राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष  ॲड. रवींद्र  पगार यांचे निधन

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष
ॲड. रवींद्र  पगार यांचे निधन
नाशिक : प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र  पगार ( ६४) यांचे अल्पशा आजाराने (काल दि.३) निधन झाले.
त्यांचा अंत्यविधी आज बुधवार दि. ४ फेब्रुवारी रोजी दु. ३ वाजता उत्राने, ता.बागलाण जि. नाशिक येथे होणार आहे.
सन २०१२ पासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाशिक जिल्हाध्यक्ष म्हणून पगार हे कार्यरत होते. ज्येष्ठ नेते खा. शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री स्व.अजितदादा पवार, मंत्री छगन भुजबळ यांचे निकटवर्तीय असलेल्या ॲड. पगार यांनी नाशिक महानगरपालिका शिक्षण मंडळाचे उपसभापती म्हणून काम केले होते.
संघटनात्मक कामकाजाचा सुमारे ४० वर्षांचा अनुभव असलेल्या ॲड. पगार यांनी एकत्र काँग्रेसमध्ये युवक काँग्रेस व एन एस यू आय या विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्षपद देखील यशस्वीरित्या सांभाळले होते.
याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस तसेच विविध जिल्ह्यांना निरीक्षक म्हणून देखील त्यांनी काम केले होते. सन १९९९ मध्ये शरद पवार यांनी काँग्रेस पक्षातून बाहेर पडल्यानंतर राज्यात सर्वप्रथम ॲड.रवींद्र पगार यांनी नाशिक येथील मामा मुंगी मंगल कार्यालयात शरद पवारांच्या समर्थनाथ मेळावा घेतला होता.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते स्व. अजित पवार व ना.छगन भुजबळ यांनी महायुतीत सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यानंतर ॲड. पगार या दोन्ही नेत्यांच्या पाठीशी संपूर्ण संघटना एकसंघ ठेवली होती. त्यांच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत  आहे.
भुजबळ यांनी वाहिली श्रद्धांजली
.राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी ॲपेक्स हॉस्पिटल गोविंदनगर नाशिक येथे त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. तसेच पगार कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
यावेळी खासदार भास्कर भगरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे, शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांच्यासह पदाधिकारी व पगार कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *