जिल्हाधिकारी कार्यालयावर मूकमोर्चा, आरोपीला फाशीची एकमुखी मागणी
नाशिक : प्रतिनिधी
डोंगराळे (ता. मालेगाव) गावातील चारवर्षीय बालिकेवर
झालेल्या अत्याचार व निर्घृण हत्येच्या घटनेविरोधात शुक्रवारी (दि. 21) नाशिकमध्ये विविध संघटना व समाजबांधवांच्या सहभागातून भव्य मूकमोर्चा काढण्यात आला. महिला व तरुणींचा उल्लेखनीय सहभाग असलेल्या या मोर्चातून आरोपीला तत्काळ फाशीची शिक्षा द्यावी, अशी एकमुखी मागणी करण्यात आली.
शुक्रवारी सकाळी 11 वाजता सराफ बाजारातून मोर्चाला सुरुवात झाली. समस्त सोनार समाजाच्या पुढाकाराने आयोजित या मोर्चात महात्मा फुले समता परिषद, मराठा महासंघ, संभाजी ब्रिगेड, लाड सुवर्णकार समाज, अहीर सुवर्णकार समाज, सराफ असोसिएशन यांसह अनेक सामाजिक संघटनांनी सक्रिय सहभाग नोंदवला. बालिकेच्या हत्येने संतप्त झालेल्या नागरिकांनी चिमुकलीच्या न्यायासाठी एकजूट करून नराधमाला फाशी द्या, अशा घोषणा दिल्या. या घोषणांनी परिसर दुमदुमला होता.
हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचल्यानंतर नागरिकांनी काही काळ ठिय्या दिला. त्यानंतर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना निवेदन देऊन आरोपीवर फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून तातडीने फाशी देण्याची मागणी करण्यात आली. निवेदनात त्या घटनेबाबत तीव्र संताप व्यक्त करत कठोर, जलद आणि ठोस न्याय मिळण्याची मागणी करण्यात आली. या मोर्चाचे नेतृत्व संजय मंडलिक, गजू घोडके, करण गायकर, कॉ. राजू देसले, तल्हा शेख, राजेंद्र दिंडोरकर, गिरीश नवसे, बाळासाहेब कर्डक, नाना पवार, संतोष ओझरकर, योगेश मैंद, सुरेश बागूल यांनी केले. मोठ्या संख्येने विविध पदाधिकारी, समाजबांधव व नागरिक उपस्थित होते.
डोंगराळे गावातील चार वर्षांच्या चिमुकलीवर नराधमाने अत्याचार करून तिच्या डोक्यात दगड घालून हत्या केली. या क्रूर कृत्याने राज्य हादरले आहे. मानवतेलाही काळिमा फासणार्या या घटनेने समाजाचा संताप शिगेला पोहोचला आहे. सर्व स्तरांतून आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे.
मोर्चादरम्यान छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांनी संताप व्यक्त करत सरकारला कडक शब्दांत इशारा दिला. त्यांनी म्हटले, अशा विकृत प्रवृत्तीच्या राक्षसी व्यक्तींना समाजात स्थान नाही. फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून आरोपीला तत्काळ फाशी द्यावी किंवा कायद्यात बदल करून अशा गुन्हेगारांच्या एन्काउंटरची तरतूद करावी. ते पुढे म्हणाले की, अनेक गंभीर प्रकरणांत फक्त मोर्चे, कॅण्डल मार्च आणि घोषणांपुरतेच मर्यादित राहिले असून, प्रत्यक्षात गुन्हेगारांमध्ये कायद्याचा धाक निर्माण झालेला नाही. मालेगावातील तणावग्रस्त परिस्थिती लक्षात घेता पोलिसांनी विशेष सुरक्षा व्यवस्था ठेवली होती. चोख बंदोबस्तामुळे मोर्चा कोणत्याही अनुचित घटनेशिवाय शांततेत पार पडला. नागरिकांनी शांततेत, पण ठामपणे आपला संताप नोंदवला.
निवेदनातील प्रमुख मागण्या
♦ तपास तातडीने पूर्ण करून प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावे.
♦ आरोपीला विलंब न करता फाशी देण्याची कार्यवाही करावी.
♦ पीडित कुटुंबाला आर्थिक मदत, कायदेशीर सहाय्य व सर्वतोपरी सुरक्षा द्यावी.
♦ महिला, बालिकांवरील अत्याचारांसाठी कठोर कायदे लागू करावेत.
♦ गाव, वस्ती आणि संवेदनशील भागांत सतर्कता मोहीम राबवावी.