देवगावला बकरी व्यापाऱ्याचा खून

देवगावला बकरी व्यापाऱ्याचा  खून

लासलगांव  प्रतिनिधी

अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील मंजूर येथील बकऱ्या खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्याचा निफाड तालुक्यातील देवगाव येथे पाय बांधून धारदार तिक्ष्ण हत्याराने गळा चिरून खून करण्यात आल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली असून यासंदर्भात लासलगाव पोलीस कार्यालयात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात कौतिक अलाउद्दीन खाटीक रा. मंजूर यांनी लासलगाव पोलीस कार्यालयात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की त्यांचे वडील अलाउद्दीन शमशुल भाई खाटीक (५३) हे बकऱ्यांची रक्कम देण्यासाठी १२ लाख रुपये घेऊन गुरुवारी सकाळी दुचाकीवर घराबाहेर पडले होते त्यानंतर वडिलांची पंचाळे ता. सिन्नर येथे भेट झाली होती. त्यानंतर ते सायखेडा येथे जाणार असल्याचे त्यांनी सांगितले होते मात्र ते नैताळे ता. निफाड येथे गेल्याचे फोनवर समजले होते. त्यानंतर पुन्हा वडिलांशी मुलाने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा फोन बंद आला व मुलगा घरी पोहोचल्यावर त्याने नातेवाईकांकडे वडिलां बाबत चौकशी केली असता वडील घरी अथवा कुठल्याच नातेवाईकाकडे गेले नव्हते. त्यानंतर धामोरी येथील नातेवाईकांनी फोन करून निफाड तालुक्यातील देवगाव येथे मृतदेह सापडला असून जवळ ओळख पत्र असून त्यावर अल्लाउद्दीन खाटीक नाव असल्याचे सांगितले. ही माहिती मिळताच ठिकाणी गेलो असता वडील पालथ्या स्थितीमध्ये पडलेले पाय दोरीने बांधले व गळा समोरील बाजूने कापलेला होता. जवळच वडिलांची मोटरसायकल लावलेली होती .मोटरसायकलवर नायलॉन ची पिशवी होती परंतु त्यामध्ये ठेवलेले रक्कम मिळाली नाही. अज्ञात कोणीतरी व्यक्तीने वडिलांचा खून करून जीवे ठार मारल्याचे नमुद केले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ तांबे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, लासलगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा करून लासलगाव पोलीस कार्यालयात या संदर्भात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बकरे व्यापारी असलेल्या व्यक्तीचा खुन पैशाच्या कारणासाठी केला गेला की अन्य कोणत्या कारणा साठी करण्यात आला हे शोधण्याचे आव्हान पोलिसांपुढे असणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *