ओट्स एक फॅन्सी नाश्ता

डॉ. प्रणिता अशोक
(लठ्ठपणा आणि आहारतज्ज्ञ)

लोकांना ओट्सबद्दल अनेक प्रश्‍न असतात जसे की – ओट्स खायचे का, कधी इत्यादी. लोकांचा असा समज असतो की, वजन कमी करायचे असेल तर ओट्स खाल्ले पाहिजेत. 30 ग्रॅम ओट्स आणि 100 ग्रॅम मध्यम आकाराच्या केळीमध्ये
कार्बोदके यांचे प्रमाण समान असले तरी केळीमध्ये व्हिटॅमिन आणि मिनरलस असतात, पण ओट्समध्ये नसतात. याचा अर्थ केळीमध्ये ओट्सपेक्षा जास्त पोषणमूल्य असतात. प्रोटीनसाठी नॉनव्हेजमध्ये अंडी हा चांगला पर्याय आहे. कारण 1 अंड्यात 6 ग्रॅम प्रोटीन असते, पण ओट्समध्ये 5 ग्रॅम प्रोटीन असते. बरीच लोक ओट्समध्ये 3-4 अंडी घालून उत्तपा खातात. त्यापेक्षा अंड्याचे ऑम्लेट खाल्ले तर जास्त चांगले लागते. अंड्याच्या पिवळ्या भागात व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन बी 12 पण असते. जर अंड्यामधून चांगली पोषणमूल्य मिळतात तर ओट्स व अंडी असे विचित्र संयोजन असलेला पदार्थ का खायचा?
ओट्सची तुलना पोळी किंवा ओट्स किंवा डाळींशी केली तर 30 ग्रॅम ओट्समधून जेवढे प्रोटीन व फायबर्स मिळतात तेवढेच एक पोळीतून किंवा भाकरीतून मिळतात आणि भाजीतून व्हिटॅमिन आणि मिनरलस मिळतात. फक्त ओट्स कुणी खात नाही तर मॅगीसारखे ओट्सचे पॅक मिळते ते पाण्यात शिजवून खाल्ले जाते. या ओट्समध्ये प्रीजरवेटीवज असतात जे शरीराला हानिकारक असतात, पण पोळी, भाकरीमध्ये ते नसतात.
सर्वसाधारणपणे ओट्समध्ये कमी उष्मांक असतात, असा गैरसमज आहे.कारण 30 ग्रॅम ओट्समध्ये 100 उष्मांक असतात. एका पोळीमधून पण तेवढेच उष्मांक मिळतात. ओट्स खाण्यापेक्षा थालीपीठ किंवा डाळीचे धिरडे खाणे हा एक चांगला पर्याय आहे व त्यातून जास्त प्रमाणात प्रोटीन्स मिळतात.
जर प्रोटीन, फायबर, व्हिटॅमिन इत्यादी पोषणमूल्य जर फळे, भाजी, अंडी यामधून मिळते तर ओट्स खायचा अट्टहास का? चांगल्या प्रकारचा व आवश्यक पोषणमूल्य असलेला आहार घेतला तरच वजन कमी होते व परत वाढत नाही.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *