अडीच हजारांत दर्शनामुळे सामान्य भक्तांची परवड

ट्रस्टला दिवसभरात 14 लाखांचे उत्पन्न, दर्शनबारीत गोंधळाची स्थिती

त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी
त्र्यंबकेश्वर मंदिरात विश्वस्त मंडळाने 2500 रुपयांची व्ही.व्ही.आय.पी. तातडीची दर्शनव्यवस्था सुरू केली, मात्र पूर्वनियोजनाच्या अभावी शनिवारी आणि रविवारी येथे गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली पहावयास मिळाली. त्र्यंबकेश्वर मंदिराच्या उत्तर दरवाजासमोर थेट दर्शनाचा हट्ट धरलेले भाविक आणि त्यात 2500 रुपयांचे तिकीट काढण्याची तयारी असलेले व्ही. व्ही.आय.पी. असा एकच गोंधळ सकाळपासून सुरू होता. विश्वस्त मंडळाने 2500 रुपये देणार्‍यांसाठी खास पेंडाल टाकला होता. दुपारच्या सुमारास 2500 रुपयांचीदेखील रांग लागली. त्यानंतर उत्तर दरवाजाने 200 रुपये दर्शनबारी थांबवून 2500 रुपये देणार्‍या भाविकांना टप्प्याटप्प्याने सोडण्यात
येत होते.
शनिवारी एकाच दिवसात 14 लाख रुपये देवस्थान ट्रस्टला 2500 रुपये देणगी पावतीच्या माध्यमातून मिळाले असल्याची चर्चा होती. दिवसभरात 500 भाविकांना 2500 रुपये घेऊन दर्शन देण्याचे नियोजन आहे. तथापि, याचा लाभ घेण्यासाठी किमान एक हजार भाविक इच्छुक असल्याचे शनिवारी व रविवारी आढळून आले आहे. देवस्थान ट्रस्टला एका दिवसात 14 लाख रुपये मिळत असतील तर कालपर्यंत हे पैसे कोणाकडे जात होते? असा खोचक सवाल येथे उपस्थित झाला आहे. दर्शनबारीच्या काळ्या बाजाराला चाप बसला असल्याची प्रचिती यामुळे येत आहे.
दरम्यान, 2500 रुपये दर्शनबारीने पूर्व दरवाजा दर्शनबारीतील भाविकांवर अन्याय होत असल्याच्या तक्रारी होत आहेत. 2500 रुपये खर्च करत दर्शनासाठी आलेल्या भाविकाला थेट गर्भगृहापर्यंत घेऊन जातात. त्यांना समाधानकारक दर्शन घडवले जाते. यासाठी लागणारा वेळ पाहता तेवढ्या वेळात पूर्व दरवाजा अथवा 200 रुपये दर्शनबारीतील किमान 10 ते 20 भाविक धक्का देऊन बाहेर काढले जातात. एक 2500 रुपये दर्शनाचा भाविक किमान 10 भाविकांचा वेळ घेत असेल तर 500 व्ही.व्ही.आय.पी. नेहमीच्या दर्शनबारीतील 5000 भाविकांना रोखतात. सकाळपासून रात्रीपर्यंत पूर्व दरवाजा दर्शनबारी सुरू असते.
रात्री 9 वाजेच्या अगोदर दर्शनबारीतील प्रवेश बंद करतात. त्यानंतर दर्शन मंडपात असलेल्या शेवटच्या भाविकाचे दर्शन होते तोपर्यंत गर्भगृह दरवाजा खुला असतो. शनिवार आणि रविवारी रात्री 12 नंतर शेवटच्या भाविकाचे दर्शन झाले. रात्री 10 नंतर मंदिराच्या बाहेर पडलेल्या भाविकाला जेवणाची सुविधा मिळत नाही. सर्वत्र खोदकाम झालेले आहे. त्यात अंधार त्यामुळे त्याला रस्ता सापडत नाही.
दर्शनाचा काळाबाजार रोखण्यासाठी 2500 रुपयांची दर्शनबारी सुरू केली. त्यामुळे काही समस्या निर्माण झाल्या आहेत. त्याच सोबत दस्तुरखुद्द विश्वस्तांनी दर्शनाचा काळाबाजार होत असल्याचे मान्य केले आहे.तसेच एका दिवसात 14 लाख रुपये मिळतात हे स्पष्ट झाले आहे. त्र्यंबकेश्वर मंदिराच्या दर्शनातून कालपर्यंत किती पैशाचा काळाबाजार झाला आणि कोणकोणाची वरकमाई होऊन त्याचे कोटकल्याण झाले, याची रंगतदार चर्चा आता त्र्यंबकनगरीत
घडत आहेत.

Ordinary devotees can afford to pay 2.5 thousand darshan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *