‘नियमित मेट्रो’साठी नव्याने चाचपणी
नाशिक : वाहिद बागवान
गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असलेला आणि रखडलेला‘टायरबेस्ड मेट्रो निओ’ प्रकल्प आता जवळपास गुंडाळण्यात आला आहे. नाशिककरांसाठी आता थेट ’नियमित मेट्रो’ किंवा ‘लाइट मेट्रो’ सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. महाराष्ट्र शासनाने शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे नव्याने मूल्यांकन सुरू केले आहे. नुकतीच मंत्रालयात याबाबत महत्त्वाची उच्चस्तरीय बैठक झाली.
महामेट्रोने केलेल्या ताज्या अभ्यासानुसार आणि वाढत्या नागरीकरणामुळे नाशिक शहरातील काही प्रमुख मार्गांवर गर्दीच्या वेळेत प्रतितास 20 हजारांहून अधिक प्रवासी प्रवास करत असल्याचे निदर्शनास आले आहे. ‘नियमित मेट्रो’ प्रकल्प मंजूर होण्यासाठी प्रतितास 20 हजार प्रवाशांचा निकष अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. नाशिकने हा टप्पा ओलांडल्यामुळे आता कमी क्षमतेच्या ‘मेट्रो निओ’ऐवजी मुंबई, पुणे आणि नागपूरच्या धर्तीवर पारंपरिक ‘नियमित मेट्रो’ किंवा ‘लाइट रेल ट्रान्झिट’ उभारण्याचा विचार प्रकर्षाने पुढे आला आहे.
या बैठकीत मेट्रो निओ, पारंपरिक मेट्रो, मोनोरेल आणि लाइट मेट्रो अशा विविध पर्यायांवर चर्चा झाली. मात्र, अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही. हा निर्णय ’महामेट्रो’तर्फे नव्याने तयार केल्या जात असलेल्या ‘सर्वंकष वाहतूक आराखड्यावर’ अवलंबून असेल. यापूर्वीचा आराखडा 2016-2017 मध्ये तयार करण्यात आला होता. मात्र, गेल्या काही वर्षांत नाशिक विमानतळ सुरू झाल्यामुळे आणि शहराचा चौफेर विस्तार झाल्यामुळे रहदारीचे गणित बदलले आहे. हा सुधारित आराखडा येत्या महिनाभरात पूर्ण करून महापालिकेकडे सुपूर्द केला जाईल.
महामेट्रोचे पथक लवकरच नाशिकमध्ये दाखल होऊन पाहणी करणार आहे. प्राथमिक माहितीनुसार, 31 किलोमीटर लांबीचे दोन भव्य कॉरिडॉर आणि 30 स्थानकांचे पुन्हा
सर्वेक्षण केले जाणार आहे. नियमित मेट्रोसाठी शक्यतो निओ मेट्रोसाठी प्रस्तावित केलेले जुने मार्गच कायम ठेवले जाण्याची शक्यता आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पाश्वर्र्भूमीवर, या मेट्रो प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम कुंभमेळ्यापूर्वी हाती घ्यायचे की कुंभमेळा पार पडल्यानंतर याबाबतचा निर्णय प्रशासनाने अद्याप प्रलंबित ठेवला आहे.
मेट्रो सुरू झाल्यास नाशिककरांचा प्रवास केवळ वेगवानच होणार नाही, तर तो अधिक सुरक्षित, वातानुकूलित आणि पर्यावरणपूरक होईल. याचा थेट फायदा शहरातील नोकरदार वर्ग, विद्यार्थी आणि व्यापार्यांना होईल.
मागील काही काळ ‘मेट्रो निओ’चा प्रस्ताव केंद्र सरकारने खर्चाच्या आणि व्यवहार्यतेच्या मुद्द्यावरून राज्याकडे परत पाठवल्याने नाशिकच्या मेट्रोचे स्वप्न अधांतरी होते. मात्र, आता राज्य सरकारच्या या नव्या आणि सकारात्मक पावलांमुळे नाशिकला लवकरच एक अद्ययावत, हाय-टेक आणि अधिक क्षमतेची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
फीडर बससेवा
मेट्रो स्थानकांपर्यंत पोहोचण्यासाठी नागरिकांना एकूण 24 किमी लांबीची ‘फीडर बससेवा’ (बॅटरीवर चालणार्या बसेस) देखील उपलब्ध करून दिली जाईल.
फीडर मार्ग 1 : सातपूर कॉलनी ते मुंबई नाका (गरवारेमार्गे)
फीडर मार्ग 2 : नाशिकरोड ते शिवाजीनगर (नांदूर नाकामार्गे)
प्रवासासाठी लागणारा वेळ आणि वेळेची बचत : शहरातील वाढत्या ट्रॅफिकमुळे सध्या एका टोकाकडून दुसर्या टोकाकडे जाण्यासाठी खूप वेळ लागतो. मात्र, मेट्रोमुळे या वेळेत मोठी बचत होणार आहे.
सध्याची स्थिती : सध्या ट्रॅफिकच्या वेळेत गंगापूररोेड किंवा सातपूरवरून नाशिकरोड रेल्वे स्थानकावर जायचे असल्यास, द्वारका आणि सीबीएसच्या ट्रॅफिकमुळे किमान एक ते सव्वा तास लागू शकतो.
मेट्रोचा वेग : प्रस्तावित मेट्रोचा कमाल वेग 60 किमी/तास असेल.
मेट्रोने लागणारा वेळ : गंगापूर ते नाशिकरोड (22 किमी):स्थानकांवरील थांबे धरून मेट्रोने हा प्रवास साधारणपणे 35 ते 40 मिनिटांत पूर्ण होईल.
गंगापूर ते मुंबई नाका (10.5 किमी) : या प्रवासासाठी जेमतेम 15 ते 20 मिनिटे लागतील.
मेट्रो संपूर्णपणे एलिव्हेटेड (उंचावरून) धावणार असल्यामुळे रस्त्यावरील ट्रॅफिकचा कोणताही अडथळा नसेल. परिणामी लांबच्या पल्ल्यासाठी नागरिकांचा किमान 30 ते 45 मिनिटांचा वेळ वाचेल.
मेट्रोचे प्रस्तावित मुख्य मार्ग
नाशिक मेट्रोचे प्रामुख्याने दोन ‘एलिव्हेटेड’ (उड्डाणपुलावरील) कॉरिडॉर असणार आहेत. या दोन्ही मार्गांची एकूण लांबी सुमारे 32 किलोमीटर असेल. त्यावर एकूण 30 स्थानके उभारली जातील.
कॉरिडॉर 1 : गंगापूर ते नाशिकरोड रेल्वे स्थानक
लांबी : 22 किलोमीटर
स्थानकांची संख्या : 20
प्रमुख स्थानके :
गंगापूर, ध्रुवनगर, श्रमिकनगर, महिंद्रा, शनेश्वरनगर, त्र्यंबकरोड, सातपूर कॉलनी, एमआयडीसी, एबीबी सर्कल, पारिजातनगर, मायको सर्कल, सीबीएस, सारडा सर्कल, द्वारका सर्कल, आंबेडकरनगर, उपनगर, नेहरूनगर, दत्तमंदिर आणि नाशिकरोड रेल्वे स्थानक.
कॉरिडॉर 2 : गंगापूर ते मुंबई नाका
लांबी : 10.5 किलोमीटर
स्थानकांची संख्या : 10
प्रमुख स्थानके : गंगापूर, जलालपूर, गणपतनगर, काळेनगर, जेहान सर्कल, थत्तेनगर, शिवाजीनगर, अशोक स्तंभ, पंचवटी, सीबीएस आणि मुंबई नाका.
इंटरचेंज स्थानके
प्रवाशांना एका मार्गावरून दुसर्या मार्गावर जाण्यासाठी सीबीएस आणि गंगापूररोड येथे इंटरचेंज स्थानके असतील.
न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…
मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…
डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…