शेतकर्‍यांना कुणीच वाली नाही

स्व. शरद जोशींनी 1980 च्या दरम्यान झोपी गेलेल्या अज्ञानी असलेल्या शेतकर्‍यांना सज्ञान केले. राज्यासह दिल्लीचे तख्त हलवले. देशभरातील शेतकरी जागे झाले व आक्रमक झाले व याच संघटनेमुळे सत्ता बदलली पण टिकली नाही. स्व. शरद जोशींना राज्यसभेत घेतले व हळूहळू ताकद कमी होत गेली. त्या काळात शरद पवारांनी बागलाणचे शेतकरी नेते रामचंद्र बापू पाटलांना विधान परिषदेची ऑफर दिली, पण शरद जोशींशी बोलून निर्णय देतो, पण पुढे काय झाले ते गुलदस्त्यातच राहिले व प्रामाणिक बापू तसेच राहिले. नंतर शरद जोशी खासदार झाल्यावर अनेकांना धक्का बसला. राजकारणापासून दूरच राहू हे वचन पाळले गेले नाही. ‘गिसाका’ची दोन वेळा निवडणूक शेतकरी संघटनेने जिंकली व ‘गिसाका’च बंद झाला. ठेंगोडा सूतगिरणीत तेच झाले व सूतगिरणी थांबली. नरेंद्र अहिरेंनी विधानसभा लढवली पण पराभव झाला. तरी स्व. शरद जोशी, स्व. प्रल्हाद पाटील कर्‍हाड, स्व. माधवराव मोरे, स्व. नरेंद्र अहिरे, भास्करराव बोरावके, रामचंद्र बापू पाटील, अनिल गोटे, राजू शेट्टी यांना शेतकरी विसरले नसले तरी नंतरच्या काळात वेगवेगळ्या शेतकरी संघटना तयार झाल्या. नंतरच्या काळात राजू शेट्टी व सदाभाऊ खोत यांनी उसपट्ट्यात अस्तित्व ठेवले तर रघुनाथदादा पाटील यांनी स्वतःची संघटना काढली. विदर्भात विजय जावद्या यांनी आजपर्यंत थोडे अस्तित्व ठेवले. नंतर सदाभाऊ खोत आमदार आहेत. मंत्री होते. राजू शेट्टी आमदार, खासदार झाले. अनिल गोटे आमदार झाले. रघुनाथदादा पाटील निवडणुकीत पराभूत झाले.
आता मात्र स्व. शरद जोशींचे मोजकेच समर्थक बिल्ला लावून संघटना आहे हे दाखवतात, पण ताकद राहिली नाही. खोत, शेट्टी हे वेगळे झाले. म्हणजे राज्यात डझनभर शेतकरी संघटना असल्या तरी फार ताकद नाही. सदाभाऊ खोत महायुतीत आहेत तर राजू शेट्टी थोडेफार महाविकास आघाडीसोबत दिसतात.
अलीकडे सर्वच क्षेत्रांत संघटनांचा महापूर आलेला असून, अनेक संघटनांचा उपयोग स्वतःला मिरवून घेण्यासाठी दोन-चार स्वयंघोषित नेते करतात. पत्रकारांच्या पायलीच्या पंधरा संघटना. पत्रकारांचे प्रश्न जैसे थे. निवेदने देणे व स्वतःला मिरवणे असेच संघटनेचे काही प्रमुख राज्यभर आहेत. अधूनमधून पुरस्कार वाटून स्वतःचे अस्तित्व दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न काही संघटना करीत असतात. पण हे पुरस्कार देताना कोणते मेरिट लावतात हे त्यांना माहीत. मालदार असामींना शून्य कर्तृत्व असताना राज्यभर अनेक संघटना पुरस्कार वाटते. पुरस्कारांचे महत्त्व कमी
झाले आहे.
पाणीप्रश्नी राजकारण
पाणीटंचाई पुढार्‍यांचे मोठे व्यासपीठ झाले आहे. जवळजवळ सर्वच तालुक्यांत पाणीप्रश्नावर संघर्ष समित्या आहेत. अधूनमधून लहान सभेकडे जनता दुर्लक्ष करते व सोशल मीडियावर स्वतःची पाठ थोपटून घेणारे असंख्य नेते राज्यात आहेत. पाणीप्रश्न अनेक वर्षे चर्चेत ठेवतात. मग हळूहळू गाडी जागेवरून निघते व काम पूर्ण होईपर्यंत चार-पाच-सहा विधानसभा पाण्यावर जिंकल्या जातात. कळवणचे अर्जुन सागर तथा पुनद , साक्रीचे अक्कलपाडा, झाडी- एरंडगाव कालवा, केळझर चारी नंबर आठ व नार-पार वर्षानुवर्षे चर्चेत होते. आता नार-पारला मुहूर्त मिळालेला वाटतो, पण असंख्य अडचणी दिसतात. नार-पार मार्गी लावा मग कालवे बघा, अशी जनतेची मागणी आहे. पण, आवाज बारीक असल्याने कुणी दखल घेणार नाही.
आज गिरणा नदीच्या काठावरील शेतकरी गिरणा डावा-उजव्या कालव्यावरील शेतकरी नाराज आहेत तर मोसम साळ कालव्यावरील शेतकरी दीपावली साजरी करीत आहेत. त्यांना किमान खरिपातील पूरपाण्याची अपेक्षा आहे. कालवे मोठे झाल्यावर पूरपाण्यावरून गावागावांत मारामार्‍या होतील. म्हणजे शेवटी राजकारण करण्यासाठी नेते कोणत्याही थराला जातात हे नक्की. ज्याला छान भाषण येते, जोरात थापा व बनवेगिरी करता येतो तो नेता काही दिवस नेता होतो, पण हळूहळू उघडा पडतो व लोकांच्या मनातून उतरतो हे आम्ही सतत बघत असतो. काही ठिकाणी कलाकार नेते असतात. समाजाची नाडी ओळखून यशस्वी होतात. नंतर विरोधकांना पायाखाली घेतात व प्रबळ विरोधकच शिल्लक नसतो. तोपर्यंत मालामाल झालेल्या नेत्यापुढे कुणाचीच ताकद नसते व तो कसेही वागला तरी विरोध करायची हिंमत नसते, असे किमान पन्नास विधानसभा मतदारसंघ राज्यात आहेत व तेथे बाप, मुलगा, नातू अशी परंपरा सुरू असते.
कर्तृत्वावर का होईना बारामतीकर पवारांचे बघा. आजोबा, नातू, कन्या एकाच वेळी खासदार तर काकू सुनेत्राताई व आक्रमक चेहरा रोहित पवार विधानसभेत. यात कर्तृत्व आहे. याला घराणेशाही पण म्हणता येत नाही.

गॅस सिलिंडर पुराण

युद्धामुळे सर्व जगच संकटात आहे, पण भारत सुदैवाने सुरक्षित आहे. पण सर्व देशाचा प्राणवायू संपला. आता देशातील जनता गुदमरून मरेल असे वातावरण मोदी विरोधकांनी तयार केले आहे. व्यावसायिक सिलिंडर नाही म्हणून हॉटेल बंद करणार नाहीत; कारण डिझेलच्या मोठ्या शेगड्या, चुलीसाठी लाकडे, कोळसा सर्व उपलब्ध आहे. घरगुती सिलिंडर सर्वांकडे आहेत. पण, संपणार या भीतीने सिलिंडर भरून ठेवा म्हणून नाहक वातावरण बिघडवले जात आहे. लाईटशिवाय वेळप्रसंगी राहू शकणारी जनता सिलिंडरसाठी उपाशी राहणार नाही. थोडी गैरसोय सहन करावी लागते; पण बोंबाबोंब.. म्हणे सिलिंडर किरकोळ विषय आहे.

No one cares for the farmers.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *