शेखर सिंह : अधिकार्यांकडून पाहणी; 31 पर्यंत डेडलाईन
नाशिक : प्रतिनिधी
शहरातील पायाभूत सुविधांच्या कामांमुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी संबंधित कामांना आता कालमर्यादा देण्यात आली आहे. द्वारका चौकातून नाशिक-धुळे मार्गावरील वाहतूक आणि त्र्यंबक रस्त्यावरील एक मार्ग 31 ऑगस्टपर्यंत वाहतुकीसाठी खुला करण्याचे निर्देश नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी सोमवारी दिले. तसेच मुंबई नाका ते गडकरी सिग्नल आणि पुढे खडकाळी सिग्नलपर्यंतचा मार्ग नवरात्रोत्सवापूर्वी वाहतुकीसाठी खुला करण्याचे निर्देश देण्यात आले.
नाशिक पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह आणि महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी सोमवारी द्वारका चौक, मुंबई नाका आणि त्र्यंबक रस्त्याची पाहणी केली. यावेळी सुरू असलेल्या कामांचा आढावा घेत वाहतूक सुरळीत करण्यासाठी संबंधित यंत्रणांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.
द्वारका चौकातील कामाचा आढावा घेताना एमएसआयडीसीने 31 ऑगस्टपर्यंत नाशिक-धुळे दिशेने जाणारी वाहतूक सुरू करण्याची कार्यवाही पूर्ण करावी, असे निर्देश देण्यात आले.
मुंबई नाका येथून गडकरी सिग्नलमार्गे खडकाळी सिग्नलपर्यंतच्या रस्त्याची पाहणी करण्यात आली. या मार्गाचा एक भाग नवरात्रोत्सवापूर्वी वाहतुकीसाठी खुला करण्याचे निर्देश देण्यात आले. त्यामुळे या परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.
त्र्यंबक रस्त्यावरील मुंबई नाका ते एबीबी सर्कलपर्यंतच्या रस्त्याच्या कामाचाही आढावा घेण्यात आला. पॅचवर्कची कामे पूर्ण करून 31 ऑगस्टपर्यंत एक मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्याच्या सूचना देण्यात आल्या. पर्यायी मार्गावरील वाहतूक वाहतूक वॉर्डनच्या मदतीने नियंत्रित केली जाणार आहे. रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजविण्याचे निर्देशही देण्यात आले.
पायाभूत सुविधांची कामे आणि वाहतूक व्यवस्थापन यांचा समन्वय साधणे गरजेचे असून, संबंधित यंत्रणांनी दिलेल्या कालमर्यादेत कामे पूर्ण करून रस्त्याचे मार्ग खुले करावेत. खड्ड्यांसारख्या तातडीच्या समस्यांवर प्राधान्याने कार्यवाही करण्यात येईल, असे महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी सांगितले.पाहणीवेळी महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता ज्ञानेश्वर बारवकर, प्राधिकरणाचे उपआयुक्त योगेंद्र चौधरी, पोलिस उपायुक्त (परिमंडळ-1) मोनिका राऊत, सहायक पोलिस आयुक्त माधव रेड्डी आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
द्वारका चौकातील वाहतुकीसाठी कालमर्यादा
द्वारका चौकातील कामामुळे सध्या वाहतुकीवर परिणाम होत आहे. नाशिक-धुळे दिशेने जाणारी वाहतूक 31 ऑगस्टपर्यंत सुरू करण्यासाठी एमएसआयडीसीला सूचना देण्यात आल्या आहेत. कामाच्या ठिकाणी वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी वाहतूक वॉर्डनची संख्या वाढविण्यात येणार आहे.
नवरात्रोत्सवापूर्वी मार्ग खुला
मुंबई नाका ते गडकरी सिग्नल आणि पुढे खडकाळी सिग्नलपर्यंतचा रस्त्याचा एक मार्ग नवरात्रोत्सवापूर्वी वाहतुकीसाठी खुला करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्र्यंबक रस्त्यावरील मुंबई नाका ते एबीबी सर्कलदरम्यानही 31 ऑगस्टपर्यंत एक मार्ग खुला करण्याचे नियोजन आहे.
Open the Dwarka-Trimbak road for one-way traffic.
Mangesh Shirole, the spirited Deputy Mayor striving for the development of Igatpuri.
- विष्णूपंत गायखे अध्यक्ष, दर बारा वर्षांनी येणारा कुंभमेळा नाशिककरांना तसा नवा नाही नाशिककर आपल्या…
Simhastha: Not merely a celebration of faith, but a blueprint for Nashik's future.
The Sacred Vessel of Spirituality: The Holy Site of Nashik