आता सिटीलिंकमधून नाशिक दर्शन  महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर डबल बेल

 

नाशिक : प्रतिनिधी

काही दिवसांतच नाशिककरांच्या पसंतीस उतरलेली सिटीलिंक बस सुसाट आहे . शहरातील पन्नासहून अधिक मार्गांवर ही बस धावत आहे . सिटीलिंकला मिळत असलेला प्रतिसाद पाहता विविध मार्गावर अधिकाधिक बस सोडल्या जात आहेत . दरम्यान , आता नाशिक शहरात दि . १ मेपासून म्हणजेच महाराष्ट्र दिनापासून नाशिक दर्शनासाठी सिटीलिंक बस सुरू केली जाणार आहे . नुकताच यासंबंधीचा प्रस्ताव आयुक्त रमेश पवार यांच्याकडे देण्यात आला आहे . नाशिक दर्शन बससेवेला मोठा प्रतिसाद मिळू शकतो . सिटीलिक बस शहरासह भगूर , ओझर , सायखेडा , सिन्नर , त्र्यंबकेश्वर , दिंडोरीपर्यंत जात आहे . नागरिकांना वेळेत बस मिळत असून , सहज प्रवास करता येतो आहे . दरम्यान , नाशिक शहराची धार्मिकनगरी , कुंभनगरी अशी ओळख आहे . बारा वर्षांतून येथे एकदा कुंभमेळा भरतो . त्यामुळे जिल्ह्यासह परराज्यातील भाविक मोठ्या संख्येने नाशिकमध्ये येत असतात . मात्र , त्यांना नाशिक शहरातील सर्व धार्मिक स्थळांची पाहणी करता यावी , यासाठी बसची स्वतंत्र व्यवस्था नव्हती . आता मात्र सिटीलिंकच्या माध्यमातून नाशिक दर्शनसाठी बस सोडली जाणार आहे . रामकुंड , श्री काळाराम मंदिर , सीतागुंफा , तपोवन त्याचबरोबर सोमेश्वर , बालाजी मंदिर , पांडवलेणी तसेच त्र्यंबकेश्वर अंजनेरी , नाणे संशोधन केंद्र आणि त्र्यंबकेश्वर मंदिर अशी अनेक स्थळे उपलब्ध असताना नाशिक दर्शनची बस नसल्याने पर्यटकांना खासगी गाड्यांचा आधार घ्यावा लागतो . शहरात रिक्षाचालकांकडून तर मनमानी भाडे आकारले जाते . मात्र , आता सिटीलिंकची नाशिक दर्शन सुविधा उपलब्ध झाल्यानंतर प्रवाशांना सोयीस्कर होणार आहे . दरम्यान , नाशिक दर्शनासाठी स्वतंत्र बस मिळणार असल्याने याचा मोठा फायदा भाविकांना मिळणार असून , सिटीलिंकला यातून चांगला महसूल मिळण्याची शक्यता आहे . आता आणखी या सेवेचा विस्तार करताना नाशिक दर्शन सेवा प्रवाशांना उपलब्ध होणार आहे . मागील काही दिवसांपासून या पद्धतीने बस असावी यासाठी प्रयत्न सुरू होते . सिटीलिंककडून महापालिका आयुक्तांना नाशिक दर्शन बससेवेबाबतचा प्रस्ताव नुकताच दाखल करण्यात आला आहे . त्यानुसार १ मेपासून नाशिक दर्शन बस सुरू होणार आहे . सिटीलिंक बसचा विस्तार हा टप्प्याटप्प्याने वाढतच जात आहे . मार्ग वाढत आहेत . बसेसच्या संख्याही वाढत आहे . गेल्या महिन्यातच सिटीलिंकने वीस कोटींहून अधिक उत्पन्न मिळविले होते . एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातील एका दिवसात तब्बल १८ लाखांचे विक्रमी उत्पन्न मिळविले होते . विविध प्रयोगांमुळे ही बस नाशिककरांना चांगलीच भावल्याचे चित्र आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *