नाशिक पोलिसांकडून तीन कोटी 75 लाखांचा मुद्देमाल फिर्यादींना परत

सिडको : प्रतिनिधी
मालमत्तेविरुद्धच्या विविध गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेला तीन कोटी 75 लाख 30 हजार 758 रुपयांचा मुद्देमाल नाशिक शहर पोलिसांच्या परिमंडळ-1 मधील फिर्यादींना सन्मानाने परत करण्यात आला. आडगाव, पंचवटी, म्हसरूळ, भद्रकाली, सरकारवाडा, गंगापूर आणि मुंबई नाका पोलिस ठाण्यांच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली.
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी मालमत्तेविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये जास्तीत जास्त मुद्देमाल हस्तगत करून तो लवकरात लवकर संबंधित फिर्यादींना परत करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस उपायुक्त परिमंडळ-1 मोनिका राऊत यांनी संबंधित पोलिस ठाण्यांतील अधिकारी व कर्मचार्‍यांना न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून मुद्देमाल परत करण्याचे निर्देश दिले.
15 ते 30 सप्टेंबरदरम्यान विविध गुन्ह्यांतील मुद्देमाल संबंधित फिर्यादींना परत करण्यात आला. यात सोन्याचे दागिने व स्त्रीधन, चांदीचे दागिने, 49 मोटारसायकली, 25 चारचाकी वाहने, 12 मोबाइल फोन, एक जेसीबी, पाच रिक्षा, तीन लॅपटॉप, एक घड्याळ, एक प्युरिफायर, एक कुलर, चार स्टेपनी, चार पलंग, 36 खुर्च्या, 20 टेबल फ्रेम, तांबे-पितळी भांडी, लोखंडी जॅक, सेंट्रिंग प्लेट्स, काचेच्या बांगड्या तसेच रोख रकमेचा समावेश आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एकूण 998.711 ग्रॅम सोन्याचे दागिने व स्त्रीधन आणि एक किलो 884 ग्रॅम चांदीचा मुद्देमाल परत करण्यात आला. याशिवाय दोन लाख 83 हजार 250 रुपयांची रोख रक्कमही फिर्यादींना परत करण्यात आली. गुन्ह्यांमध्ये चोरीला गेलेला मौल्यवान ऐवज, महिलांचे स्त्रीधन तसेच रोजगारासाठी आवश्यक असलेली वाहने परत मिळाल्याने फिर्यादींनी पोलिसांचे आभार मानले. महिला फिर्यादींना त्यांचे स्त्रीधन परत मिळाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

Nashik Police return seized property worth ₹3.75 crore to complainants.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *