नवचैतन्य

भाजपाची सत्ता असलेल्या राजस्थानातील जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांत जोरदार मुसंडी मारणार्‍या काँग्रेसमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. गेल्या महिन्यात काही
राज्यांत झालेल्या विधान परिषद निवडणुकांत पदवीधर व शिक्षक या सुशिक्षित मतदारांनी काँग्रेसला नाकारले होते. सप्टेंबर 2026 मध्ये याच राज्यातील झालेल्या पालिका निवडणुकांत काँग्रेसवर भाजपाने मात केली होती. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार आणि कर्नाटक या मोठ्या राज्यांतील विधान परिषदांच्या पदवीधर व शिक्षक 28 मतदारसंघांतील निवडणुकांत काँग्रेसची गेल्या ऑक्टोबर महिन्यात पीछेहाट झाली. मतमोजणी सुरू असताना आणि सर्व निकाल जाहीर झाले नसताना काँग्रेसने 28 पैकी किती जागा जिंकल्या, असा थेट सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करून त्या पक्षाच्या नेत्यांना डिवचले होते. त्याचवेळी उत्तर प्रदेशातील त्यांच्या वाराणसी लोकसभा मतदारसंघाचा समावेश असलेल्या वाराणसी विभागातील पदवीधर व शिक्षक अशा दोन्ही जागांवर भाजपाचे उमेदवार पिछाडीवर होते. या दोन्ही जागा समाजवादी पक्षाने जिंकल्या. देशभरात भाजपाच्या आक्रमक प्रचाराचा सामना काँग्रेस करत असून, पक्षाचा जनाधार घटत चालल्याचे दिसत असताना राजस्थानातून काँग्रेसला दिलासा मिळाला आहे. राजस्थानात काँग्रेसची तशी ताकद आहेच. गेल्या महिन्यात याच राज्यात पालिका व परिषद निवडणुकांत झालेल्या पीछेहाटीची भरपाई काँग्रेसने ग्रामीण भागात भरून काढली. पक्षाने अत्यंत नेटाने सत्ताधारी भाजपाला टक्कर दिली. राजस्थानातील जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांत सत्ताधारी भाजपाची जबरदस्त पीछेहाट झाल्याने काँग्रेसच्या गोटात उत्साहाचे वातावरण आहे. राजस्थानातील भाजपाचा पराभव म्हणजे डबल इंजिन सरकारचा पराभव असल्याचे म्हणत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, विरोधी पक्षनेते राहुल गांधी, माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना डिवचले आहे. राजस्थानातील ग्रामीण मतदारांनी सत्ताधारी भाजपाला नाकारले आहे. राजस्थानात सत्ता नसली, तरी काँग्रेसमधील मतभेद पराकोटीचे आहेत. गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील मतभेद जगजाहीर आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपाचा पराभव नजरेत भरणारा आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत नेहमीच सत्ताधारी पक्ष बाजी मारत असतो, पण राजस्थानच्या ग्रामीण मतदारांनी भाजपाच्या विरोधात कौल दिला आहे. सप्टेंबर 2026 मध्ये झालेल्या महानगरपालिका, नगरपालिका व नगर परिषदांच्या निवडणुकांत भाजपाची सरशी झाली होती, तेव्हा काँग्रेसने जोरदार टक्कर दिली होती. त्यानंतर ग्रामीण भागात काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली आहे. या राज्यात नोव्हेंबर-डिसेंबर 2028 मध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. स्थानिक निवडणुकांना विधानसभा निवडणुकांची सेमीफायनल मानले जाते. या पार्श्वभूमीवर मतांचे गणित पाहता, नगरपालिका आणि पंचायत या दोन्ही निवडणुकांमध्ये मिळून काँग्रेसने भाजपाला 12 लाख 97 हजारांहून अधिक मतांनी मागे टाकले आहे. शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (नगरपालिका) निवडणुकीत भाजपने 98 हजारांहून अधिक मतांची आघाडी घेत काँग्रेसचा पराभव केला, तर पंचायत निवडणुकीत काँग्रेसने भाजपाचा 13 लाख 30 हजारांहून अधिक मतांनी पराभव केला आहे. या निकालांनी सत्ताधारी पक्षासाठी धोक्याची घंटा वाजवली आहे. राजस्थानमध्ये प्रादेशिक पक्ष म्हणून आपली ओळख निर्माण करणार्‍या राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्ष व भारत आदिवासी पक्ष या दोन्ही पक्षांना एकूण सुमारे 25 लाख मतदारांची साथ मिळाली. हा आकडा भाजपा आणि काँग्रेसमधील मतांच्या फरकापेक्षाही खूप मोठा आहे. राजस्थानमधील नगरपालिका आणि पंचायत निवडणुकांना विधानसभेची ’सेमिफायनल’ मानले जाते. या पार्श्वभूमीवर मतांचे गणित पाहिले असता, यावेळी नगरपालिका आणि पंचायत या दोन्ही निवडणुकांमध्ये मिळून काँग्रेसने भाजपला 12.97 लाखांहून अधिक मतांनी मागे टाकले आहे. काँग्रेसला भाजपपेक्षा 3.5 टक्के मते अधिक मिळाली. काँग्रेसची रणनीती आणि सत्तेच्या विरोधात असलेली नकारात्मता हे दोन घटक भाजपाच्या पराभवास कारणीभूत ठरल्याचे सांगितले जात आहे. शहरी निवडणुकांतील पराभवानंतर काँग्रेसने निष्क्रिय पदाधिकार्‍यांना बदलून सक्रिय कार्यकर्त्यांकडे बूथ व मंडल स्तराची जबाबदारी सोपवली होती. माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गोविंदसिंह डोटासरा आणि वरिष्ठ नेत्यांनी मतभेद बाजूला ठेवून सामूहिक प्रचार केला. काँग्रेसने स्थानिक सहमतीने तरुण उमेदवारांना संधी दिली आणि उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या टप्प्यातच असंतुष्टांची समजूत काढून बंडखोरी रोखली. या गोष्टींचा लाभ काँग्रेसला झाला. ग्रामीण अर्थव्यवस्था, कृषिप्रश्न आणि महागाईवरून जनतेत असलेल्या असंतोषाला काँग्रेसने प्रभावीपणे आपल्या बाजूने वळवले. स्थानिक भाजपा आमदार व मंत्र्यांच्या विरोधातील नाराजी भाजपाला भोवली. भाजपाने नेत्यांच्या नातेवाइकांना तिकिटे दिल्याने बंडखोरी झाली. महामंडळांवरील राजकीय नियुक्त्या रखडल्याने भाजपा कार्यकर्त्यांमध्ये उत्साह नव्हता. याचा फायदा काँग्रेसने घेतला. या निकालांमुळे काँग्रेसला 2028 च्या विधानसभा निवडणुकीसाठी मोठी ऊर्जा मिळाली आहे. राहुल गांधी यांनी राजस्थान काँग्रेसच्या विजयासंदर्भातील पोस्ट शेअर करत राज्यातील जनतेचे आभार मानले. भाजपने मनरेगा योजनेवर हल्ला केला, शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान केले आणि ग्रामपंचायतींचे अधिकार कमी केले, असा आरोप त्यांनी केला. महागाई, बेरोजगारी आणि स्थलांतरामुळे ग्रामीण भागातील परिस्थिती कठीण झाली आहे. ग्रामीण जनता हे सर्व पाहत होती. आता त्यांनी मतदानातून आपले मत व्यक्त केले आहे, असे त्यांनी म्हटले. राजस्थानातील निकाल देशातील प्रत्येक गावचा आवाज आहे, असेही म्हणत त्यांनी भाजपाला डिवचले. पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह अन्य नेत्यांनी भाजपाच्या धोरणावर निशाणा साधला. राजस्थानात एक-दोन प्रादेशिक पक्ष वगळता भाजपा व काँग्रेस हेच दोन मोठे पक्ष आहेत. त्यांच्यातच सत्तेसाठी चुरस असते. पुढील वर्षी होणार्‍या विधानसभा व त्यानंतरच्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने राजस्थानचा स्थानिक निकाल भाजपासाठी धोक्याची घंटा वाजवणारा आहे, तर काँग्रेससाठी आशादायक आहे. निकाल ग्रामीण भागातील स्थानिक प्रश्न, शेतकर्‍यांमधील असंतोष आणि तिकीट वाटपातील नाराजीचे प्रतिबिंब आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपासाठी आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. पक्षांतर्गत गटबाजी किंवा मतभेद यानंतर संपुष्टात आले, तरच काँग्रेसला आशा ठेवता येईल.

New Vitality

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *