्यासाठी वापरण्यात येणार आहे. जगातील सर्वांत मोठ्या धार्मिक समारंभांपैकी एक असलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ही पायाभूत सुविधा अत्यंत महत्त्वाची ठरणार असून शहराच्या दीर्घकालीन विकासात ग्रीन बाँडमुळे मोठी भर पडणार आहे. या इश्यूमधून प्राप्त झालेल्या निधीचा वापर पुढील महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी करण्यात येणार आहे. दोनशे कोटीच्या बॉण्डच्या माध्यमातून मुकणे जलपुरवठा योजनेचा विस्तार, जलशुद्धीकरण प्रकल्प उभारणी, विल्होळी ते गांधीनगरदरम्यान गुरुत्वाकर्षणावर आधारित मुख्य जलवाहिनी उभारणे, सिंहस्थ कुंभमेळा तयारीसाठी साधुग्राम व निलगिरी बाग जलशुद्धीकरण प्रकल्पांसाठी आवश्यक जल पायाभूत सुविधा उभारणी, या बॉण्डमुळे केंद्र सरकारकडून जाहीर केल्यानुसार अमृत इन्सेन्टिव्हमुळे मनपास 20 कोटी निधी प्राप्त होणार आहे. याचबरोबर केंद्र शासनाच्या अर्थात अर्बन चॅलेंज फंडकरिता हा प्रकल्प पात्र झाला असून, त्यामुळे मनपाच्या या ग्रीन बॉण्ड निधी उभारणीला बिनव्याजी कर्जच मिळणार आहे. भारतामध्ये पायाभूत सुविधा विकासासाठी शहरांकडून बाजाराधारित वित्तपुरवठा यंत्रणांचा वापर वाढत असून म्युनिसिपल बाँड्सना सातत्याने वाढती मागणी मिळत आहे. नाशिक महानगरपालिकेच्या या यशस्वी ग्रीन बाँड इश्यूमुळे शहराच्या विकासाला नवी गती मिळणार असून सिंहस्थ कुंभमेळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी हे एक सकारात्मक आणि दूरदृष्टीपूर्ण पाऊल ठरणार आहे. सोहळ्याचे यशस्वी नियोजन मनपा अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, उपायुक्त लक्ष्मीकांत सताळकर,अजित निकत, शहर अभियंता संजय अग्रवाल, अधीक्षक अभियंता रवींद्र धारणकर, मुख्य लेखापरीक्षक बळवंत गायकवाड, उपमुख्य लेखापाल साहेबराव पाटील, अजय कमोद आदींसह सर्व विभाग प्रमुखांनी केले. आभार प्रदर्शनाने या सोहळ्याची सांगता झाली.
वर्षात चारशे कोटींचे बॉण्ड
चालू आर्थिक वर्षात नाशिक महानगरपालिकेचे हे दुसरे म्युनिसिपल बाँड सूचीकरण ठरले आहे. तसेच त्याच आर्थिक वर्षात खाजगी प्लेसमेंट आणि सार्वजनिक इश्यू या दोन्ही मार्गांनी म्युनिसिपल बाँड्स जारी करणारी नाशिक महानगरपालिका ही देशातील एकमेव शहरी स्थानिक स्वराज्य संस्था ठरली आहे. दरम्यान, महापालिकेने एकूण चारशे कोटींच्या बॉण्डचे सूचीकरण केले आहे. शहराच्या पायाभूत सुविधा विकासासाठी महानगरपालिकेचा सक्रिय, पारदर्शक आणि नवोन्मेषी दृष्टिकोन स्पष्ट होत असून, नाशिक शहराच्या शाश्वत विकासाला यामुळे निश्चितच मोठी चालना मिळणार आहे.
नाशिकसाठी अभिमानास्पद : आयुक्त खत्री
बाँड सूचीकरण प्रक्रिया नाशिक शहरासाठी अभिमानास्पद आहे. ग्रीन बाँडमधून उभारलेला निधी पर्यावरणपूरक व शाश्वत पायाभूत सुविधा उभारण्यासाठी वापरण्यात येईल. याचा लाभ शहरातील नागरिकांसह सिंहस्थ कुंभमेळ्यादरम्यान नाशिकला भेट देणार्या लाखो भाविकांनाही होणार आहे. या बाँड इश्यूचे लीड मॅनेजर यांनी या ऑफरिंगच्या संरचना व व्यवस्थापनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. नाशिक महानगरपालिकेच्या लेखा विभागाने सखोल अभ्यास करून ग्रीन बाँड सूचीकरण प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले आहेत. याबद्दल मुख्य लेखा व वित्त अधिकारी दत्तात्रय पाथरुट व त्यांच्या संपूर्ण टीमचेही अभिनंदन करण्यात आले.
Nashik leads in the list of developed cities: Chief Minister Fadnavis
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…