दीड तास फटकेबाजी; रस्त्यांवर पाणी, शेतकरी चिंतेत
चांदवड : वार्ताहर
चांदवड शहरासह तालुक्यात गुरुवारी (दि. 26) सायंकाळच्या सुमारास वादळी वारा, विजांचा कडकडाट आणि गारांसह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. सुमारे दीड ते दोन तास चाललेल्या या पावसामुळे शहरात काही ठिकाणी पाणी साचले होते, तर काढणीला आलेल्या पिकांच्या नुकसानीची शक्यता निर्माण झाल्याने शेतकरीवर्ग चिंतेत सापडला आहे.
तालुक्यात गुरुवारी दुपारपासूनच ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास अचानक सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. पावसाच्या मोठ्या सरी आणि त्यासोबत असलेल्या गारांमुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. पावसामुळे शहरातील काही सखल भागांत आणि मुख्य रस्त्यांवर पाणी साचले होते, मात्र पावसाचा जोर ओसरताच पाण्याचा
निचरा झाला.
अवकाळी पावसामुळे आणि गारांच्या वर्षावामुळे शेतातील पिकांच्या स्थितीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. शेतात सध्या काढणीला आलेला गहू, तसेच द्राक्ष, कांदा आणि मका या पिकांना या वातावरणाचा फटका बसण्याची शक्यता आहे. पाऊस आणि वार्यामुळे पिकांचे किती नुकसान झाले आहे, याचा अंदाज घेण्याचे काम शेतकरी करत असून, अचानक आलेल्या या अस्मानी संकटामुळे बळीराजा धास्तावला आहे.
Chandwad hit by hailstorm