सुप्रीम कोर्टाचा राहुल गांधींना फटकार
नवी दिल्ली : प्रतिनिधी
काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सुप्रीम कोर्टापर्यंत काढलेला मोर्चा त्यांना चांगलाच भोवला आहे. सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी राहुल गांधी, समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव आणि इंडिया आघाडीच्या इतर नेत्यांना नोटीस बजावून त्यांच्या वर्तनावर स्पष्टीकरण मागितले आहे. सरन्यायाधीश सूर्य कांत आणि न्यायमूर्ती जोयमाल्या बागची यांच्या खंडपीठाने सुनावणीदरम्यान अत्यंत कडक टिप्पणी केली. सूर्य कांत म्हणाले, की आम्ही उंच मनोर्यांमध्ये बसलेलो नाही. आम्हाला माहिती आहे की, बाहेर काय वक्तव्ये केली जातात आणि कोर्टात काय बोलले जाते. कोणीही न्यायपालिकेला धमकावू शकत नाही.
निवडणूक आयोगाकडून सुरू असलेल्या मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरावलोकन (एसआयआर)मध्ये मोठ्या प्रमाणात घोळ आणि मतदारांची नावे वगळल्याचा आरोप गेले काही दिवस विरोधक करत आहेत. याच मुद्द्यावर राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली इंडिया आघाडीच्या 13 नेत्यांनी 12 ऑक्टोबर रोजी चलो दिल्ली – मार्च फॉर डेमोक्रेसी काढला होता. हा मोर्चा थेट सुप्रीम कोर्टाच्या आवारापर्यंत पोहोचला होता, जिथे हजारो समर्थकांनी घोषणाबाजी केली आणि काहींनी पोलिसांच्या बॅरिकेड्स तोडून कोर्ट परिसरात प्रवेश केला होता. या मोर्चाविरोधातच सुप्रीम कोर्टात याचिका दाखल झाली होती, त्यावर गुरुवारी सुनावणी झाली.
No one can threaten the judiciary; Supreme Court raps Rahul Gandhi