अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांचे नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

सिडको : विशेष प्रतिनिधी

राज्यातील विविध भागांत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (6 जुलै) व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे वरिष्ठ अधिकार्‍यांसोबत आढावा बैठक घेत आवश्यक सूचना दिल्या.
या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी पोलीस आयुक्तालयातील सर्व पोलीस उपायुक्त, सहायक पोलीस आयुक्त तसेच सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी यांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेऊन अतिवृष्टीमुळे उद्भवणार्‍या परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी आवश्यक उपाययोजना तत्काळ राबविण्याच्या सूचना दिल्या.
पोलीस आयुक्तांनी नदीकाठावरील वाहने सुरक्षित ठिकाणी हलविणे, नागरिकांना धोकादायक ठिकाणी जाण्यापासून रोखणे, रस्त्यांवरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करणे, पेट्रोलिंग वाहनांमध्ये दोर, टॉर्च, मेगाफोन व सार्वजनिक सूचना प्रणाली उपलब्ध ठेवणे, आवश्यक ठिकाणी बॅरिकेडिंग करणे आणि गरजेनुसार वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्याचे निर्देश दिले.
पूरस्थिती पाहण्यासाठी नागरिक ज्या ठिकाणी गर्दी करतात, तेथे कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच पोलीस नियंत्रण कक्षाने शहरातील परिस्थितीची अद्ययावत माहिती ठेवावी आणि जलसंपदा विभाग, महसूल विभाग, आपत्ती व्यवस्थापन, महावितरण व अग्निशमन दलाशी सातत्याने समन्वय ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शहरातील सर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षक व दुय्यम अधिकार्‍यांनी रात्री पोलीस ठाण्यात उपस्थित राहून परिस्थितीवर लक्ष ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.दरम्यान अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. जुनी व धोकादायक इमारती, झाडे आणि विजेचे खांब यांच्यापासून सुरक्षित अंतर ठेवावे. पावसामुळे रस्त्यावर पाणी साचले असल्यास वाहने सावधगिरीने चालवावीत आणि वाहतूक नियमांचे पालन करावे. आपत्कालीन परिस्थितीत तातडीने पोलीस, स्थानिक प्रशासन, अग्निशमन दल किंवा आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी संपर्क साधावा. तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्यावे, असे आवाहन पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी केले आहे.

Nashik Police urge citizens to remain alert amidst heavy rainfall.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *