महापालिका गणेशवाडीत उभारणार डिजिटल केंद्र
नाशिक : प्रतिनिधी
महापालिका प्रशासनाने पंचवटी विभागातील गणेशवाडी मार्केट येथील सुमारे 7,400 चौरसमीटर जागेवर अत्याधुनिक डिजिटल अनुभव केंद्र (डिजिटल एक्सपेरियंन्स सेंटर) विकसित करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. याद्वारे शहराची सांस्कृतिक, ऐतिहासिक व आध्यात्मिक ओळख अधिक प्रभावीपणे सातासमुद्रापार पर्यटकांपर्यंत पोहोचवली जाणार आहे.
डिजिटल अनुभव केंद्रात नाशिकचा पौराणिक इतिहास, संस्कृती, परंपरा आणि आध्यात्मिक महत्त्व एकाच छताखाली असेल. प्रगत डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे पर्यटकांना रंजक व अत्याधुनिक अनुभव, विद्यमान तीर्थक्षेत्रे आणि वारसास्थळांना पूरक ठरेल असे नवे प्रमुख आकर्षण, भाविक, पर्यटक, विद्यार्थी, संशोधक व स्थानिक रहिवाशांसाठी वर्षभर खुले राहणारे केंद्र असेल. पर्यटकांचा मुक्काम वाढवून स्थानिक व्यवसाय व रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करणे. खाजगी क्षेत्राचा सहभाग घेऊन आधुनिक पायाभूत सुविधांच्या निर्मिती आणि संचालनामध्ये खाजगी गुंतवणुकीला प्रोत्साहन दिले जाणार आहे. रामकुंड, काळाराम मंदिर, सीतागुंफा, त्र्यंबकेश्वर यांसारख्या प्रमुख धार्मिक व वारसा स्थळांमुळे देशच नव्हे, तर जगभरात आध्यात्मिकदृष्टया ओळख आहे. सिंहस्थ कुभमेळ्यात लाखो भाविक दाखल होतात.
दरम्यान, नाशिकची पौराणिक पार्श्वभूमी, इतिहास आणि महाराष्ट्रातील योगदान यांची एकत्रित माहिती देणार्या एकात्मिक व्यासपीठाची उणीव भासत होती. त्यानुसार डिजिटल अनुभव केंद्र उभारून प्रगत डिजिटल तंत्रज्ञान, परस्परसंवादी (इंटरॅक्टिव्ह) प्रदर्शने, आभासी अनुभव, प्रोजेक्शन मॅपिंग आणि दृकश्राव्य माध्यमाचा वापर करून नाशिकची यशोगाथा रंजक पद्धतीने मांडली जाणार आहे.
महापालिकेच्या मालमत्ता मुद्रीकरण समितीने या प्रकल्पास मान्यता दिली आहे. डिझाइन बिल्ड फायनान्स ऑपरेट ट्रान्सफर (डीबीएफओटी) तत्त्वावर प्रकल्प सल्लागार नेमणूक व पुढील प्रक्रियेसाठी महासभेची मान्यता मागण्यात आली आहे.
लोकप्रतिनिधींचा विरोध?
गणेशवाडीतील भाजी मार्केटमध्ये विक्रेते बसत नसल्याने ते तसेच पडून होते; परंतु फुलबाजार येथे दररोज भरत असल्याचे चित्र आहे. भाजीविक्रेत्यांना पर्यायी जागा म्हणून या मार्केटची व्यवस्था केली होती. मात्र, आता याठिकाणी डिजिटल केंद्र उभारले जाणार आहे. स्थानिक विक्रेत्यांसह लोकप्रतिनिधी प्रशासनाच्या या निर्णयास विरोध करणार का? याकडे लक्ष लागले आहे.
Nashik’s historical identity to reach across the seven seas.