इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी समन्वयाची गरज

अफवांवर विश्वास ठेवू नका : ना. महाजन

वितरकांच्या प्रमुख मागण्या

♦ ऑइल कंपन्यांकडील क्रेडिट सुविधा पुन्हा सुरू करावी
♦ आगाऊ रक्कम भरल्यानंतर तात्काळ टँकर उपलब्ध करावेत
♦ रविवारीही डेपो सुरू ठेवावेत
♦ पंपांवर पोलीस संरक्षण द्यावे

नाशिक : प्रतिनिधी
जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसची वाढती मागणी लक्षात घेता पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासन, तेल कंपन्या व वितरकांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी केले. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता संयम पाळावा व अनावश्यक साठेबाजी टाळावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात पेट्रोल-डिझेल व गॅस वितरक, तेल कंपन्यांचे प्रतिनिधी आणि अधिकार्‍यांच्या उपस्थितीत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी महापौर हिमगौरी आहेर-आडके, मनपा आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश गायकवाड आदी उपस्थित होते.
मंत्री महाजन म्हणाले की, सध्या पेट्रोल-डिझेलची मागणी सुमारे दीडपट वाढल्यामुळे काही ठिकाणी तात्पुरती टंचाई भासत आहे. मात्र, प्रत्यक्षात पुरवठा उपलब्ध असून, नागरिकांनी घाबरून जाऊन इंधन साठवणे टाळावे. पंपांवर कोणतेही वाद निर्माण होऊ नयेत यासाठी कर्मचार्‍यांनी ग्राहकांशी संयमाने व नम्रतेने वागावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले की, वेल्डिंग व ऑटोमोबाइलसारख्या काही उद्योगांवर तात्पुरता परिणाम झाला आहे. गॅस वितरणात घरपोच सेवेला विलंब होत असून, ई-केवायसी पूर्ण केलेल्या ग्राहकांना प्राधान्य देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
गॅस वितरकांनी सांगितले की, प्लांट सुट्टीच्या दिवशी बंद राहिल्याने वितरणावर परिणाम होत आहे. ओटीपी-आधारित वितरण पद्धती प्रभावीपणे राबविल्यास गर्दी कमी होण्यास मदत होईल. घरगुती गॅसचा पुरवठा सुरळीत असला तरी व्यावसायिक सिलिंडरमध्ये काही अडचणी कायम आहेत. दरम्यान, अफवांमुळे काही ठिकाणी इंधनासाठी अनावश्यक गर्दी होत असून, साठेबाजीमुळे ताण वाढत आहे. प्रत्यक्षात पुरवठा पुरेसा असल्याने नागरिकांनी संयम बाळगावा, असे कंपनी प्रतिनिधींनी स्पष्ट केले.

Need for coordination to maintain smooth fuel supply

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *