मुंबईहून येणार्या पदयात्रेकरूंची संख्या सव्वा लाखाच्या घरात; हॉटेल व्यावसायिकांची पर्वणी
सिन्नर : प्रतिनिधी
साईबाबांमुळे आंतरराष्ट्रीय ख्याती असलेल्या शिर्डीत रामनवमी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर साईभक्तांची मोठी गर्दी उसळली असून मुंबईसह राज्यातील विविध भागांतून येणार्या पदयात्रेकरूंमुळे शिर्डीकडे जाणारे मार्ग अक्षरशः फुलून गेले आहेत.
अंगाची लाही करणार्या उन्हाचा सामना करत लाखो साईभक्त शिर्डीकडे मार्गक्रमण करत असून घोटीसिन्नर व नाशिक मार्गे हे पदयात्री सिन्नर तालुक्यातून शिर्डीकडे प्रस्थान करत आहेत. सोमवारी आणि मंगळवारी यातील बहुतेक दिड्यांचा वावी येथे मुक्काम होता.
साईबाबांच्या हयातीत त्यांच्या संमतीने सुरू झालेल्या रामनवमी उत्सवाला देशभरातून भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. विशेषतः मुंबई परिसरातून पदयात्रेने येणार्या साईभक्तांची संख्या लक्षणीय असते. गुढीपाडव्याच्या दिवशी प्रस्थान केलेले हे पदयात्री रामनवमीच्या पूर्वसंध्येला शिर्डीत दाखल होतात.
यंदा मुंबईहून येणार्या पदयात्रेकरूंची संख्या वाढली असून सुमारे सव्वा लाख भाविक 30 पालखी मंडळांद्वारे शिर्डीत दाखल होत आहेत. याशिवाय मुरबाड, पालघर, डहाणू, जव्हार, मोखाडा, नाशिक, वापी व सुरत येथून येणार्या पालख्यांची संख्याही लक्षणीय आहे. मुंबईहून काही पालख्या घोटीसिन्नर मार्गे तर काही नाशिकमार्गे सिन्नरला पोहोचतात. त्यानंतर सिन्नरशिर्डी महामार्गावरून सर्व पालख्या एकत्र प्रवास करत असल्याने गेल्या दोन दिवसांपासून हा मार्ग साईभक्तांच्या गर्दीने गजबजून गेला होता.
सिन्नर ते शिर्डी दरम्यान साईभक्तांच्या आदरातिथ्यासाठी ठिकठिकाणी पाणी, अल्पोपहार व वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. पदयात्रेकरूंमुळे परिसरातील हॉटेल व शीतपेय विक्रेत्यांसाठी हा कालावधी व्यवसायिक पर्वणीचा ठरत आहे.
गॅस टंचाईची झळ, चुलीवर स्वयंपाक
मुंबईहून शिर्डीकडे जाणार्या काही पालख्या मोठ्या असून त्यामध्ये हजारो भाविक सहभागी असतात. साई सेवक मंडळात सुमारे साडेसात हजार तर साईलीला मंडळात साडेचार हजार पदयात्री सहभागी झाले होते.
साईभक्तांसाठी पुरणपोळी, झुणका-भाकरीचा बेत
सिन्नर तालुक्यातील वावी येथे सोमवारी रात्री मुक्कामासाठी आलेल्या मुंबईतील प्रतिष्ठित साईलीला पदयात्री मंडळाच्या साडेचार हजार भाविकांसाठी स्थानिक शिवाजी माळवे यांनी झुणका-भाकरीची पंगत दिली. बाजरीची भाकरी, पिठले, मिरचीचा ठेचा व लापशी या पारंपरिक मेन्यूचा भाविकांनी आस्वाद घेतला. तर अंधेरी येथील साई युवा मित्र मंडळातील पदयात्रेकरूंकरिता माजी सरपंच रामनाथ कर्पे यांनी पुरणपोळीचा बेत आखला होता. पुरणपोळी सोबत सारभात, भजे, पापड व गुलाबजाम असा जेवणाचा मेन्यू होता.
पदयात्रेकरूंना वैद्यकीय सेवाही
मुंबईस्थित साई पालखी सेवा संस्थांच्या वतीने गेल्या पंचवीस वर्षांपासून कसारा व वावी येथे पदयात्रेकरूंसाठी चहा, पाणी, नाश्ता व जेवणाची व्यवस्था केली जाते. चालून दमलेल्या साईभक्तांसाठी मुंबईतील संजीवनी हॉस्पिटलचे डॉ. श्याम अग्रवाल, डॉ. सुनील अग्रवाल व डॉ. राजेश बिनियाला यांच्या मार्गदर्शनाखाली आंतरराष्ट्रीय ख्यातीचे फिजिओथेरपिस्ट भगवानभाई पटेल यांची वीस जणांची अनुभवी अॅक्युप्रेशर थेरपिस्ट टीम वावी येथे सेवा देत आहे.
On the occasion of Ram Navami, Sai devotees filled Shirdi Marg