कांदा दरात घसरण; उत्पादन खर्चही मिळेना!

सरकारच्या हस्तक्षेपासह अनुदानाची राज्य कांदा उत्पादक संघटनेची मागणी

लासलगाव : वार्ताहर
कांद्याच्या कोसळणार्‍या किमती आणि वाढत्या लागवड खर्चामुळे राज्यातील कांदा उत्पादकांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. सरकारने तातडीने हस्तक्षेप करून प्रतिक्विंटल 1,500 रुपयांचे अनुदान द्यावे, अशी मागणी राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भरत दिघोळे यांनी केली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून कांद्याच्या किमतीत मोठी घट झाली आहे, तर दुसरीकडे बियाणे, खते, कीटकनाशके, मजुरी, सिंचन, वीज, वाहतूक आणि साठवणुकीचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सध्याच्या मिळणार्‍या बाजारभावातून कांदा उत्पादक शेतकर्‍यांना उत्पादन खर्चही वसूल करता येत नाही.
राज्य आणि केंद्र सरकारने बाधित कांदा उत्पादकांना तात्काळ प्रतिक्विंटल 1500 रुपयांचे अनुदान द्यावे तसेच कांद्यावरील निर्यात निर्बंध हटवावेत, शेतकर्‍यांना थेट बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी आणि कांद्यासाठी हमी आधारभूत किंमत जाहीर करावी तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात वैयक्तिकरीत्या हस्तक्षेप करावे, अशी मागणी दिघोळे यांनी केली आहे. याबाबत केंद्र व राज्य सरकारने शेतकरी हिताचा विचार करता कांदा उत्पादकांना तात्काळ मदत उपाययोजना जाहीर करावी, अन्यथा राज्यव्यापी आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिघोळे यांनी दिला आहे.

बीड जिल्ह्यातील नेक्नूर येथील एका शेतकर्‍याने कांद्याची 41 पोती सोलापूरच्या बाजारात विक्रीसाठी आणली; परंतु त्यापैकी केवळ 20 पोतीच विकली जाऊ शकली. मजुरी, कमिशन, बाजार शुल्क, वाहतूक आणि इतर खर्च वजा केल्यावर त्याच्या हातात फक्त 519 रुपये शिल्लक राहिले.

नाशिक जिल्ह्यातील सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीमधील एका कांदा उत्पादक शेतकर्‍याला त्याच्या उत्पादनासाठी प्रतिक्विंटल केवळ 50 रुपये किंवा प्रतिकिलो 50 पैसे मिळाले आणि त्यानंतर त्याने बाजाराच्या आवारातच आत्महत्येचा प्रयत्न केला.

वडांगळी (ता. सिन्नर) येथील शेतकर्‍याला एकरी 58 हजार रुपये उत्पादन खर्च झाला. मात्र अतितापमानामुळे आठ दिवसांत निम्म्यापेक्षा अधिक कांदा सडला, तर उर्वरित कांद्याला कवडीमोल भाव मिळाल्याने खर्च वजा जाता केवळ पंधरा हजार रुपये हातात आले. उत्पादन खर्चही वसूल झाला नाही.

कांद्याला कमी भाव मिळाल्याने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर शेतकर्‍यांनी ठिय्या आंदोलन केले आणि कांद्याचा लिलाव थांबवला.

Onion prices fall; production cost not even recovered!

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *