ओंजळ भरून घ्यावी…

ओंजळ भरून घ्यावी…

लेखिका: मनीषा कुलकर्णी- आष्टीकर

अंगणात लावलेल्या कृष्णकमळाच्या वेलावर निळसर जांभळ्या रंगाची, पांढरट छटा असलेली सुंदर सुंदर फुले पाहून कुणाला आनंद होणार नाही?त्यातही ती फुलं उमलून यावीत म्हणून दोन वर्षापासून डोळ्यातील आस जिवंत ठेवलेली!अगदी राधेनं जशी कृष्णाची जन्मजन्मांतरीची आस धरलीय तशीच या जिवानं कृष्णकमळाची!!

या वेलीची एक काडी मी तीन चार वर्षापुर्वी एका छोट्याशा कुंडीत लावली होती.शेजारच्या काकुंच्या आईच्या घरून ती काडी आणलेली.जणू एखाद्या आईच्या घरून आलेली ती लेक!ती लगेच माझ्या घरात रूजली!वेल असो की लेक रूजणं तिचं लक्षण!लगेचच तिच्याभोवती इवली इवली पानं फुटू लागली.मुळांनी माती घट्ट धरून ठेवली.खरंच माणसांनाही नाती अशी घट्ट धरून ठेवता आली असती तर?ती इवलीशी पाने हळूहळू उंच जाऊ लागली.वेलाचं रूप घेऊ लागली.वेळ मिळेल तसं माझं संगोपन चालूच होतं.तो वेल वर चढावा म्हणून आधारासाठी एका जाडसर दोरीनं आणखी वर बांधलं.स्वतंत्र अस्तित्व असलं तरी वेलीला आधार लागतोच!पण आईच्या कुशीतून आलेल्या अशा कित्येक वेलींना कधी आधारच भेटत नाही,कधीकधी निर्माण करावं लागतं स्वत:च अस्तित्व,कधी खंबीर बनावं लागतं तर कधीकधी या वेली कायमसाठीच कोमेजून जातात!पण माझा या वेलावर अफाट जीव होता.आधाराचा हात होता.या आधारानं तो आभाळाला भिडणार होता!

तो आणखी वर वर जाऊ लागला.हळूहळू त्याला दररोज चार पाच फुलं लागू लागली.त्याचा गंध दिशादिशात पसरू लागला.उमललेलं पहिलं फूल अर्थातच देवघरातील गोपाळकृष्णाच्या चरणी अर्पण केलं!निळ्यासावळ्या डोहात ते फुलंही विरघळून गेलं!कृष्णाच्या मुकुटावरच्या मोरपिसातील निळसर छटा प्राशून कृष्णकमळ नाव धरणारं हे फूल मला मोहून घेऊ लागलं!

पण..कुणीतरी म्हटलं,’कुंडीतून काढून त्याला मातीत लावा,अजून छान वाढ होईल.’ कुठल्याही रोपट्याची काळ्या मातीत मुक्त वाढ!मी तर त्याला बंदिस्त केलं होतं.मग ते कोमेजून तर नाही ना जाणार या विचारानं एक दिवस त्याला व्यवस्थित काढून अंगणातील मोकळ्या जागेत लावलं.

कित्येक दिवस लोटले,महिने सरले.बघता बघता एक वर्ष…मग दोन वर्ष..वेल नुसताच वाढतोय पण त्याला फुलं लागणंच बंद झालं.असं का?माझ्या कृष्णकमळाला कुणाची दृष्ट तर नाही ना लागली?की वरवर हिरवागार दिसणारा तो वेल आतून कोमेजला होता?असं कुठलं दु:ख त्याला सलत असावं?त्याला कुंडीतच राहाणं आवडत होतं का?मला जशी जागा बदलली की झोप लागत नाही तसं या वेलाचंही झालं असेल का?माणसाची एका जागेहून दुसऱ्या जागी बदली झाल्यावर तिथं रूळायला वेळ लागतो तसं तर नसेल?की त्याला कुंडीतला एकांत आवडत असेल?मोकळ्या जागेतील सोबती आवडत नसतील?ही सोबत फार महत्त्वाची असते.कुणाच्या सहवासात जीवन बहरतं तर कुणी बहरूच देत नाही!नक्की कारण काही असो..मी आणि तो वेल आतल्या आत कुढत होतो!मला त्याची काळजी,पण…त्याला कुणाची?खरंच माणसासारखं झाडांनाही व्यक्त होता आलं असतं तर?अशा असंख्य विचारांनी माझं मन व्याकूळ होऊ लागलं.

पुस्तकं उघडून जगातील कितीतरी भाषा शिकता येतील पण झाडांची भाषा,वेलींची भाषा कशी बरं समजावी?जीव कासावीस होत होता.एक मन म्हटलं,थोडा वेळ जाऊ दे सारं ठिक होईल!खरंच की त्या वेलाला थोडा वेळ हवा होता!जर असेलच काही सलणारं त्यातून सावरायला!बाहेरील घाव लवकर भरून निघतात आतले घाव एकतर कुणाला दिसत नाहीत आणि कळतही नाहीत!राधेच्या काळजातल्या व्यथा अश्रूवाटे ओघळत असतील पण कृष्णाचं काय?तो तर आतल्या कळा आतच दाबत सदैव इतरांच्या जीवनावर मोरपीस फिरवत उभाच!माझ्या दारातल्या कृष्णकमळाचं कदाचित हेच दु:ख असेल हे पटलं.पानाफुलाच्या सहवासात माझं मन सुद्धा हिरवं होऊ लागलं.

आणि…दोन वर्षाच्या प्रतिक्षेनंतर त्या वेलावर इवल्या इवल्या कळ्या दिसू लागल्या!त्या विकसित होऊन हिरव्या पानातून जांभळी फुलं हसू लागली!मन मोहरून गेलं.पुन्हा गंधाची पखरण सुरू झाली!आपल्या हातून झालेल्या नवनिर्मितीचा आनंदच वेगळा!आई म्हणते,’एखाद्याच्या हातातच जादू असते त्यानं केलेलं सगळं चांगलच होतं.’ आपल्या हाताकडं पाहत मी म्हणाले..हे,देवा या हातानं कुणाचं वाईट न घडो.आई म्हणते तशी जादूच घडू दे.सर्वांची ओंजळ सुगंधानं भरू दे!
अशा हजारो हातांना असाच गंध लागू दे!

मनीषा कुलकर्णी-आष्टीकर
परभणी
मोबाईल-9511875353

Bhagwat Udavant

View Comments

  • मा लेखिका मनिषा कुलकर्णी यांचा लेख वाचला. लेखातील परिच्छेद मनाला भावला.

    बाहेरील घाव लवकर भरून निघतात आतले घाव एकतर कुणाला दिसत नाहीत आणि कळतही नाहीत!राधेच्या काळजातल्या व्यथा अश्रूवाटे ओघळत असतील पण कृष्णाचं काय?तो तर आतल्या कळा आतच दाबत सदैव इतरांच्या जीवनावर मोरपीस फिरवत उभाच!माझ्या दारातल्या कृष्णकमळाचं कदाचित हेच दु:ख असेल हे पटलं.

    अतिशय मार्मिक विवेचन.. दुःख विसरून माणसानं सुखाची ओंजळ भरून घ्यावी. ओंजळीतलं भरून वाहू लागलं की ईतरांना वाटावं.. हा सृष्टीचा नियम आहे.

    खूप छान व्यक्त झाला आहात

Recent Posts

साप्ताहिक राशिभविष्य

पुरुषोत्तम नाईक दि. 17 ते 23 ऑगस्ट 2025 मेष : सुखवार्ता कळतील या सप्ताहात रवी,…

16 hours ago

असामान्य अभिनेत्री काळाच्या पडद्याआड

मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय चेहरा, ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे वयाच्या 68 व्या वर्षी…

16 hours ago

गणेशोत्सवात ‘गोदावरी महाआरती’ ठरणार नाशिकचा अभिमान

देशभरातून आमंत्रणे; महाराष्ट्राच्या भक्तिभावाला नवी दिशा पंचवटी : प्रतिनिधी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा प्राण म्हणजे गणेशोत्सव.…

17 hours ago

पालकमंत्रिपदाचा वाद चिघळला

गिरीश महाजन यांच्या दाव्यानंतर भुजबळांचेही प्रत्युत्तर नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद पुन्हा एकदा ऐरणीवर…

17 hours ago

पिनाकेश्वर घाटात ट्रॅक्टर ट्रॉली दरीत कोसळून दोन महिला ठार

बोलठाण : प्रतिनिधी नांदगाव तालुक्यातील जातेगावपासून सात किलोमीटर अंतरावरील पिनाकेश्वर महादेव घाटात रविवारी (दि.17) सायंकाळी…

17 hours ago

निफाड उपविभागात साडेतीन हजार स्मार्ट मीटर बसविण्याचे काम सुरु

वीजचोरी रोखण्यास मदत; महावितरणाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना विश्वास निफाड : विशेष प्रतिनिधी विजेची हानी तथा गळती,…

17 hours ago