शेतकर्यांना गांजा आणि खसखस पिकवण्याची परवानगी देण्याची केली होती मागणी
सिन्नर : प्रतिनिधी
शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकर्यांना गांजा आणि खसखस पिकवण्याची परवानगी द्यावी, या मागणीसाठी तालुक्यातील सायाळे येथील सामाजिक कार्यकर्ते विजय शिंदे यांनी मंगळवारी (दि.24) समृद्धी महामार्गावर रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यांनी आंदोलनही सुरू केले होते. मात्र, प्रशासनाने लेखी स्पष्टीकरण दिल्यानंतर त्यांनी आंदोलन तात्पुरते स्थगित केले.
येत्या दहा दिवसांत शासनाकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्यास स्वतःच्या शेतात पाच गुंठे क्षेत्रात गांजा आणि खसखस लागवड करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राज्यातील शेतकर्यांची आर्थिक दुरवस्था ही शेतमालाला योग्य दर मिळत नसल्यामुळे झाली आहे. कर्जबाजारी शेतकर्यांना कर्जाच्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी शासनाने गांजा व खसखस लागवडीस परवानगी द्यावी, अशी मागणी शिंदे यांनी केली आहे.
दरम्यान, सिन्नरचे परीवीक्षाधीन तहसीलदार तथा आयएएस अधिकारी पी. के. सिद्धार्थ रामकुमार यांनी गांजा व खसखस ही पिके अमली औषधी द्रव्य व मन:प्रभावी पदार्थ अधिनियम 1985 अंतर्गत प्रतिबंधित असल्याने त्याच्या लागवडीस परवानगी नसल्याचे लेखी पत्र देत आंदोलन करू नये, अशी विनंती केली.
प्रशासनाच्या विनंतीचा मान राखत आपण समृद्धी महामार्गावरील आंदोलन मागे घेत असल्याचे शिंदे यांनी सांगितले. मात्र शासनाने गांजा व खसखस लागवडीबाबत दहा दिवसांत स्पष्ट भूमिका मांडली नाही तर 4 एप्रिल रोजी स्वतःच्या शेतात पाच गुंठे क्षेत्रात या पिकांची लागवड करू, असा इशाराही त्यांनी दिला. येत्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक परिसरात या पिकांसाठी मोठी बाजारपेठ निर्माण होऊ शकते, असेही शिंदे यांनी सांगितले. शासनाकडून सकारात्मक निर्णय न आल्यास प्रशासनाची मूक संमती समजून लागवड करण्याचा इशाराही त्यांनी दिला. महसूल प्रशासनाच्या वतीने वावीचे मंडळ अधिकारी राम तोर यांनी तहसीलदारांचे पत्र शिंदे यांना दिले. यावेळी महामार्ग सुरक्षा विभागाचे पोलीस उपनिरीक्षक निलेश देशमुख, तुषार गरुड तसेच वावी पोलिस ठाण्याचे कर्मचारी शहाजी शिंदे, विक्रम लगड, विक्रम टिळे, नवनाथ पाटोळे यांनी बंदोबस्त ठेवला होता.
निळवंडे चारीचे काम जूनअखेर पूर्ण होणार
सिन्नरच्या लाभक्षेत्रातील गावांना निळवंडे धरणाच्या आवर्तनाचा लाभ मिळावा यासाठी शिंदे यांनी जलसंपदा विभागाकडेही निवेदन दिले होते. यावेळी उपविभागीय अभियंता कुणाल बोबडे यांनी आंदोलनस्थळी येऊन येत्या जूनपर्यंत सिन्नरच्या लाभक्षेत्रातील वितरिकांची कामे पूर्ण केली जातील तसेच चारीचे रखडलेले काम मार्गी लावले जाईल, असे लेखी आश्वासन दिले. यावेळी सायाळे येथील ग्रामस्थ उपस्थित होते.
Vijay Shinde’s protest suspended for now after written assurance