चैत्रोत्सवात सप्तशृंगगडावर भक्तांचा महासागर

51 हजार भाविक नतमस्तक; पाचव्या दिवशीही प्रचंड गर्दी

सप्तशृंगगड : प्रतिनिधी
सप्तशृंगगडावर नवरात्रोत्सव व चैत्रोत्सव हे प्रमुख उत्सव असून, दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी येतात. ‘देवीच्या माहेरची माणसं’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या खानदेशातील भाविकांचा विशेष ओघ चैत्रोत्सवात पाहायला मिळतो. ध्वज मिरवणुकीपर्यंत गर्दीत वाढ होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.
साडेतीन शक्तिपीठांपैकी आद्य स्वयंभू शक्तिपीठ असलेल्या श्रीक्षेत्र सप्तशृंगगडावर चैत्रोत्सवाच्या पाचव्या दिवशीही भाविकांचा प्रचंड ओघ कायम असून, पंचामृत महापूजेनंतर दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या. ट्रस्टचे विश्वस्त भूषणराज तळेकर व सप्तशृंगगड ग्रामपंचायत अधिकारी संजय देवरे यांनी सपत्नीक पंचामृत महापूजा केली. सकाळी पुरोहितांच्या मंत्रघोषात पंचामृत महापूजा झाली. गाभार्‍यातील आकर्षक फुलसजावट, देवीला परिधान केलेले निळ्या रंगाचे भरजरी वस्त्र व सुवर्णालंकार यामुळे वातावरण अधिकच भक्तिमय झाले होते. सकाळी 9.25 ला दर्शनाची बारी पहिल्या पायरीपर्यंत पोहोचल्याने गर्दीची तीव्रता स्पष्ट झाली. चौथ्या दिवशी यात्रेतील उच्चांक नोंदवला गेला. सुमारे 51 हजार भाविकांनी देवीचे दर्शन घेतले, तर 24 हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. पाचव्या दिवशीही तोच उत्साह कायम असून, गड परिसर ‘आई सप्तशृंगी देवीच्या’ जयघोषाने दुमदुमला आहे. खानदेशासह नंदुरबार, नवापूर, धुळे, जळगाव तसेच मध्य प्रदेश व गुजरात व विविध राज्यांमधून भाविक गडावर दाखल होत आहेत.
अनेक पालख्या, दिंड्या व चालत येणारे भाविक यामुळे गडावर भक्ती आणि श्रद्धेचा अनोखा मिलाफ अनुभवायला मिळत आहे. काही पालखी दिंड्यांना 30 ते 40 वर्षांची परंपरा असून, भाविकांचा उत्साह विशेष लक्षवेधी ठरत आहे. ट्रस्टचे विश्वस्त अ‍ॅड. ललित निकम, तहसीलदार रोहिदास वारुळे, पोलीस निरीक्षक खगेन्द्र टेंभेकर, कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर, इस्टेट कस्टोडियन प्रकाश पगार, कार्यालयीन अधीक्षक प्रकाश जोशी, जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे, नानाजी भामरे, प्रशांत निकम, मंदिरसह विभागप्रमुख विश्वनाथ बर्डे, सुनील कासार, सुरक्षा अधिकारी यशवंत देशमुख, नारद आहिरे, मुरलीधर गायकवाड, मुरलीधर गावित, शाम पवार, विजय भवरे, तसेच सरपंच रमेश पवार, उपसरपंच संदीप बेनके,सदस्य राजेश गवळी, पोलीस पाटील शशिकांत बेनके, ट्रस्ट प्रशासन, पोलीस, ग्रामपंचायत, पुरोहित वर्ग, महसूल, आपत्ती व्यवस्थापन पथक व कर्मचारी आदी प्रयत्नशील आहेत.

♦ गडावर सप्तशृंगीदेवीचा जयघोष.
♦ खानदेशांतील भाविकांची संख्या लक्षणीय.
♦ मध्य प्रदेश, गुजरातमधून भाविक दाखल.
♦ 24 हजार भाविकांना महाप्रसाद.
♦ पोलिसांसह विविध विभाग सतर्क.

Ocean of devotees at Saptshringagad during Chaitrotsav

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *