नसबंदीकडे पुरुषांची पाठ, महिलांचाच शस्त्रक्रियेत पुढाकार
नाशिक ः देवयानी सोनार
पती आणि पत्नी हे संसाररथाचे दोन चाके असली तरी संतती नियमन शस्त्रक्रियेमध्ये पुरुषांच्या तुलनेत महिलांचेच प्रमाण सर्वाधिक असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात हे प्रमाण अवघे पाच टक्के असून, पुरुषांनी नसबंदी शस्त्रक्रियेकडे समुपदेशानंतरही पाठ फिरविली आहे.
कुटुंब एक किंवा दोन मुलांचे झाले की संतती प्रतिबंधात्मक शस्त्रक्रिया किंवा नसबंदीचा विचार केला जातो. पुरूषाचे वर्चस्व अबाधित रहावे, पुरूषांना मेहनतीची कामे करावी लागतात.नसबंदीमुळे आरोग्यावर परिणाम होतो या अशा अनेक गैरसमजुतीमुळे पुरुष नसबंदींचे प्रमाण अत्यल्प राहिले आहे. गेल्या पाच वर्षात केवळ 5 टक्केच पुरूषांनंी नसबंदी शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. गेल्या पाच वर्षात महिलांच्या एकूण 73,736 इतक्या संततीप्रतिबंधात्मक शस्त्रक्रिया झाल्या. तर पुरूषांच्या केवळ 4146 इतक्या झाल्या. हे प्रमाण केवळ पाच टक्के असून अजूनही पुरुषी मानसिकता नसबंदीसारख्या शस्त्रक्रियेसाठी पुढाकार घेतांना दिसून येत नाही.
पूर्ण राज्याचा विचार केल्यास पुरूष शस्त्रक्रियेचे प्रमाण कमी असल्याचे चित्र आहे. आदिवासी भागात पुरूष शस्त्रक्रियेचे प्रमाण जास्त आहे. समुपदेशन,प्रबोधन करून मागील दोन,तीन वर्षापासून हे प्रमाण वाढविण्याचे प्रयत्न आरोग्य विभागाकडून केले जात आहे. दोन वर्षाच्या कोविड लाटेत संततीप्रतिबंधात्मक शस्त्रकियांचे प्रमाणही कमी असल्याचे चित्र होते.
कुटुंब पूर्ण करण्यासाठी ही नसबंदी किंवा महिलांची संतती प्रतिबंधात्मक शस्त्रक्रिया केली जाते.महिला प्रसूतीच्या वेदनेमधून जात असतात.त्यामुळे महिला या शस्त्रक्रियेसाठी लवकर तयार होतात असा समज असल्याने महिलांचे प्रमाण जास्त आहे. त्यामानाने पुरूषांना समजावणे अवघड जाते. गैरसमज,मानसिकतेमुळे नसबंदी करण्यासाठी नकार दिला जातो.
हम दो
हमारा एक
हम दो हमारे दो आणि आता तर वाढत्या महागाईमुळे हम दो हमारा एक असाच ट्रेंड वाढतो आहे. त्यामुळे एक अपत्य मुलगा किंवा मुलगी असो एका मुलाचे संगोपन करून कुटुंब पूर्ण केले जाते.
लॅप्रोस्कोपिक
शस्त्रक्रिया
पुरूष नसबंदी लॅप्रोस्कोपिक उपचाराने शस्त्रक्रिया केली जाते. दुसर्याच दिवशी पुरूष घरी जावू शकतो. अशा उपचाराने कोणत्याही समस्या उद्भवत नाही. अशक्तपणा येत नाही. पूर्वीसारखेच काम करू शकतो.
पुरूषांच्या नसबंदी शस्त्रक्रियांचे प्रमाण समुपदेशन,प्रबोधन करून वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात आहे.आदिवासी भागात यासाठी प्रयत्न केले जात आहे.दहा ते वीस टक्यांनी शस्त्रक्रियांचे काम वाढविणार आहे.
-डॉ.कपिल आहेर
(जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद)गैरसमजापोटी अजूनही पुरूषांना नसबंदीसाठी
पुढाकार घेऊ दिला जात नाही.महिलांचे काम आहे ही मानसिकता आजही कायम आहे.महिलांना प्रसूतीचे कष्ट तर पडतातच त्यामुळे पुरूष नसबंदी सोपी आहे.पुरूषांना त्याचा त्रास होत नाही त्यामुळे पुरूषांनी या शस्त्रक्रियेसाठी पुढे येणे गरजेचे आहे.
-डॉ.नलिनी बागूल