नाशिक

कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिकच्या फुलशेतीला पुन्हा बहर

नाशिक : प्रतिनिधी
द्राक्ष, डाळिंब आणि भाजीपाला उत्पादनासाठी देश-विदेशात ओळख निर्माण करणार्‍या नाशिक जिल्ह्यात एकेकाळी निर्यातक्षम फुलशेतीला मोठी चालना मिळाली होती. गुलाब, जरबेरा, कार्नेशन यांसारख्या फुलांचे उत्पादन घेणार्‍या शेतकर्‍यांनी देशांतर्गत बाजारपेठेसोबतच परदेशी बाजारपेठेतही आपला ठसा उमटविला होता. मात्र, वाढता उत्पादन खर्च, मजुरीचे दर, पॉलिहाउसच्या देखभालीचा खर्च आणि बाजारभावातील चढ-उतारांमुळे गेल्या काही वर्षांत फुलशेतीकडे शेतकर्‍यांनी पाठ फिरवली. आता आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर निर्माण होणारी मोठी मागणी लक्षात घेऊन या दुर्लक्षित फुलशेतीला पुन्हा चालना देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेतला आहे.
नाशिक, दिंडोरी, निफाडसह जिल्ह्याच्या विविध भागांत काही वर्षांपूर्वी फुलशेतीला चांगला प्रतिसाद होता. संरक्षित शेतीच्या माध्यमातून निर्यातक्षम फुलांचे उत्पादन घेणार्‍या शेतकर्‍यांची संख्याही लक्षणीय होती. नाशिकमधील फुलांना मुंबई, पुण्यासह देशातील विविध बाजारपेठांमध्ये मागणी होती. गुलाबासह जरबेरा, कार्नेशन आदी फुलांची निर्यातही केली जात होती.
मात्र, फुलशेतीसाठी आवश्यक असलेली नियमित देखभाल, वाढता मजुरी खर्च, खते व कीटकनाशकांच्या किमती, पॉलिहाउसची देखभाल तसेच बाजारभावातील अनिश्चितता यामुळे उत्पादन खर्चाच्या तुलनेत उत्पन्नाची खात्री राहिली नाही. परिणामी, अनेक शेतकर्‍यांनी फुलशेतीऐवजी अन्य नगदी पिकांकडे मोर्चा वळविला. या पार्श्वभूमीवर फुलशेतीचे क्षेत्र पुन्हा वाढविण्यासाठी शेतकर्‍यांना आधुनिक लागवड तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण,
दर्जेदार रोपे, सिंचन सुविधा, संरक्षित शेतीचे तंत्रज्ञान आणि आवश्यक अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. उत्पादित फुलांना योग्य बाजारपेठ मिळावी, यासाठी विक्री आणि पुरवठा व्यवस्थाही मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे.

पॅकिंग, शीतसाखळीवर भर

फुले अत्यंत नाशवंत असल्याने काढणीनंतरची हाताळणी, पॅकिंग, शीतसाखळी आणि जलद वाहतूक या बाबींना विशेष महत्त्व आहे. त्यामुळे केवळ उत्पादन वाढविण्याऐवजी बाजारपेठेशी थेट जोडणी, निर्यातदारांशी करार, आधुनिक पॅकिंग सुविधा आणि शीतसाखळी उभारणीवरही भर देण्याची गरज आहे. कुंभमेळ्यामुळे निर्माण होणारी मागणी तात्पुरती न राहता फुलशेतीला दीर्घकालीन बाजारपेठ मिळावी, यासाठी प्रशासन प्रयत्नशील राहणार आहे.

कुंभमेळ्यातून मोठी बाजारपेठ

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे नाशिकमध्ये फुलांची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता आहे. धार्मिक स्थळांची सजावट, स्वागत कमानी, धार्मिक कार्यक्रम, सार्वजनिक ठिकाणांची सजावट आणि भाविकांच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणावर फुलांचा वापर होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील फुल उत्पादक शेतकर्‍यांसाठी ही मोठी बाजारपेठ उपलब्ध होऊ शकते.

आधुनिक तंत्रज्ञानासह अर्थसहाय्य उपलब्ध करून देणार
आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर फुलांची मोठी मागणी लक्षात घेऊन जिल्ह्यातील शेतकर्‍यांना फुलशेतीकडे वळवण्यासाठी नियोजन सुरू आहे. शेतकर्‍यांना आवश्यक सोयीसुविधांसह आधुनिक तंत्रज्ञान, प्रशिक्षण आणि अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाकडून नियोजन केले जाणार आहे.
– आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी

Nashik’s flower fields bloom again on the occasion of Kumbh Mela

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

1 day ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

1 day ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

1 day ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

1 day ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

1 day ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

1 day ago