कांद्याच्या घसरत्या दरामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी

लासलगाव प्रतिनिधी

एकीकडे महागाई दरदिवशी विक्रमी उच्चांक गाठत आहे. पेट्रोल,डिझेल,खाद्यतेले,मिरची,मसाल्यांसह अनेक वस्तू महाग होत असताना मात्र कांद्याच्या दरात दररोज घट होत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत.कांद्याचे भाव असेच कमी होत राहिले तर शेतकऱ्यांच्या डोळ्यात केवळ दुःखाचे अश्रूच दिसून येतील.विशेष बाब म्हणजे महिनाभरापूर्वी कांद्याचे भाव ३ हजार ते २ हजार रूपये क्विंटल होते तेच दर आता ३०० ते ४०० रु प्रती क्विंटल वर येऊन ठेपले असल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे.सद्या लासलगाव बाजार समितीत लाल व उन्हाळ कांद्याची दररोज १८ ते २० क्विंटल आवक होत आहे त्याप्रमाणात मागणी कमी झाल्याने नाशिक जिल्ह्यासह राज्याच्या विविध भागात कांद्याच्या भावात घसरण होऊ लागली आहे. लासलगाव सह परिसरात उन्हाळा कांदा काढणीला वेग आला आहे.येत्या काही दिवसात उन्हाळा कांद्याच्या आवकेत वाढ होण्याची शक्यता आहे.मागणीपेक्षा पुरवठा अधिक झाल्यास कांद्याच्या दरात अजून घसरण होण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे.दरम्यान कांद्याचे कोसळणारे दर पाहून बळीराजाच्या डोळ्यातील अश्रू देखील कोसळू लागले आहे.अनेक नैसर्गिक संकटांवर मात करीत पिके जोपासली मात्र भाव मिळेनासा झाल्याने बळीराजा हवालदिल झाला असल्याचे पाहायला मिळते आहे.

प्रतिक्रिया

कांदा लागवड ते साठवणूक,विक्री व्यवस्थापन यामध्ये कांदा उत्पादकांना विविध अडचणींचा सामना करावा लागतो.तसेच वीज,पाणी,इंधन दरवाढ,खतांच्या वाढत जाणाऱ्या किंमती याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे तसेच सद्या कांद्याच्या बाजारभावात मोठी घसरण होत आहे त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने कांदा निर्यातीला प्रोत्साहन द्यावे

राजाबाबा होळकर
कांदा उत्पादक शेतकरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *