कांद्याची साडेसाती मोठा दुष्काळ पडला तरच संपणार आहे. या वर्षी सर्वञ धो-धो पाऊस कोसळला. सर्वञ पाणीच पाणी, विहिरी तुडुंब, जमिनीत आजसुद्धा ओल असल्याने या वर्षी खरिपाप्रमाणेच रब्बीत शंभर टक्के पिके असून, उन्हाळ्यातसुद्धा पिके घेतली जातील व त्यामुळे चार वेळा कांद्याचे रोप म्हणजे उळे पावसाने नष्ट झाले तरी बचेंगे तो लढते रहेंगे. असे परत परत मोठे नुकसान सहन करून कांद्याचे क्षेञ मोठ्या प्रमाणावर वाढले आहे.
आता रांगडा म्हणजे रब्बी कांदा सरासरी 700 रुपये दराने विकला जात आहे. तर उन्हाळी कांदा मोठा वांधा करेल असे दिसत आहे. उन्हाळी कांदा संकटातच राहील. मका पावसाने खराब केला पण दर माञ वाढत नाहीत. 2400 रुपये हमीभाव असताना आता जानेवारीच्या शेवटी दर सतराशेवरच अडकले आहेत. म्हणजे हमीभावापेक्षा पाचशे ते सातशे रुपये कमी दर मिळत आहेत.
आनंद अॅग्रोचे रमेश पाटील यांनी महत्त्वाची माहिती दिली व त्या माहितीप्रमाणे मका मंदीतच राहील, असा पाटील यांचा अंदाज आहे. खरिपात कमी खर्च व नेमके उत्पन्न म्हणून शेतकरी मका पिकाकडे आपोआप आकर्षित झाले. कमी मजूर, जास्त पावसाचा फार फटका बसत नाही, पण या वर्षाचा अपवाद वगळता मका बरा व चार्याचा प्रश्न सुटतो. पण वारंवार मका पेरल्याने आता अळी व उत्पादनात मोठी घट येत असताना 2200 /2500 रुपये दर मिळाला तर बरा पैसा होतो. पण रब्बी मका एकरी चाळीस क्विंटल सरासरी निघत असल्याने खरीपपेक्षा रब्बी मका बरा म्हणून रब्बीत मका क्षेञ सतत वाढत आहे.
हमीभाव म्हणजे भीक नको… अशी स्थिती आहे. कधी घेतील नो गॅरंटी. घेतीलच याची नो गॅरंटी. वेळेवर पेमेंट नो गॅरंटी म्हणून शेतकरी दोन पैसे कमी पण मार्केटला पसंती देतात पण या वर्षी माञ नुकसान जास्तच झाले आहे. केंद्र सरकारचा हमीभाव म्हणजे बंडला मारणारे धोरण.
आता सोयाबीनची परिस्थिती सुधारत असून हमीभावाला मार्केटमध्ये मागे टाकले आहे. पण आता अनेकांनी चार हजार रुपये दराने सोयाबीन विकल्यावर दर वाढले. कापूस स्वस्तात विकला गेला व आता दर बरे वाढले आहेत. तूर पीक नेहमी दोन पैसे देते. यंदा पण तुरीचे दर बरे आहेत.
मुख्य विषय म्हणजे कांदापुराण हे कधीच संपणार नाही. खरीप कांदा नेहमीच सडून जातो. खर्च निघत नाही पण अधूनमधून लॉटरी लागते व चार वर्षांचे नुकसान भरून निघते. रब्बी कांदा भरपूर माल पिकतो पण दर जेमतेमच असतात. तरी सरासरी कमीत कमी रुपयाला रुपया नक्की मिळतो. कुणी मान्य करणार नाही पण रब्बी म्हणजे रांगडा कांदा खर्च जाता एकरात 75 हजार ते दीड लाख देते. पण दीड लाख अधूनमधून मिळतात. सोपे पीक म्हणून कांदा प्रेम वाढले आहे. या वर्षी उन्हाळी कांदा जो 15 डिसेंबरपर्यंत लावल्यास नैसर्गिक आपत्ती व चांगली थंडी असल्यास एकरी दीडशे ते दोनशे क्विंटल माल निघतो. काही कमी काढतात काही तीनशे क्विंटलपर्यंत मजल मारतात. या वर्षी वातावरणाने अजून दगा न दिल्याने व थंडी लांबल्याने उत्पादन वाढणार आहे. पण अजून लागवड सुरू आहे व थंडी थांबली तर उशिरा लागलेला कांदा नुकसान करेल हे नक्की. पाण्याची कमतरता भासणार नाही हे नक्की. पण उन्हाळी कांदा बराच वांधा करेल व राजकारण्यांना शिव्या खाऊ घालेल, हे नक्की.
Onion, maize rates in crisis