त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी
त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर भाविकांना दर्शनासाठी कोणत्याही परिस्थितीत बंद राहणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाने घेतला आहे.
मंदिराच्या पूर्व बाजूला दर्शन पथाच्या उभारणीसाठी 15 ऑक्टोबर ते 15 डिसेंबर 2026 या दोन महिन्यांच्या काळात दर्शन बंद ठेवण्याची सूचना प्रशासनाने केली होती. या विषयावर विश्वस्त मंडळाच्या बैठकीत चर्चा झाली असता, बहुतांश विश्वस्तांनी मंदिर बंद ठेवण्यास तीव्र विरोध दर्शवला.
याबाबत माहिती देताना ट्रस्टचे विश्वस्त तथा मुख्य पूजक डॉ. सत्यप्रिय शुक्ल यांनी सांगितले की, देवस्थानच्या घटनेत भाविकांचे दर्शन बंद करण्याचे कोणतेही प्रावधान नाही. नैसर्गिक किंवा आपत्तीजनक परिस्थिती नसताना मंदिर बंद करणे अनुचित आहे. प्रशासनाला मंदिराच्या प्रांगणाबाहेर विकासकामे करायची असल्यास ती त्यांनी आपापल्या परीने करावीत; मात्र त्यासाठी मंदिर बंद करून भाविकांना वेठीस धरणे चुकीचे आहे. गेल्या काही दिवसांत शहरातझालेली तोडफोड आणि त्यातच मंदिर दोन महिने बंद राहिल्यास स्थानिक व्यावसायिक अडचणीत येऊन रोजगाराचा गंभीर प्रश्न निर्माण होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांच्या नावाखाली भाविकांना त्र्यंबकेश्वरापासून दूर ठेवण्याचा हा प्रयत्न असल्याचा सूरही उमटत आहे.
त्र्यंबकेश्वर मंदिर भक्तांच्या दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार नाही. भाविकांच्या उपासनेवर निर्बंध लादण्याचा अधिकार कोणालाही नाही. मंदिराबाहेरील कामांसाठी मंदिर बंद ठेवणे अयोग्य असून, ट्रस्टच्या घटनेतही तशी तरतूद नाही.
– डॉ. सत्यप्रिय शुक्ल, विश्वस्त, त्र्यंबकेश्वर मंदिर ट्रस्ट
The Trimbakeshwar Temple will remain open for devotees to offer prayers (darshan).