सुट्टीनंतर लासलगावला कांदा लिलाव पूर्ववत

पहिल्याच दिवशी 2118 क्विंटल आवक; लाल कांद्याला कमाल 5,421 रुपये  भाव 

लासलगाव : वार्ताहर
आशिया खंडातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणार्‍या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत दिवाळीच्या सुट्टीनंतर शुक्रवार (दि. 13) पासून कांदा लिलावांना पुन्हा सुरुवात झाली. तब्बल आठ दिवसांच्या विश्रांतीनंतर बाजारपेठेत कांदा विक्रीचे व्यवहार सुरू झाल्याने परिसरातील शेतकरी, व्यापारी आणि बाजार समितीच्या घटकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. पहिल्याच दिवशी 169 वाहनातून लाल व उन्हाळ कांदा मिळून एकूण 2 हजार 118 क्विंटल कांद्याची आवक झाली. बाजारभावामुळे शेतकर्‍यांमध्ये समाधानाचे वातावरण दिसून आले.
सुट्टीनंतर पहिल्याच दिवशी बाजार समितीच्या आवारात कांदा विक्रीसाठी शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणात वाहने आणली होती. यामध्ये नवीन लाल कांदा तसेच उन्हाळ कांद्याचा समावेश होता. शुक्रवारच्या लिलावात लाल कांद्याला कमाल 5 हजार 421 रुपये, तर उन्हाळ कांद्याला कमाल 4 हजार 353 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. बाजार समितीच्या उपलब्ध माहितीनुसार, लाल कांद्याला किमान 2 हजार 1 रुपये, कमाल 5 हजार 421 रुपये, तर सरासरी 4 हजार 700 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला तसेच उन्हाळ कांद्याला किमान 2 हजार 1 रुपये, कमाल 4 हजार 353 रुपये, तर सरासरी 3 हजार 800 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. दिवाळीच्या सुट्टीनंतर पहिल्याच दिवशी झालेली कांद्याची आवक आणि मिळालेले बाजारभाव यामुळे कांदा उत्पादक शेतकर्‍यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

दिवाळीच्या सुट्टीनंतर कांदा लिलाव पुन्हा सुरू झाल्याने समाधान वाटत आहे.पहिल्याच दिवशी बाजारात कांद्याला मिळालेला भाव पाहता शेतकर्‍यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. उत्पादन खर्च, मजुरी, वाहतूक आणि औषधांचा वाढता खर्च लक्षात घेता कांद्याला समाधानकारक भाव मिळणे गरजेचे आहे.
– सुनील गवळी, कांदा उत्पादक, ब्राम्हणगाव विंचूर

 

बाजार समितीत शुक्रवारपासून कांदा लिलाव पूर्ववत सुरू करण्यात आले आहेत. पहिल्याच दिवशी लाल व उन्हाळ कांदा मिळून 2 हजार 118 क्विंटल आवक झाली. आगामी काळात देखील शेतकर्‍यांनी कांद्याची दर्जेदार प्रतवारी करून कांदा विक्रीसाठी आणल्यास कांद्याला निश्चितच चांगले व समाधानकारक भाव मिळण्यास मदत होईल
– नरेंद्र वाढवणे, सचिव, बाजार समिती, लासलगाव

लासलगाव बाजारपेठेतील कांदा खरेदी-विक्रीचे व्यवहार पुन्हा सुरू झाले आहेत.पहिल्याच दिवशी अनेक शेतकर्‍यांनी कांदा विक्रीसाठी आणला. बाजारात कांद्याची गुणवत्ता आणि प्रतवारीनुसार खरेदीचे व्यवहार झाले. आगामी काळातही बाजारपेठेत नियमित आवक आणि व्यापार सुरळीत राहण्याची अपेक्षा आहे.
– ओम चोथानी, कांदा व्यापारी, लासलगाव

Onion auctions resume at Lasalgaon after the holiday

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *